भारताने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात साखरेच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, साखर निर्यात बंदीबाबत काही अपवाद आहेत. साखरेचे उत्पादन घटल्याने मागील काही वर्षांपासून सरकारने साखर निर्यात रोखण्याबाबत निर्णय घेतले आहेत. साखरेचे उत्पादन व मागणी यात तफावत निर्माण होऊ नये म्हणून सरकारने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे.
भारत सरकारने बुधवारी (१३ मे) याबाबत एक अधिसूचना जारी केली. ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात आले. कच्ची साखर (रिफाइन नसलेली), पांढरी साखर आणि शुद्ध साखरेबाबत निर्बंधात्मक पाऊल उचलण्यापेक्षा यावेळी सरकारने प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यास प्राधान्य दिले आहे. दरम्यान, जी साखर निर्यातीच्या अंतिम टप्प्यात आहे, ती निर्यात करण्यास काही ठराविक अटींवर मान्यता दिली जाईल, असे विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी (DGFT) सांगितले.
सरकारची अधिसूचना येण्यापूर्वी निर्यातीसाठी जहाजांवर चढवलेली साखर निर्यात करण्यास परवानगी आहे. जहाजांचे शिपिंग बिल तयार झालेले आणि जहाज भारतीय बंदरावर आलेले असल्यास साखर निर्यातीला परवानगी आहे. तसेच जी साखर कस्टम विभागाकडे सोपवली असेल अथवा कस्टम विभागाच्या ताब्यात असेल ती देखील निर्यात करता येईल. युरोपियन युनियन आणि अमेरिकेला साखर पाठवण्याबाबत कोणतीही बंदी नसल्याचे अधिसूचनेतून स्पष्ट करण्यात आले. टॅरिफ रेट कोटा योजनेनुसार युरोपियन युनियन व अमेरिकेला साखर पाठवली जाणार आहे. भारत सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, भारत सरकारच्या परवानगीनेच साखर निर्यात केली जाईल. तसेच अन्न सुरक्षेची खात्री करण्यासाठी जे देश साखरेसाठी विनंती करतील त्यांना साखर पुरवली जाईल.
भारतातून किती साखर निर्यात केली जाते?
ब्राझीलनंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक व निर्यातदार देश आहे. २०२५-२६ या मार्केटिंग वर्षाच्या (ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६) पहिल्या सत्रात भारतात २७.१२ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले. त्यापैकी ३.१५ लाख टन साखर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत निर्यात करण्यात आली. अखिल भारतीय साखर व्यापार संघटनेने याबाबत पीटीआयला मार्च महिन्यात माहिती दिली. त्यापैकी २ लाख ५७ हजार ९७१ टन पांढरी साखर होती. तर ५३ हजार ६६४ टन रिफाइन (शुद्धिकरण केलेली) साखर होती.
भारतातून सर्वाधिक साखर निर्यात संयुक्त अरब अमिराती (यूएई) ला करण्यात आली. ७९ हजार ६८३ टन साखर यूएईला पाठवण्यात आली होती. ७१ हजार ८१३ टन साखर अफगाणिस्तान, तर ४५ हजार ८०१ टन साखर जिबौटी आणि २१ हजार ३३० टन साखर टांझानियाला निर्यात करण्यात आली होती. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताने साखर निर्यातीचा कोटा २ दशलक्ष टनने वाढवला. तसेच ५ लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीलाही मंजूरी देण्यात आली होती.
साखरेच्या किंमतीवर काय परिणाम होणार?
भारतातील साखर उत्पादन सलग दुसऱ्या वर्षी घटण्याची शक्यता असल्याने भारताने साखर निर्यात बंदी लागू केली आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी गेल्या महिन्यात ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिली. हंगाम सुरू होण्यापूर्वी ‘इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (ISMA) आणि ‘नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड’ (NFCSF) यांसारख्या उद्योग संस्थांनी २८.५ ते २९ दशलक्ष टन साखरेची मागणी देशात राहील असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच ३१ दशलक्ष टन उत्पादनाचा अंदाज वर्तवला होता.
NFCSF च्या आकडेवारीनुसार, अतिवृष्टीमुळे ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे या वर्षी गाळप सुरू केलेल्या ५४१ साखर कारखान्यांपैकी ४६७ कारखान्यांना मार्च अखेरपर्यंत आपले कामकाज बंद करावे लागले. नवी दिल्लीतील एका जागतिक व्यापार केंद्राच्या व्यापाऱ्याने एप्रिलमध्ये वृत्तसंस्थेला सांगितले की, “मोठ्या प्रमाणावर साखरेचा अतिरिक्त साठा होईल या आशेने सरकारने निर्यातीला परवानगी दिली होती. परंतु, आता मागणीची पूर्तता करू शकेल इतकेही साखर उत्पादन होण्याची शक्यता नाही, हे निश्चित झाले आहे.” ‘एल निनो’ हवामानाच्या अंदाजामुळे यावर्षी मान्सूनवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढच्या हंगामातील उत्पादन देखील कमी होण्याची चिंता वाढली आहे.
भारत हा साखरेचा प्रमुख निर्यातदार असल्याने या बंदीमुळे जागतिक साखरेच्या पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो आणि परिणामी जागतिक बाजारात साखरेच्या किंमती वाढू शकतात. इतर साखर उत्पादक देशांमध्येही हवामानातील बदलांमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती उद्भवू शकते. निर्यातीसाठी मंजूर केलेल्या १.५९ दशलक्ष मेट्रिक टन साखरेपैकी व्यापाऱ्यांनी सुमारे ८ लाख टनांसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असे रॉयटर्सने म्हटले आहे. यापैकी ६ लाख टनांहून अधिक साखर आधीच रवाना झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. भारताच्या या साखर निर्यात बंदीचा फायदा ब्राझील आणि थायलंड सारख्या प्रतिस्पर्धी उत्पादक देशांना होईल. त्यांना आशियाई आणि आफ्रिकन देशांना होणारा पुरवठा आणखी वाढवता येईल.
भारताने बुधवारी केलेल्या या घोषणेनंतर न्यूयॉर्कमध्ये कच्च्या साखरेचे फ्युचर्स दोन टक्क्यांहून अधिक वाढले, तर लंडनमध्ये पांढऱ्या साखरेचे फ्युचर्स तीन टक्क्यांनी वधारले. ‘इकोनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, भू-राजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना साखरेची निर्यात सुरू राहिल्यास भारताचा राखीव साठा कमी होऊ शकतो अशी भीती अधिकाऱ्यांना वाटते. साखरेसाठी भारतावर अवलंबून असलेल्या आशिया, आफ्रिका, पश्चिम आशियातील देशांवर या बंदीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. साखर हा एक जीवनावश्यक घटक आहे. साखरेचा पुरवठा विस्कळीत झाल्यास अन्न व पेय उद्योगावरही परिणाम होतो. सरकारी सूत्रांनी ‘रॉयटर्स’ला सांगितले की, साखरेच्या देशअंतर्गत किंमतीत मोठी वाढ होऊ नये म्हणून केंद्र सरकार खबरदारी घेत आहे.
