भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार करण्याच्या उंबरठ्यावर असून रविवारी (२ नोव्हेंबर) त्यांना तुल्यबळ दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळा त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. आता घरच्या मैदानावर खेळताना जेतेपदाची ही प्रतीक्षा संपवण्याचे ध्येय भारतीय संघाने बाळगले आहे. अंतिम लढतीत वरचढ ठरण्याच्या दृष्टीने भारतासाठी कोणत्या पाच गोष्टी महत्त्वाच्या ठरतील याचा आढावा.

एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा

भारतीय महिला संघ आठवडाभरापासून नवी मुंबईतच आहे. साखळी लढतीतील अखेरचा सामना (बांगलादेशविरुद्ध) आणि उपांत्य फेरीचा सामना (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) ज्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला, त्याच मैदानावर आता भारताला अंतिम लढत खेळण्याची संधी मिळणार आहे. येथील परिस्थिती आणि खेळपट्टी याची भारतीय संघाला पूर्णपणे कल्पना असून याचा निश्चितपणे त्यांना फायदा मिळेल. ‘‘विविध शहरांत खेळताना बराच वेळ प्रवासात वाया जातो. आता सलग तीन सामने एकाच ठिकाणी खेळायला मिळाल्याने आम्हाला प्रवास करावा लागला नाही. त्यामुळे आम्हाला जिममध्ये तंदुरुस्तीवर मेहनत घेण्यासाठी, तसेच नेट्समध्ये सरावासाठी अतिरिक्त वेळ मिळाला,’’ असे भारताची अष्टपैलू अमनजोत कौरने उपांत्य लढतीतील विजयानंतर सांगितले होते. त्यातच अंतिम लढतीत या मैदानावर प्रेक्षकसंख्येचा विक्रम सलग चौथ्यांदा मोडला जाणे अपेक्षित आहे. घरच्या प्रेक्षकांचा हा भरघोस पाठिंबाही भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय

भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले. भारतीय संघाने साखळी फेरीत सातपैकी तीन सामने जिंकले, तीन गमावले आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघाला तीनही पराभव स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या अन्य संघांकडून (ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड) पत्करावे लागले होते. त्यातच उपांत्य फेरीत भारताला महिला क्रिकेटमधील सर्वांत बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांची मजल मारल्यानंतर भारतीय संघ विश्वविजेतेपदापासून पुन्हा दूर राहणार असे वाटू लागले होते. परंतु जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या झुंजार खेळींनी भारताला एकवेळ अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. इतक्या आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला असून दक्षिण आफ्रिकेलाही धूळ चारण्याचा त्यांचा मानस असेल.

मोठ्या सामन्यांत हरमनप्रीत

भारताकडे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या रूपात मोठ्या सामन्यांत कामगिरी उंचावणारी खेळाडू आहे. जितका मोठा सामना, जितके अधिक दडपण, तितका हरमनप्रीतचा खेळ बहरतो असे म्हटले जाते. २०१७च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीत नाबाद १७१ धावांची अविस्मरणीय खेळी करणाऱ्या हरमनने यावेळी त्याच बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ८९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आता अंतिम लढतीतही तिच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. दक्षिण आफ्रिकेकडे नोनकुलुलेको मलाबा, सुने लस आणि क्लोई ट्रायॉन यांसारख्या गुणवान फिरकी गोलंदाज आहेत. मधल्या षटकांत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यांना दडपणाखाली आणायचे झाल्यास हरमनप्रीतला पुन्हा आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

अन्य खेळाडूंचे योगदान

भारतासाठी उपांत्य फेरीचा सामना अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरला. याआधी २०२२ची राष्ट्रकुल स्पर्धा, तसेच २०२२ आणि २०२४ ची ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा यात जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी मोठी भागीदारी रचली होती. मात्र, हरमनप्रीत बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला होता. यावेळी तसे होणार नाही याची जेमिमाने काळजी घेतली. ‘‘हॅरी दी (हरमनप्रीत) बाद होणे हे एकप्रकारे माझ्यासाठी वरदान ठरले. त्याआधीची काही षटके थकवा जाणू लागल्याने मला लक्षपूर्वक खेळ करण्यात अडचण येत होती. मात्र, ती बाद झाल्यानंतर आपल्याला जबाबदारीने खेळावे लागणार याची मला जाणीव झाली,’’ असे जेमिमा म्हणाली. तसेच एरवी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्मृती मनधानालाही फारसे योगदान देता आले नाही. त्यानंतरही भारतीय संघाने तीनशेहून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. दीप्ती शर्मा, रिषा घोष आणि अमनजोत कौर यांनीही छोटेखानी, पण महत्त्वाचे योगदान दिले. गोलंदाजीत सुरुवातीच्या अपयशानंतर भारताने पुनरागमन केले. अखेरच्या १६.१ षटकांत ११८ धावांत आठ गडी बाद करत भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियावर अंकुश ठेवला. आता अंतिम लढतीतही अशीच भरीव सांघिक कामगिरी महत्त्वाची ठरेल.

लॉरा वोल्वार्डला रोखण्याचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीची फलंदाज लॉरा वोल्वार्डने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती अग्रस्थानी असून तिने आठ सामन्यांत ६७.१४च्या सरासरीने ४७० धावा केल्या आहेत. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा अडचणीत सापडण्याची चिन्हे होती. मात्र, वोल्वार्डने एका बाजूने उत्कृष्ट फलंदाजी करताना १४३ चेंडूंत १६९ धावांची शानदार खेळी साकारली. तिने आपले शतक ११५ चेंडूंत पूर्ण केले आणि त्यानंतरच्या २८ चेंडूंत ६९ धावा फटकावल्या. वोल्वार्डने एकदिवसीय कारकीर्दीत भारताविरुद्ध २१ सामन्यांत ४०च्या सरासरीने ८०६ धावा केल्या आहेत. त्यामुळे आता अंतिम लढतीत वोल्वार्डला रोखण्याचेच भारतासमोर सर्वांत मोठे आव्हान असेल. यात भारतीय संघ यशस्वी झाला तर त्यांचे पहिल्या विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार होईल, अन्यथा दक्षिण आफ्रिकेचा संघ आपले पहिले विश्वविजेतेपद प्राप्त करेल.