देशात नागरीकरणाचा वेग प्रचंड असून, ग्रामीण भागातून शहरांमध्ये होणारे स्थलांतर सातत्याने वाढत आहे. देशातील २०११ च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या ३७.७ कोटी म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ३१.१६ टक्के होती. ही लोकसंख्या २०३६ पर्यंत ६०.१ कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात शहरांचा वाटा ६० टक्क्यांवर पोहोचला असून, २०३० पर्यंत तो ७० टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर देशातील महानगरे आणि शहरांच्या आर्थिक कामगिरीचा आलेख चैतन्यदायी शहर निर्देशांकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
पार्श्वभूमी काय?
‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ या संस्थेने चैतन्यदायी महानगरे आणि शहरांची याही जाहीर केली आहे. त्यात देशातील ८०० जिल्ह्यांची उपग्रहाद्वारे घेण्यात आलेली छायाचित्रे आणि आर्थिक निकष या आधारे मूल्यमापन करण्यात आले. हे मूल्यमापन एप्रिल ते जून या कालावधीत करण्यात आले. उच्च क्षमतेच्या छायाचित्रांद्वारे त्या शहरातील रात्रीच्या वेळची छायाचित्रे घेण्यात आली. या छायाचित्रांच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र, वाहतूक यांचे विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर संबंधित शहरातील महामार्ग आणि वाहतूक व्यवस्थेच्या जाळ्याचेही मूल्यमापन करण्यात आले.
पुणे पहिल्या स्थानी का?
देशातील चैतन्यदायी महानगरांच्या यादीत पुण्याने पहिले स्थान पटकाविले आहे. पुण्याने माहिती-तंत्रज्ञान (आयटी) सेवा, अत्याधुनिक निर्मिती, वाहननिर्मिती, शिक्षण आणि नवोक्रपम आधारित आर्थिक सक्रियता यात चांगली कामगिरी नोंदविली आहे. पुण्यात सूक्ष्म उद्योग १० लाख ७३ हजार ९९४ असून, लघुद्योग ११ हजार ८३४, तर मध्यम उद्योग १ हजार ५७ असल्याचे उद्यमनोंदणीची आकडेवारी दर्शविते. यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे पुणे हे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
मुंबई कोणत्या स्थानी?
चैतन्यदायी महानगरांच्या यादीत देशाची आर्थिक राजधानी मुंबई चौथ्या स्थानी आहे. देशातील सागरी व्यापारात मुंबईचे योगदान तब्बल ७० टक्के आहे. देशातील प्राप्तिकर संकलनात एकट्या मुंबईचा वाटा ३३ टक्के आहे. त्याचबरोबर दागिने, मौल्यवान रत्ने, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर उत्पादनांची निर्यातही येथून मोठ्या प्रमाणात होते. मुंबईत सूक्ष्म उद्योग ९ लाख ६ हजार ८७७ असून, लघुउद्योग २२ हजार ४४९ आणि मध्यम उद्योग ३ हजार ४० आहेत.
इतर महानगरांची स्थिती काय?
महानगरांच्या यादीत अहमदाबाद दुसऱ्या स्थानी असून, तेथून रसायने, औषधे, वाहनांच्या सुट्या भागाची निर्यात होते. त्याचबरोबर वस्त्रोद्योग, दागिने या क्षेत्रात ते आघाडीवर आहे. या यादीत कोलकता तिसऱ्या स्थानी असून, तेथून प्रामुख्याने लोह व पोलादाची निर्यात होते. तेल, व्यापार आणि वित्तीय सेवांमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. देशातील सायबर सिटी म्हणून ओळखले जाणारे हैदराबाद यादीत पाचव्या स्थानी असून, दागिने व मौल्यवान रत्ने, वाहनांचे सुटे भाग यांची निर्यात येथून प्रामुख्याने होते. माहिती-तंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती या दोन उद्योगांचा येथे मोठ्या प्रमाणात विस्तार आहे. महानगरांच्या यादीत चेन्नई सहाव्या स्थानी असून, येथून प्रामुख्याने खनिजे व इंधन आणि दागिने व मौल्यवान रत्नांची निर्यात होते. वाहननिर्मिती, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचे हे केंद्र आहे. देशाची राजधानी दिल्ली सातव्या स्थानी असून, वाहनांचे सुटे भाग, दागिने व मौल्यवान रत्नांची निर्यात येथून प्रामुख्याने होते. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे हे केंद्र आहे. या यादीत बंगळुरू आठव्या स्थानी असून, येथून प्रामुख्याने विमान आणि वाहनांच्या सुट्या भागाची निर्यात होते. माहिती-तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संशोधन व विकास क्षेत्रात ते आघाडीवर आहे.
उदयोन्मुख शहरे कोणती?
महानगरांपलीकडे आर्थिक विकासाचे वारे वाहू लागले असून, अनेक उदयोन्मुख शहरे वेगाने प्रगती करीत आहेत. उदयोन्मुख शहराचा विचार करताना त्या जिल्ह्याचाही विचार करण्यात आला आहे. उदयोन्मुख २५ शहरांच्या यादीत अनक्रमे पहिल्या तीन स्थानी पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा, उत्तर २४ परगणा आणि महाराष्ट्रातील ठाणे ही शहरे आहेत. त्याचबरोबर या यादीत राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर या शहरांचाही समावेश आहे. गेल्या दशकभरात दिमापूर, पंचमहल, आणंद, अयोध्या, रामपूर, बस्ती, शाल्मली, बौध, औरंगाबाद आणि कोडर्मा या जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली आहे. दीर्घकालीन आर्थिक विकासाची गती त्यांनी २०१२पासून कायम ठेवली आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
भविष्यात संधी कुठे?
देशात नागरीकरणाचे प्रचंड वारे वाहत असताना सर्वसमावेशक आणि भौगोलिकदृष्ट्या विकेंद्रित आर्थिक प्रगती सुरू आहे. यातून व्यवसाय, गुंतवणूक, गुणवत्ता आणि पायाभूत सुविधा विकास या सर्वच पातळ्यांवर उदयोन्मुख शहरांची प्रगती होत आहे. या शहरांतून देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळत आहे. देशात नवीन औद्योगिक पट्टे विकसित होत असून, ते गुंतवणूक, उद्योगांसह धोरणकर्त्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत. भविष्यात पायाभूत सुविधांची मागणी, भांडवलाचा ओघ आणि नागरी विकास या दृष्टिकोनातून उदयोन्मुख शहरे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा अंदाज डन अँड ब्रॅडस्ट्रीटचे मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अरुण सिंग यांनी वर्तविला.
sanjay.jadhav@expressindia.com
