भारतीय क्रिकेट संघाने चुरशीच्या लढतीत इंग्लंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता जेतेपद राखून इतिहास घडविण्यासाठी त्यांच्यापुढे न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. उपांत्य सामना जिंकला असला, तरी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
अभिषेक शर्माचा हरवलेला फॉर्म
भारताने अंतिम सामन्यापर्यंतच्या प्रवासात केवळ ‘अव्वल आठ’ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावला. मात्र, संघ व्यवस्थापनाला सर्वाधिक चिंता असेल ती अभिषेक शर्माच्या लयीबाबत. भारताला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी अभिषेकवर असते. मात्र, संपूर्ण विश्वचषकात चुकीचे फटके खेळत तो बाद होत आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीच्या तीन सामन्यांत त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतरही झिम्बाब्वेविरुद्ध ५५ धावांची खेळी वगळता त्याला प्रभाव पाडता आलेला नाही. असे असूनही अभिषेकचे अंतिम अकरामधील स्थान कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम सामन्यातही तो अपयशी ठरला आणि भारताने हा सामना गमावला, तर त्याचे टी-२० संघातील स्थानच धोक्यात येईल हे निश्चित. पण या सामन्यात त्याला फॉर्म गवसला, तर भारताच्या दृष्टीने ती जमेची बाजू ठरेल.
मधल्या फळीत सातत्याचा अभाव
भारताच्या मध्यक्रमात इशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या व शिवम दुबे यांसारखे चांगले फलंदाज आहेत. हे सर्व फलंदाज मोठे फटके मारण्यास सक्षम आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या सर्वांच्या निराशाजनक कामगिरीचा फटकाही भारताला बसला होता. भारताला जेतेपद मिळवायचे झाल्यास या सर्व खेळाडूंची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. इशानने या ट्वेन्टी-२० विश्वचषकात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर भारतीय संघाने फलंदाजांच्या क्रमवारीत बदल केले. त्याचा फायदाही संघाला झालेला दिसत आहे. सलामीला संजू आणि अभिषेक आल्याने भारताने डाव्या आणि उजव्या फलंदाजाचे गणित योग्य बसले. यानंतरही परिस्थितीनुसार फलंदाजांचे क्रम बदलले गेले. घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारताचे पारडे जड असले, तरीही न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेला नमवून अंतिम फेरीत पोहोचल्याने त्यांना कमी लेखण्याची चूक यजमान करणार नाहीत.
वरुण चक्रवर्ती की कुलदीप यादव?
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ वरुण चक्रवर्तीला मुख्य फिरकीपटू म्हणून संधी आहे. त्यामुळे चायनामन कुलदीप यादवला अंतिम अकराबाहेर राहावे लागत आहे. कुलदीपला केवळ पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. वरुण या विश्वचषक स्पर्धेत १३ गड्यांसह संयुक्तपणे सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज आहे. मात्र, त्याने धावाही खूप दिल्या आहे. त्याने सात बळी पूर्ण सदस्य नसलेल्या देशांविरुद्ध मिळवले आहेत. कुलदीपने आपल्या ट्वेन्टी-२० कारकीर्दीत ५४ सामन्यांत ९५ गडी बाद केले आहेत. तर, चक्रवर्तीने ४४ सामन्यांत ७२ बळी मिळवले. कुलदीप २०२४च्या विश्वविजेत्या संघाचा भाग होता. मात्र, त्यानंतरही अंतिम अकरामध्ये स्थान मिळविण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक कारकीर्दीत कुलदीपने सहा सामन्यांत ११ गडी बाद केले आहेत. तर, चक्रवर्तीच्या नावे ११ सामन्यांत १३ बळी आहेत. २०२५ मध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने वरुण व कुलदीप दोघांनाही अंतिम अकरामध्ये स्थान दिले होते. कुलदीपने सात सामन्यांत १७ बळी मिळवले होते. तर, चक्रवर्तीच्या नावे सात गडी होते. वरुणला संघ व्यवस्थापनाचा चांगला पाठिंबा असल्याने त्याला नेहमीच अंतिम अकरामध्ये स्थान मिळत आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वरुणने ६४ धावा दिल्या. तरीही, अक्षर पटेलने तो भारतासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज असल्याचे म्हटले. त्यामुळे अंतिम सामन्यातही कुलदीपला संधी मिळते का याकडे सर्वांचे लक्ष असेल.
बुमरावरील ओझे कोण कमी करणार?
जसप्रीत बुमरा हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो. त्याची गोलंदाजी शैली, विविधता यांमुळे प्रतिस्पर्धी संघांच्या फलंदाजांना अडचण येते. भारतासाठी बुमरा नेहमीच तारणहार ठरला आहे. मात्र, गेल्या काही काळात दुखापतीमुळे त्याचे कार्यभार व्यवस्थापन केले जाते. गेला विश्वचषक आणि आताही बुमराने निर्णायक क्षणी योगदान दिले आहे. भारत आणि प्रतिस्पर्धी यांमधील बुमरा हाच मोठा फरक ठरतो. मात्र, बुमराला दुसऱ्या बाजूने म्हणावी तशी साथ मिळत नाही. अर्शदीप सिंग जरी बळी मिळवत असला तरी, तो खूप धावा देतो याचा प्रत्यय भारताला अनेकदा आला आहे. त्यामुळे बुमरावर अनेकदा दबाव वाढतो. भारताने हर्षित राणा जायबंदी झाल्यानंतर मोहम्मद सिराजला स्थान दिले. मात्र, त्याला केवळ अमेरिकेविरुद्ध स्थान देण्यात आले. त्यातही त्याने तीन गडी बाद केले. त्यानंतर सिराजला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेच नाही. संघ व्यवस्थापन अर्शदीपच्या जागी सिराजला संधी देईल का, हे पाहावे लागेल. यासह फिरकीपटूंनाही योगदान द्यावे लागेल. हार्दिक पंड्या व शिवम दुबे यांचे पर्याय भारताकडे आहेत. विशेष करून दुबेला अद्यापही गोलंदाजीत सुधारणा करता आलेली नाही. त्यामुळे आपली कामगिरी उंचवावी लागेल.
न्यूझीलंडच्या ‘अष्टपैलू’ ताकदीशी सामना
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकतर्फी विजय साकारत न्यूझीलंडने अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. यामध्ये फिन ॲलनने स्फोटक खेळी केली होती. त्याला सलामीवीर टीम सेफर्टची साथही मिळाली. याशिवाय संघाला चांगले अष्टपैलू असल्याचा फायदाही मिळाला. संघाकडे रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, कर्णधार मिचेल सँटनर, जेम्स नीशम आणि कोल मॅकॉन्चीसारखे अष्टपैलू आहेत. त्यामुळे संघ आणखी भक्कम दिसतो. या सर्वांनी गरजेच्या वेळी संघासाठी योगदान दिले आहे. यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजीतही चांगली खोली आहे. यामधील रचिन, फिलिप्स, सँटनर हे चांगले फिरकी गोलंदाजी करतात. त्यामुळे भारतीय फलंदाजांसाठी आव्हान सोपे नसेल. त्यातच मॅट हेन्री व लाॅकी फर्ग्युसनसारखे वेगवान गोलंदाजही त्यांच्याकडे आहेत. भारताने विश्वचषकापूर्वी झालेल्या मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध विजय नोंदवला असला, तरीही अंतिम सामन्यातील दबाव हा वेगळा असतो. भारताला घरच्या चाहत्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. मात्र, न्यूझीलंडचा संघ पाहता भारताला जेतेपद राखणे सोपे नसेल. भारत व न्यूझीलंड संघ यापूर्वी तीनदा ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. २००० च्या चॅम्पियन्स करंडक अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताला नमविले होते. २०२१ ‘डब्ल्यूटीसी’ अंतिम सामन्यातही भारताच्या पदरी निराशा पडली होती. २०२५ च्या चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम लढतीत भारताने न्यूझीलंडवर विजय नोंदवला होता.
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान सहा सामने खेळले गेले. त्यात फलंदाजांना फायदा मिळाला होता. गेल्या काही सामन्यांत भारतीय फलंदाजांची लय पाहता फलंदाजांना धावा करण्याची चांगली संधी आहे. न्यूझीलंडकडेही चांगले फलंदाज आहेत. खेळपट्टी फलंदाजांना पूरक असल्याने सामना चुरशीचा होणे अपेक्षित आहे. मात्र, या स्टेडियमवर भारताला दक्षिण आफ्रिकेकडून ‘अव्वल आठ’ फेरीतील सामन्यात धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावे लागले. तसेच, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही भारताच्या पदरी निराशा पडली होती. त्यामुळे आता हा इतिहास बदलण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
