प्रशिक्षक गंभीरची अनाकलनीय रणनीती 
गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, त्यानंतर भारताने कसोटी सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली. घरच्या मैदानांवर अभेद्य असलेल्या भारतीय संघाला येथे पराभूत व्हावे लागले. गेल्या वर्षी न्यूझीलंड आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला आपल्याच मैदानात एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यातही अपयश आले आहे.

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या १९ कसोटींमध्ये भारताला १० सामने गमवावे लागले. यातील पाच पराभव घरच्या मैदानावरील आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि चेतेश्वर पुजारासारखे फलंदाज निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघ संक्रमणावस्थेत आहे. या दिग्गज खेळाडूंचा पर्याय शोधणे आव्हानात्मक आहे. मात्र, गंभीरची सामन्यातील रणनीतीही समजण्यापलीकडे आहे. अष्टपैलूंवरील सर्वाधिक विश्वास हा भारताच्या दृष्टीने घातक ठरताना दिसत आहे.

दुसऱ्या कसोटीत भारताकडे वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी असे तीन अष्टपैलू होते. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलियाकडून मालिका गमावल्याने भारताला गेल्या जागतिक अजिंक्यपद कसोटीची अंतिम फेरी गाठता आली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताची ‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेत पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. भारतीय संघ पुढील वर्षीच कसोटी सामने खेळेल. तोवर संघ व्यवस्थापन यामध्ये सुधारणा करेल, अशी अपेक्षा आहे.

तिसऱ्या स्थानाबाबत संभ्रम कायम

चेतेश्वर पुजारानंतर भारताला अजूनपर्यंत तिसऱ्या स्थानासाठी भरवशाचा फलंदाज मिळालेला नाही. तिसऱ्या क्रमांकावर अनेक फलंदाजांना खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र, तोच फलंदाजीत पुढच्या सामन्यातही याच स्थानावर खेळेल याची शाश्वती नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचे याबाबतचे उदाहरण ताजे आहे. पहिल्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. त्या वेळी साई सुदर्शनला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते. दुसऱ्या कसोटीत सुंदरला आठव्या स्थानी फलंदाजी पाठविण्यात आले, तर सुदर्शन तिसऱ्या स्थानी फलंदाजीस आला. त्यामुळे संघ व्यवस्थापनासमोर या क्रमांकाचे कोडे सुटलेले नाही. शुभमन गिल, केएल राहुल, करूण नायर, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण, कोणालाही पुरेसा प्रभाव पाडता आला नाही.

फिरकीसमोर भारतीय फलंदाज अपयशी

भारतीय फलंदाज जगात फिरकीपटूंचा सर्वोत्तम सामना करणारे फलंदाज समजले जातात. मात्र, सध्याच्या संघाकडे फिरकीपटूंना सक्षमपणे सामोरे जाणारे फलंदाज दिसत नाहीत. घरच्या मैदानांवर भारतापेक्षा प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज चांगली कामगिरी करताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सेनुरन मुथुसामी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी भारतीय फिरकीपटूंचा चांगल्या पद्धतीने सामना केला. दुसरीकडे, भारताच्या सुदर्शन, जुरेल, राहुल हे फिरकी गोलंदाजांविरुद्ध अडखळताना दिसले. इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) भारतीय फलंदाजांची बचावत्मक खेळ करण्याची क्षमता कमी झाल्याची चर्चा सध्या आहे. वॉशिंग्टन सुंदरने काही काळ संयम दाखवला. भारताला भविष्यात कामगिरी उंचावायची झाल्यास चांगला बचावात्मक शैलीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

मनासारखी खेळपट्टी मिळूनही निराशा

भारताला त्यांच्या अनुकूल खेळपट्टी मिळत असतानाही त्यांना प्रभाव पाडता आलेला नाही. यापूर्वी, भारताने बांगलादेश व वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या संघांना नमविले. पण, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी भारतीय परिस्थितीचा चांगला फायदा घेतला. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवात मिचेल सँटनर, एजाझ पटेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारताच्या अडचणी वाढवल्या. दक्षिण आफ्रिकेच्या सायमन हार्मर, केशव महाराज आणि एडीन मार्करम यांनी प्रभाव पाडला. भारताकडे रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, चायनामन कुलदीप यादवसारखे चांगले फिरकीपटू असतानाही त्यांना म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे संघ व्यस्थापनाला यावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागेल.

अंतिम अकराची निवड करताना संभ्रम

गौतम गंभीर परिस्थितीनुसार एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रारूपात अंतिम अकरामध्ये बदल करतो. कसोटीतही त्याने नियम लावला. याचा संघाला फटका बसताना दिसत आहे. दुसऱ्या कसोटीतील अंतिम अकरा खेळाडूंवर आता अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात सर्वाधिक अपयश भारताला फलंदाजीत आले. सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल दोन्ही कसोटी सामन्यांत प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. दोन्ही सामन्यांत गंभीरने चार फलंदाज खेळवले. मात्र, एकालाही शतकी खेळी करता आली नाही. ध्रुव जुरेल आणि नितीश कुमार रेड्डी यांचा योग्य वापर संघाला करता आला नाही. त्यामुळे अंतिम अकरा निवड करताना संघ व्यवस्थापनाने कोणते निकष लावले यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. एकीकडे यान्सन व मुथुसामी भारतीय फिरकीपटूंना चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतात. मात्र, कोणताही भारतीय फलंदाज संयमाने खेळताना दिसला नाही. भारतासाठी ही चिंतेची बाब आहे.