एकीकडे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर दुसरीकडे गतविजेत्या भारतीय संघाने झिम्बाब्वेला नमवत ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान शाबूत ठेवले. चेन्नई येथे झालेल्या या सामन्यापूर्वी भारतीय फलंदाजीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, भारतीय फलंदाजांनी वेळेत कामगिरी उंचावताना झिम्बाब्वेविरुद्ध अडीचशेहून अधिकची विक्रमी धावसंख्या उभारली. परंतु त्याच वेळी भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे खेळपट्टीकडून मदत असेल तरच भारतीय गोलंदाज यशस्वी ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारताला उपांत्य फेरी गाठायची झाल्यास रविवारी वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागेल. या आव्हानासाठी भारतीय गोलंदाज खरेच सज्ज आहेत का, याचा आढावा.
गोलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी फळींपैकी एक म्हणून भारताकडे पाहिजे जात होते. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमरा आणि अर्शदीप सिंग, तर फिरकी गोलंदाजीत वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर असे दर्जेदार पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत. यापैकी बुमरा आणि काही अंशी अर्शदीपचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. त्यातच विजयी लक्ष्य प्रतिस्पर्धी संघाच्या आवाक्याबाहेर आहे असे समजल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव विविध प्रयोग करून शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या या अष्टपैलूंना अधिकाधिक गोलंदाजी देणे पसंत करतो. मात्र, त्यांना बहुतेक वेळा यश मिळत नाही. विशेषतः दुबेने झिम्बाब्वेविरुद्ध अतिशय स्वैर मारा करताना अवघ्या दोन षटकांत तब्बल ४६ धावा खर्ची केल्या. त्यामुळे आता स्पर्धेच्या निर्णायक टप्प्यावर भारतीय संघाला गोलंदाजीच्या योजनेबाबत फेरविचार करावा लागणार आहे.
चक्रवर्तीची ‘मिस्टरी’ नाहीशी?
फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आपल्या ‘मिस्टरी’साठी ओळखला जातो. तो कोणत्या क्षणी ऑफ-स्पिन टाकेल, कधी गुगली, कधी कॅरम बॉल, कधी फ्लिपर आणि कधी चेंडू वेगाने टाकेल, याचा अंदाज बांधणे फलंदाजांना अवघड जात होते. त्यामुळेच गेल्या दीड-दोन वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बुमराच्या साथीने तो भारताचा सर्वांत भरवशाचा गोलंदाज म्हणून नावारुपाला आला होता. मात्र, चक्रवर्तीला निष्प्रभ करता येऊ शकते आणि त्यासाठी त्याच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा अवलंबणे हाच पर्याय असल्याचे दक्षिण आफ्रिकेने दाखवून दिले आहे. ‘‘चक्रवर्ती घातक गोलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावर दडपण आणणे महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन आम्ही त्याला लक्ष्य केले,’’ असे दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर भारताविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाला होता. ‘अव्वल आठ’ फेरीतील अहमदाबाद येथे झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने, त्यातही मिलर आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस जोडीने चक्रवर्तीचा समाचार घेतला होता. या सामन्यात चक्रवर्तीने चार षटकांत ४७ धावा दिल्या. पुढील सामन्यात झिम्बाब्वेने त्याच्या गोलंदाजीवर चार षटकांत ३५ धावा काढल्या. त्यामुळे आता चक्रवर्तीसमोर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
अक्षरवर अधिक विश्वास गरजेचा?
भारतीय संघाने २०२४ मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली, त्यात डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. फलंदाजीत दोन-तीन गडी लवकर बाद झाल्यास डाव सावरण्यासाठी अक्षरला पाठवले जायचे. मग गोलंदाजीत तो डावखुऱ्या फिरकीने वेळोवेळी महत्त्वपूर्ण बळी मिळवून द्यायचा किंवा धावगतीवर नियंत्रण तरी राखायचा. त्यामुळे तो ट्वेन्टी-२० संघाचा अविभाज्य भाग झाला होता. त्याला उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली. त्याने यंदाच्या स्पर्धेची सुरुवात चांगली केली. अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्ध त्याने प्रत्येकी दोन बळी मिळवले. मात्र, भारतीय संघाचे ‘अव्वल आठ’ फेरीतील स्थान निश्चित झाल्याने अखेरच्या साखळी सामन्यासाठी नेदरलँड्सविरुद्ध त्याला विश्रांती देण्यात आली. त्यानंतर ‘अव्वल आठ’ फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षरचे पुनरागमन अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघात अव्वल पाचपैकी तीन फलंदाज (डिकॉक, रिकल्टन, मिलर) डावखुरे असल्याने आम्ही अक्षरच्या जागी ऑफ-स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला खेळविल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. वॉशिंग्टन छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आगामी सामन्यांत भारताने अक्षरवर अधिक विश्वास दाखवणे गरजेचे झाले आहे.
सहावा पर्याय नसल्याची चिंता?
भारतीय संघ चार विशेषज्ञ गोलंदाज (बुमरा, अर्शदीप, चक्रवर्ती, अक्षर) आणि अष्टपैलू हार्दिकवर अवलंबून आहे. परंतु या पाचपैकी एकालाही अपयश येत असल्यास भारतीय संघ संकटात सापडतो. भारतासाठी हाच सर्वांत मोठा चिंतेचा विषय असल्याचे मत माजी कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केले आहे. दुबेने ट्वेन्टी-२० विश्वचषकात आतापर्यंत पाच बळी मिळवले असले, तरी त्याने एकूण ९.२ षटके टाकताना १२४ धावा दिल्या आहेत. म्हणजेच तो षटकामागे तब्बल १३.२८ धावा खर्ची करत आहेत. ‘‘गेल्या १८ महिन्यांत तिलक वर्मा, अभिषेक शर्मा ते अगदी सूर्यकुमार आणि रिंकू सिंह यांनी गोलंदाजी करून पाहिली आहे. ते कधीतरी यशस्वी ठरतीलही, परंतु सपाट खेळपट्ट्यांवर त्यांना गोलंदाजी देणे भारताला शक्य होणार नाही. हे भारतासमोरील मोठे आव्हान आहे,’’ असे कुंबळेने नमूद केले.
कोलकाताची खेळपट्टी फिरकीला साजेशी?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कोलकाताच्या ‘इडन गार्डन्स’ मैदानावर सामना होणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीला साथ देते असा इतिहास आहे. ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळताना वरुण चक्रवर्तीने या मैदानावर चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पुन्हा त्याच्याकडून अपेक्षा असतील. मात्र, ‘इडन गार्डन्स’ येथे खेळपट्टीवर स्थिरावल्यास फलंदाज फटकेबाजी करू शकतात. यंदाच्या स्पर्धेत या मैदानावर झालेल्या आतापर्यंतच्या पाच सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या प्रत्येक संघाने किमान १५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे गोलंदाजांना सुरुवातीलाच बळी मिळविण्याचा प्रयत्न करावा लागेल, अन्यथा मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.
