अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे खनिज तेलाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरेल १२० डॉलरपर्यंत पोहोचला आहे. परिणामी जगभरातील अनेक देशांवर इंधन टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटमय परिस्थितीत भारताने बांगलादेशला मोठी मदत केली असून थेट पाच हजार टन डिझेल पाठवले आहे. आसाममधील नुमालीगड रिफायनरीतून पाइपलाइनद्वारे हा पुरवठा होत असल्याची माहिती बांगलादेशचे पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मुहम्मद रेझानुर रहमान यांनी मंगळवारी (१० मार्च) माध्यमांना दिली. यापार्श्वभूमीवर भारताने-बांगलादेशला मदत नेमकी का केली? दोन्ही देशांमध्ये नेमका कोणता करार झाला होता? त्याविषयीचा हा आढावा…

मैत्री पाइपलाइनद्वारे बांगलादेशला मदत

मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यात मोठे अडथळे निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका भारताच्या सीमेला लागून असलेल्या बांगलादेशलाही बसला आहे. सध्या बांगलादेशमध्ये पेट्रोल व डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारताने मंगळवारी पाठवलेली पाच हजार टन डिझेलची खेप बांगलादेशला दिलासा देणारी ठरली आहे. ढाका येथील पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्रांनी दी फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले की- डिझेलची ही खेप आसाममधील नुमालीगड रिफायनरीतून भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनद्वारे पाठवण्यात आली आहे. २०१७-१८ मध्ये या पाइपलाइनच्या कामाला सुरुवात झाली होती. २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी या पाइपलाइनचे उद्घाटन केले होते. या पाइपलाइनद्वारे आसाममधील नुमालीगढ रिफायनरीतून बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील परबतिपूर डेपोपर्यंत डिझेलचा पुरवठा केला जातो.

आणखी वाचा : होर्मुझची सामुद्रधुनी ताब्यात घेण्याची अमेरिकेची तयारी? काय आहे या जागतिक जलमार्गाचे महत्व?

भारत-बांगलादेशमधील संबंधांमध्ये सुधारणा?

बांगलादेशी अधिकाऱ्यांच्या मते, डिझेलच्या या पुरवठ्यामुळे देशातील वीज निर्मिती आणि वाहतूक व्यवस्थेवर असलेला ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यापासून बांगलादेशचे भारतावर असलेले ऊर्जेबाबतचे अवलंबित्व काहीसे तणावाखाली होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुहम्मद युनूस नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने भारताबरोबरचे काही वीज आणि ऊर्जा करार पुनरावलोकनासाठी घेतले होते. या करारांमधील अटी बांगलादेशसाठी प्रतिकूल असल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यावेळी बांगलादेशने अदानी समूहाच्या झारखंडमधील वीज प्रकल्पातून होणारी विजेची आयात कमी केली होती. त्याशिवाय भारताला कोळसा पुरवठा करण्यातही त्यांनी अडथळे आणले होते. या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर भारताकडून सुरू झालेला ताजा डिझेल पुरवठा हा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय ऊर्जा संबंध पुन्हा एकदा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत देणारा आहे.

भारत बांगलादेशला किती डिझेल पाठवणार?

भारताने मैत्री पाइपलाइनद्वारे बांगलादेशला संकटाच्या काळातही तब्बल पाच हजार टन डिझेलचा पुरवठा केला आहे. ही पाइपलाइन सुरू होण्यापूर्वी इंधनाचा पुरवठा प्रामुख्याने रेल्वे टँकरच्या माध्यमातून केला जात होता. सध्या पाठवण्यात आलेला डिझेलचा साठा हा दोन्ही देशांमधील व्यापक करारातील पहिला हप्ता आहे. या करारानुसार भारत दरवर्षी बांगलादेशला १,८०,००० टन (१.८ लाख टन) डिझेलचा पुरवठा करणार आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष मोहम्मद रेझानूर रहमान यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की- आमचा भारताबरोबर एक करार झाला आहे आणि त्यानुसार दरवर्षी पाइपलाइनद्वारे १.८ लाख टन डिझेलचा पुरवठा केला जाईल. आता येत असलेले ५,००० टन डिझेल याच कराराचा भाग आहे. इंधन टंचाईवर मात करण्यासाठी पुढील सहा महिन्यांत भारताकडून किमान ९०,००० टन डिझेलचा पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : Petrol Diesel Price Hike : भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार? गॅस बुकिंगसाठी पाहावी लागणार वाट; कारण काय?

वाहतूक खर्चासह वेळेचीही मोठी बचत

भारत-बांगलादेश दरम्यानची ही आंतरराष्ट्रीय पाइपलाइन दोन्ही देशांसाठी महत्त्वाची ठरली आहे. टँकरद्वारे होणाऱ्या वाहतुकीच्या तुलनेत या पाइपलाइनमुळे वाहतूक खर्च आणि वेळेची मोठी बचत होत आहे. बीपीसीच्या वाणिज्य आणि ऑपरेशन्स विभागाचे सरव्यवस्थापक मोहम्मद मोर्शेद हुसेन आझाद यांनी दी फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले की- सोमवारी दुपारी ३:२० वाजता पंपिंग सुरू झाले. पाच हजार टन डिझेल बांगलादेशात पोहोचण्यासाठी सुमारे ४४ तास लागणार आहे. आम्ही तासाला सुमारे ११३ टन तेलाचे पंपिंग करत आहोत. त्यानुसार हा पुरवठा बुधवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

बांगलादेशात इंधन संकट का निर्माण झाले?

अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे पार्शियन आखातातील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा मोठा फटका सध्या बांगलादेशलाही बसला असून तिथे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा ऊर्जा कॉरिडॉर मानला जातो. बांगलादेश आपल्या गरजेच्या सुमारे ९५ टक्के खनिज तेल याच मार्गाने आयात करतो. या संकटामुळे बांगलादेशातील पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या असून इंधनाचे रेशनिंग सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी दुचाकीसाठी १० लीटर आणि कारसाठी ४० लिटर इंधनाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर भारत-बांगलादेश यांच्यातील ऊर्जा सहकार्याला ओहोटी लागली होती. मोहमद युसून यांच्या राजवटीत बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली होती. परंतु नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरदोन्ही देशांमधील संबंध हळूहळू पूर्वपदावर येत आहे.