Strategic Petroleum Reserve India current capacity: भारताच्या धोरणात्मक तेल साठ्याची (स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) क्षमता ५.३३ दशलक्ष टन आहे. सध्या भारताकडे ३.३७ दशलक्ष टन तेल साठा आहे. हा तेल साठा एकूण क्षमतेच्या दोन तृतियांश (६४ टक्के) आहे, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी (२३ मार्च) राज्यसभेत दिली. भारताकडे खनिज तेलाचा साठा किती आहे, याबाबत माहिती देण्यात आली. भारताकडे किती तेल साठा शिल्लक आहे? तो किती दिवस पुरेल ते जाणून घेऊयात.

स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (धोरणात्मक तेल साठा)ची गरज का?

भारतात पहिल्यांदा १९७३ मध्ये तेलसंकट आले होते. त्यावेळी भारताकडे धोरणात्मक तेल साठा असावा अशी गरज पहिल्यांदा भासली. दरम्यान, १९९१ मध्ये आखातातील युद्ध, २००५ मध्ये कॅटरिना चक्रीवादळ व २०२२ मध्ये सुरू झालेले रशिया-युक्रेन युद्ध यांमुळे तेलाच्या किंमती वाढल्या. या परिस्थितींमध्ये पाश्चिमात्य देशांच्या धोरणात्मक तेल साठ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे (IEA) सदस्य असलेल्या देशांनी पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमती वाढल्याने धोरणात्मक तेल साठ्यांमधून ४०० दशलक्ष टन तेल बाजारात आणण्यासाठी पाऊलं उचलली आहेत. अमेरिका, चीन व जपान या देशांच्या धोरणात्मक तेल साठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज तेल साठवून ठेवण्यात आले आहे.

भारताची तेल साठवणूक क्षमता किती?

भारतात धोरणात्मक तेल साठ्यांची जबाबदारी इंडियन स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (ISPRL) या कंपनीकडे आहे. ही कंपनी ऑइल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत काम करते. ISPRLकडे सध्या भूगर्भात असलेल्या तीन धोरणात्मक तेल साठ्यांची जबाबदारी आहे. त्यात विशाखापट्टणम (१.३३ दशलक्ष टन), मंगळुरू (१.५ दशलक्ष टन) आणि पाडूर (२.५ दशलक्ष टन) या तेल साठ्यांच्या समावेश आहे. भारताच्या धोरणात्मक तेल साठ्याची (स्ट्रेटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) एकूण क्षमता ५.३३ दशलक्ष टन आहे.

जुलै २०२१ मध्ये भारत सरकारने आणखी दोन वाणिज्यिक-धोरणात्मक तेल साठे उभारण्यास मंजुरी दिली आहे. आसाममधील चंडीखोल व कर्नाटकातील पाडूर मध्ये अनुक्रमे ६.५ व २.५ दशलक्ष टन तेलाचे साठे उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. तसेच राजकोट व बिकानेर येथेही धोरणात्मक तेल साठे उभारण्याचा सरकारचा विचार सुरू आहे.

७४ दिवस पुरेल इतकेच तेल साठवण्याची भारताची क्षमता?

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा खनिज तेलाचा ग्राहक असलेला देश आहे. भारताला लागणाऱ्या एकूण तेलापैकी ८८ टक्के तेल आयात करावे लागते. देशांनी ९० दिवस पुरेल इतका तेल साठा ठेवला पाहिजे, असे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (IEA) सांगितले आहे. दरम्यान, यावर IEAच्या काही सदस्य देशांनी आक्षेप घेतला आहे. भारत हा IEA चा पूर्ण सदस्य असलेला देश नाही. वाणिज्यिक तसेच धोरणात्मक तेल साठा ९० दिवस पुरेल इतका असेल तरीही चालते, असे IEA चे म्हणणे आहे.

७४ दिवस पुरेल इतकेच खनिज तेल व पेट्रोलियम प्रोडक्ट्स साठवून ठेवण्याची भारताची एकूण क्षमता आहे, अशी माहिती राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी दिली. IEA ने सांगितलेल्या निकषापेक्षा ही क्षमता कमी आहे.

९.५ दिवस पुरेल इतकाच तेल साठा?

भारतात कर्नाटक व आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये धोरणात्मक तेल साठा आहे. या दोन राज्यांतील तीन ठिकाणी हे तेल साठे आहेत. आपत्कालीन परिस्थितीत देशाची तेलाची व नैसर्गिक वायूची गरज भागवण्यासाठी हे तेल साठे भूगर्भात तयार करण्यात आले आहेत. पश्चिम आशियातील युद्धामुळे तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारताच्या धोरणात्मक तेल साठ्यांमध्ये ९.५ दिवस पुरेल इतकेच तेल आहे, अशी माहिती मंत्री सुरेश गोपी यांनी दिली. तेल साठ्यात बाजारातील परिस्थितीनुसार बदल होत असतात. सध्या भारताच्या धोरणात्मक तेल साठ्यात ३.३७२ दशलक्ष टन खनिज तेल आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ६४ टक्के आहे, अशी माहिती राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

पश्चिम आशिया सोडून इतर भागांतून तेलाची आयात?

भारताकडे आठ आठवडे पुरेल इतका पुरेसा खनिज तेल व इंधनाचा साठा आहे, असे भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. पश्चिम आशिया सोडून इतर भागांतून भारतीय रिफायनर्स तेल आयात करत आहे. रशियाकडून भारतात तेल आयात केले जात आहे. या तेल आयातीत येत्या काळात आणखी वाढ होईल, असे त्या अधिकाऱ्याने म्हटले होते. भारताची खनिज तेल आयात व तेल, इंधनाची रोजची गरज पाहता भारताने धोरणात्मक तेल साठ्यांमध्ये वाढ करणे अत्यावश्यक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर भारताने तेलाचे व्यवस्थापन केले आहे.

मागील काही महिन्यांत २.५-२.७ दशलक्ष बॅरेल तेल होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे दररोज भारतात आले. दरम्यान, आधी होणाऱ्या एकूण पुरवठ्यापैकी फक्त निम्मेच तेल या मार्गाने भारतात दाखल झाले आहे. त्यामुळे भारताला तेलाची साठवणूक करणे आवश्यक आहे. पश्चिम आशियातील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास भारतात तेल टंचाई निर्माण होऊ शकते.

ISPRL चा UAE तील कंपनी बरोबर करार का?

ISPRL कडे भारताच्या धोरणात्मक तेल साठ्याची जबाबदारी आहे. आपत्कालीन परिस्थितीत हा तेल साठा महत्वाचा ठरतो. तसेच याचा कमर्शियल वापर देखील करता येऊ शकतो. परंतु, त्यासाठी भारताला तेल साठा वाढवावा लागेल. तेलाच्या किंमती वाढल्यानंतर या तेल साठ्यातील तेल विकून देशाला फायदा होण्यासाठी तेल साठे वाढवण्याची गरज आहे. दरम्यान, ISPRL ने आता आखाती देशांतील कंपन्यांबरोबर भागीदारी करण्यास तयारी दर्शवली आहे. अलिकडेच ISPRLने यूएईच्या अबूधाबी नॅशनल ऑईल कंपनी बरोबर करार केला आहे. आखाती देशांतील कंपन्यांबरोबर भागीदारी केल्यास तेल स्वस्त मिळते. तेलाच्या वाहतूक खर्चात सवलत मिळते, म्हणून सरकारने भागीदारी करणे सुरू केल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.