India Vs Pakistan Ishan Kishan: भारत-पाकिस्तान सामना म्हणजे फक्त क्रिकेट नव्हतंच कधी; ते असायचं क्रिडांगणावरचं युद्धच. दोन्ही देश त्याच तडफेनं खेळायचे. प्रत्येक चेंडूवर इतिहासाचं एक अदृश्य वजन जाणवायचं, प्रत्येक षटकात तणाव, आणि शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता हीच खरी त्या ‘ग्रेटेस्ट राइव्हलरी’ची ओळख होती. पण कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर काल रात्री रविवारी झालेल्या एकतर्फी सामन्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न आला, तो म्हणजे भारत- पाक सामना ही खरंच ‘स्पर्धा’ राहिली आहे की, आता ती केवळ एकतर्फीच झाली आहे?

निर्णायक ठरले ते १४ चेंडू

भारताने ६१ धावांनी पाकिस्तानला हरवले. स्कोअरकार्डवर हे फक्त धावांमधला फरक दिसतो. पण खरं तर तो होता दोन मानसिकतांमधला सुस्पष्ट दिसणारा फरक. दोन्ही संघांच्या मानसिकतेमध्ये खूप मोठे अंतर आहे, हे या सामन्याने स्पष्ट केले. सामना २०व्या षटकापर्यंत तर दूरच… आठव्या षटकातच तो निर्णायक ठरला होता, तोही केवळ १४ चेंडूंमध्येच!

ishan Kishan Statement After POTM Award said I have done well but my focus is firmly on the World Cup IND vs NZ
इशान किशन सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाला (फोटो-X)

सामन्याचा कणा मोडणारा टप्पा

स्कोअरबोर्डवर इशान किशन ४० चेंडूत ७७ असं झळकत होतं. पण सामन्याची दिशा बदलली ती एका विलक्षण टप्प्यावर. क्रिकेटमध्ये भागीदारी महत्त्वाची असते; परंतु मधल्या षटकांत सलग १४ चेंडू एकट्या इशांत किशनने खेळले आणि तिलक वर्माला स्ट्राइकच मिळाला नाही. हा केवळ सांख्यिक योगायोग नव्हता; तर तो पाकिस्तानी संघासाठी होता जबर मानसिक धक्का.

रिव्हर्स स्वीप, कव्हर ड्राइव्ह, आणि लाँग-ऑनवरचा षटकार

या १४ चेंडूंमध्ये किशनने चार वेगवेगळ्या गोलंदाजांना थेट लक्ष्य केले ते होते Shadab Khan, Salman Ali Agha, Saim Ayub आणि Abrar Ahmed.त्या ४१ धावांमध्ये होते धडाकेबाज फटके, रिव्हर्स स्वीप, कव्हर ड्राइव्ह, आणि लाँग-ऑनवरचा षटकार. शादाब खानच्या चेहऱ्यावरचा भाव कॅमेऱ्याने नेमका टिपला होता. गुगली, स्लायडर, पारंपरिक लेग-ब्रेक… सर्व पर्याय वापरूनही पाकिस्तानी गोलंदाजांना उत्तर सापडत नव्हते. कर्णधार Babar Azam लाही काही सुचत नव्हते. खर तर त्याच क्षणी भारताने ही क्रिडांगणावरची लढाई जिंकलेली होती.

jasprit bumrah
jasprit bumrah (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

‘स्पिन ट्रॅप’ का कोसळला?

सामन्यापूर्वीची कथा पाकिस्तानच्या बाजूने झुकलेली होती. श्रीलंकेत दीर्घ सराव, दमट वळणदार खेळपट्टी, आणि ‘स्पिनर्सची फौज’ खरं तर पाकिस्तानसाठी कागदावर सर्व काही अनुकूल होते. आर. प्रेमदासा स्टेडियमवरील खेळपट्टी पकड घेत होती; त्यातच लांब असलेली सीमारेषा, मधल्या षटकांत पाकिस्तानी स्पिनचा प्रभाव कदाचित वाढणारा अशी स्थिती होती. भारताचे फलंदाज अलीकडे सपाट, उसळी असणाऱ्या भारतीय पट्ट्यांवर खेळले होते आणि म्हणून कदाचित पाकिस्तानचा ‘स्पिन ट्रॅप’ यशस्वी ठरेल, असा अनेकांचा अंदाज होता.

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे टेम्पलेट

पण भारताने ‘ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे टेम्पलेट’ स्वीकारले, सुरुवातीचा ओलावा शोषून घ्या, क्षेत्ररक्षणातील मोठ्या सीमारेषांचा वापर करा आणि योग्य क्षणी एक फलंदाजांनी गती वाढवायची. इशांत किशनने मात्र सारे नियमच नाकारले. इतर भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत एकूण केवळ नऊ चौकार मारले; किशनने एकट्याने १० चौकार व ३ षटकार लगावले. त्यामुळे पाकिस्तानला क्षेत्ररचना सतत बदलावी लागली डीप पॉइंट, लाँग-ऑफ, डीप मिडविकेट पण सारे काही निष्फळ ठरले. ही केवळ आक्रमकता नव्हती; तर ते समोर आलेल्या परिस्थितीवर मिळवलेलं अचूक नियंत्रण होतं. केवळ ‘तयारी’वर अवलंबून राहणाऱ्या संघाविरुद्ध परिस्थिती पाहून त्यानुसार ‘क्षणोक्षणी बदल’ करणारा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला. सराव तर महत्त्वाचा असतोच पण युद्धभूमीवर परिस्थिती पाहून रणनीतिमध्ये बदल करणाराच अखेरीस विजयी होतो. भारताच्या बाबतीतही तेच महत्त्वाचे ठरले.

गोलंदाजीतील शिस्त: १३ धावा, ३ बळी

१७६ धावांचे लक्ष्य हे खरं तर प्रेमदासाच्या खेळपट्टीवर आव्हान होते; पाकिस्तानसाठी ते आव्हापेक्षाही अधिक दडपण ठरले. त्यांचा मधली फळी ही फारशी विश्वसनीय राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या संघाचा सारा भार हा त्यांच्या सलामीवीरांवर असतो. तर भारताची पॉवरप्ले मधली गोलंदाजी ही अप्रतिम रणनीति ठरावी, अशीच होती.

  • Hardik Pandyaने सलग तीन डॉट बॉल टाकत दबाव वाढवला आणि नंतर बाहेरच्या शॉर्ट चेंडूचे ‘आमिष’ फलंदाजाला दाखवले, तिथे केलेली चूक पाकिस्तानला भारी पडली.
  • Jasprit Bumrah म्हणजे जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक. त्याने इन-स्विंगिंग यॉर्करने सैम अयूबला खिळवून ठेवले. चेंडू पायाजवळ; बॅट खाली यायच्या आत स्टंप उखडलेले होते.
  • १३ धावांत तीन बळी… खर तर सामना तिथेच संपला होता. नंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाबर आझमचा उतावळा फटका म्हणजे पाकिस्तानसाठी सारे काही संपल्याचाच पुरावा होता.

भारत- पाक तुलना

India-Pakistan-Cricket-Comparision
भारत- पाकिस्तान तुलनात्मक तक्ता


सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत १७५ धावा या ‘आवश्यकतेपेक्षा २० अधिकच’ होत्या, असे म्हटले. टी-२०मध्ये २० धावांचा फरक हा एरवीच्या ६० धावांइतका असतो, असे अनुभवी क्रिकेटपटू नेहमीच सांगतात.

‘आउट-ऑफ-द-बॉक्स’

प्रश्न केवळ कौशल्याचा नाही; तर तो मानसिकतेचा आहे, हे या भारत- पाक सामन्यात पाहायला मिळाले. जबरदस्त दडपण असलेल्या सामन्यांत ‘आउट-ऑफ-द-बॉक्स’ विचार, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि एक खेळाडूंनी स्वतःहून पुढे येत जबाबदारी उचलण्याची वृत्ती हे सारे महत्त्वाचे ठरते. या सर्व गोष्टी भारतीय संघाकडे पुरेपूर होत्या. पाकिस्तानकडे सराव होता; पण अनपेक्षित प्रसंगात उत्तर शोधण्याची लवचिकता मात्र त्यांच्याकडे दिसली नाही.

‘ग्रेटेस्ट राइव्हलरी’आता केवळ नावापुरतीच?

रायव्हलरी जिवंत राहते ती अनिश्चिततेमुळे. जेव्हा निकालाचा अंदाज आधीच येतो, तेव्हा स्पर्धेचा ‘इव्हेंट’ होतो, त्यात फारशी गंमत राहात नाही. कोलंबोतील सामन्यात भारताने जिंकणे ही केवळ औपचारिकताच राहिलेली होती.

भावनिकदृष्ट्या मोठा पण एकतर्फीच सामना?

तरीही क्रिकेटचे सौंदर्य असे की, एका मालिकेत चित्र बदलू शकते. पाकिस्तानकडे प्रतिभा आहे, पण तिला नवा दृष्टिकोन, मानसिक सुस्पष्टता आणि आयत्या वेळेस परिस्थिती पाहून रणनीति बदलण्याचे धाडस दाखवावे लागेल. तोपर्यंत भारत-पाकिस्तान सामना हा भावनिकदृष्ट्या मोठा राहील; स्पर्धात्मकदृष्ट्या मात्र कदाचित एकतर्फीच असेल!