India vs New Zealand T20 World Cup Final tactical breakdown of the ‘Powerplay Overkill’: क्रिकेट हा भारताचा धर्म मानला जातो आणि कालचा भारत-न्यूझीलंड टी-२० विश्वचषक अंतिम सामना या धर्माच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या सामन्यात केवळ धावांचे रेकॉर्ड्स झाले नाहीत, तर ‘पॉवरप्ले ओव्हरकिल’ (Powerplay Overkill) या एका नव्या शब्दाने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘पॉवरप्ले ओव्हरकिल’
काल पार पडलेला भारत- न्यूझिलंड यांच्यामधील टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना अनेक अर्थांनी वेगळा ठरला. या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे अनेक वेगवेगळे रेकॉर्डस् नोंदले गेले, त्याचप्रमाणे प्रसारणाच्या संदर्भातीलही अनेक नवीन उच्चांक कालच्या सामन्याच्या वेळेस प्रस्थापित झाले. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून ते अखेरच्या चेंडूपर्यंत प्रेक्षकसंख्या सातत्याने वाढत होती. अनेकदा अशा सामन्यांमध्ये सुरुवातीचा कल पाहून प्रेक्षक कमी-अधिक होत असतात. पण काल भारतीय फलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच केलेल्या धुँवाधार आक्रमणानंतर प्रेक्षकसंख्या वाढतच गेली. आता याच ‘पॉवरप्ले ओव्हरकिल’ रणनीतिमुळे भारत हा सामना पहिल्या सहा षटकांमध्येच जिंकला होता का, याची चर्चा जगभर सुरू आहे. काय आहे ही ‘पॉवरप्ले ओव्हरकिल’ रणनीति, ते समजून घेऊ.
पहिल्या सहा षटकांतच सामना निर्णायक
क्रिकेटमध्ये अनेकदा सामना शेवटच्या काही चेंडूंवर ठरतो, असे म्हटले जाते. परंतु काल झालेल्या भारत- न्यूझिलंड टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याकडे बारकाईने पाहिल्यास एक वेगळाच मुद्दा समोर येतो, तो म्हणजे हा सामना प्रत्यक्षात पहिल्या सहा षटकांतच निर्णायक ठरला होता का? भारतीय फलंदाजांनी ‘पॉवरप्ले’मध्येच केलेल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे आता सर्वत्र चर्चा आहे ती ‘पॉवरप्ले ओव्हरकिल’ची!

अंतिम सामना नेहमीच तणावपूर्ण
टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्ले म्हणजे पहिली सहा षटके. या काळात केवळ दोनच क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर ठेवता येतात. त्यामुळे फलंदाजांना आक्रमक खेळण्याची संधी मिळते. पण बहुतांश संघ या संधीचा वापर करताना सावधगिरी बाळगतात. काही धावा वेगाने करायच्या, पण विकेट्सही जपायच्या, अशीच सर्वसाधारण रणनीति असते. अंतिम सामना हा सर्वच संघांसाठी तणावपूर्ण असतो, अशा प्रसंगी तर अनेक संघ सुरुवातीला अतिशय संयमाने खेळतात.
न्यूझिलंडच्या संघावर स्ट्रॅटेजिक हल्ला
भारतीय संघाने मात्र वेगळा मार्ग निवडला. या अंतिम सामन्यात भारतीय सलामीवीरांनी पारंपरिक ‘आक्रमण पण संयमी’ या सूत्राला तिलांजलि दिली आणि पॉवरप्लेचा वापर त्यांनी ‘स्ट्रॅटेजिक हल्ल्या’सारखा केला. सुरुवातीपासूनच त्यांनी गोलंदाजांना लक्ष्य केले आणि चौकार- षटकारांच्या आतषबाजीने सामन्याची दिशाच बदलली.
‘मॅचअप’चा वापर
या आक्रमणात एक महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे ‘मॅचअप’चा वापर. साधारणपणे फलंदाज एखाद्या गोलंदाजाला पाहून खेळण्याची पद्धत ठरवतात. परंतु या सामन्यात भारतीय फलंदाजांनी गोलंदाज कोण आहे यापेक्षा त्याच्या कमकुवत जागा कोणत्या आहेत, याचा अचूक अंदाज घेतला. कोणत्या चेंडूवर ड्राइव्ह खेळायचा, कोणत्या चेंडूला पुल करायचा, कुणाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारायचा या सर्व गोष्टी पूर्वनियोजित असल्याचे जाणवत होते.

…आणि भारताला मोमेंटम मिळाला
याचा परिणाम न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर स्पष्टपणे पाहायला मिळाला. पहिल्याच काही षटकांतच अनेकदा चेंडू सीमापार गेला. चौकार आणि षटकारांच्या मालिकेमुळे धावगती झपाट्याने वाढली. टी-२० सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मोमेंटम’. एकदा तो मिळाला की, गोलंदाजांवर दबाव वाढत जातो.
न्यूझिलंडचे नियोजन कोलमडले
भारताने पॉवरप्लेमध्ये हेच केले. धावांचा वेग इतका वाढवला की न्यूझीलंडच्या गोलंदाजांना त्यांच्या नियोजनानुसार गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. साधारणपणे मधल्या षटकांत न्यूझीलंडचा संघ फिरकी आणि नियंत्रित गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्याला रोखण्यात तरबेज मानला जातो. परंतु पॉवरप्लेमध्येच धावांचा डोंगर उभा राहिल्यामुळे त्यांची ही योजना पुरती कोलमडली.
सामन्याचा कल भारताच्या दिशेने झुकला
पॉवरप्ले संपेपर्यंत स्कोअरबोर्डवर उभ्या राहिलेल्या धावसंख्येने सामन्याचा मानसिक तोल बदलला. टी-२० क्रिकेटमध्ये लक्ष्य जितके मोठे, तितका पाठलाग करणाऱ्या संघावर मानसिक ताण वाढत जातो. फलंदाजांना सुरुवातीपासूनच मोठे फटके खेळावे लागतात. यामुळे धोका वाढतो आणि चुका होण्याची शक्यता जास्त असते.
न्युझिलंड शेवटपर्यंत सावरू शकले नाही
भारताच्या फलंदाजांनी पहिल्या सहा षटकांत केलेल्या धुँवाधार आक्रमकामुळे हा मानसिक ताण न्यूझीलंडच्या संघावर लगेचच आलेला पाहायला मिळाला. सामन्याच्या पुढील टप्प्यांमध्ये न्यूझीलंडने चांगली गोलंदाजीही केली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि सुरुवातीच्या त्या जबर धक्क्यातून ते शेवटपर्यंत पूर्णपणे सावरू शकले नाहीत.
सामन्याचा पाया
भारतीय संघाच्या पॉवरप्ले दरम्यानच्या या आक्रमणामुळे आता टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेचा वापर असाच या नव्या पद्धतीने होणार का?, याची चर्चा हा सामना संपल्यानंतर लगेचच सुरू झाली. पूर्वी पॉवरप्लेच्या काळात थोडे आक्रमण आणि विकेट वाचवण्याचा संयम असे दुहेरी सूत्र होते. आता मात्र अनेक संघ पॉवरप्लेचा वापर ‘सामन्याचा पाया’ रचण्यासाठी करताना दिसतात. मोठ्या स्पर्धांमध्येही धोकादायक आक्रमण करण्याची तयारी वाढलेली दिसते.

आधुनिक क्रिकेटचा बदलता स्वभाव
यामागे आधुनिक टी-२० क्रिकेटचा बदलत चाललेला स्वभाव हे कारण आहे, असेही या क्षेत्रातील तज्ज्ञ मानतात. फ्रँचायझी लीग्समुळे फलंदाज आता मोठ्या धावसंख्येला घाबरत नाहीत. २०० पेक्षा जास्त धावा करणे किंवा त्यांचा पाठलाग करणे हे आता नेहमीचेच मानले जाते. त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमक खेळण्याची मानसिक तयारी संघांमध्ये दिसते.
सामन्याचा कल वळवणारा निर्णायक क्षण
या पार्श्वभूमीवर भारत- न्यूझिलंड या अंतिम सामन्यातील पॉवरप्ले हा केवळ धावांचा डोंगर उभारणारा टप्पा नव्हता, तर तो संपूर्ण सामन्याचा कल वळवणारा निर्णायक क्षण ठरला. सुरुवातीच्या षटकांत केलेल्या आक्रमणामुळे भारताने न्यूझीलंडच्या रणनीतिचा पायाच उखडला आणि नंतरच्या षटकांमध्येही सामना आपल्या नियंत्रणात ठेवला.
पहिल्या सहा षटकांतच विजयाची पायाभरणी
क्रिकेटमध्ये सामना नेमका कोणत्या क्षणी जिंकला जातो हे सांगणे अवघड असते. शेवटचा फटका, एखादी महत्त्वाची विकेट किंवा एखादा अप्रतिम झेल… अशा क्षणांची नोंद इतिहासात होते. परंतु या टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याने कदाचित नवा पायंडा घालून दिलेला दिसतो, तो म्हणजे कधी कधी सामना शेवटच्या षटकांत नव्हे, तर पहिल्याच सहा षटकांत जिंकला जातो!
