World’s Highest Bridge Chenab जगातील सर्वात उंच पूल अशी ओळख असणारा चिनाब पूल आता लवकरच सुरू होणार आहे. अभियांत्रिकीचा चमत्कार मानल्या जाणार्‍या या पुलावरून रेल्वेची पहिली यशस्वी चाचणी पार पडली आहे. भारतीय रेल्वेने जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलासह सांगलदान ते रियासीपर्यंत पहिली रेल्वे चाचणी करण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी (१६ जून) या चाचणीचा व्हिडीओ शेअर केला. “पहिली ट्रायल ट्रेन सांगलदान ते रियासीपर्यंत यशस्वीपणे धावली आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प (यूएसबीआरएल) जवळपास पूर्ण झाला आहे. केवळ टनेल क्रमांक एकचे काही काम शिल्लक आहे. यूएसबीआरएल प्रकल्प या वर्षअखेरीस पूर्ण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. चिनाब रेल्वे पुलावरील रेल्वेच्या यशस्वी चाचणीचे महत्त्व काय? जाणून या.

चिनाब रेल्वे पूल

चिनाब पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल म्हणून ओळखला जाणारा चिनाब पूल नदीपात्रापासून १,१७८ फूट उंचीवर आहे. याची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच आहे. जम्मू आणि काश्मीरमधील खडतर भूभाग आणि हवामानाच्या परिस्थितीमुळे या पुलाचे बांधकाम आव्हानात्मक मानले जात होते. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब पुलाच्या एका घाटावर बांधण्यात आला आहे, याला चिनाब आर्क ब्रिज म्हणूनही ओळखले जाते.

akola general coaches marathi news
आनंदवार्ता! रेल्वेचे सामान्य श्रेणीचे डब्बे आता वाढणार; महत्त्वपूर्ण बदलामुळे प्रवाशांना दिलासा
detailed map of Ram Setu
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तयार केला समुद्राखाली असलेल्या रामसेतूचा पहिला नकाशा
Roha Diva Memu schedule changes Mumbai
रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल
devendra fadnavis inaugurated indias most advanced command and control centre in nagpur
१५ वर्षांपूर्वीच्या छायाचित्रावरून आताचा गुन्हेगार ओळखता येणार…..नागपुरात नव्या तंत्रज्ञानामुळे….
Central  Western Railway to remove billboards Proceedings after orders of Supreme Court Mumbai
मध्य, पश्चिम रेल्वे फलक हटविणार; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही
Non interlocking work auto signaling system and multiple line electrification to disrupt train routes Gondiya
गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे ; ‘या’ रेल्वे रद्द, कामकाज प्रभावित…
China bri ecrl
China BRI: कुन्मिंग ते सिंगापूर रेल्वेमार्गामध्ये चीनचा फायदा काय?
MG Comet EV Price Hike
देशातील सर्वात लहान अन् स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली महाग; एकदा चार्ज केल्यानंतर धावणार २३० किमी, आता किती पैसे मोजावे लागणार?

हेही वाचा : Chenab Bridge: जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार; पंतप्रधान मोदींसाठी कसा ठरणार गेम चेंजर?

चिनाब पूल तयार करण्यासाठी तब्बल १४ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. १२० वर्षे हा पूल जशाच तसा राहील, असे सांगण्यात आले आहे. चिनाब पूल २६० किलोमीटर प्रतितास वेगाच्या वार्‍यांना, उच्च तापमान आणि भूकंपासारख्या परिस्थितींना तोड देण्यास सक्षम आहे. पुलाच्या बांधकामात ३० हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे.

रेल्वेच्या यशस्वी चाचणीचे महत्त्व काय?

जगातील सर्वात उंच पुलाची स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी या चाचण्या घेण्यात आल्या. सांगलदन-रियासी विभागाचे काम पूर्ण झाल्यानंतर, रियासी आणि कटरादरम्यानच्या १७ किमी लांबीच्या रुळाचे काम आता प्रलंबित आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ (टीओआय) च्या वृत्तानुसार, रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) या महिन्याच्या अखेरीस सांगलदान-रियासी विभागाची तपासणी करणार आहेत. चिनाब पुलावरून रामबन ते रियासीपर्यंत रेल्वे सेवा लवकरच सुरू करण्यात येईल.

रियासीचे उपायुक्त विशेष महाजन यांनी ‘एएनआय’ला सांगितले, “हा आधुनिक जगातील अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. ज्या दिवशी रेल्वे रियासीला पोहोचेल तो दिवस जिल्ह्यासाठी सर्वात आनंददायी दिवस असेल. हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण आपल्या अभियंत्यांनी एक चमत्कार घडवला आहे. हे जगातील आठवे आश्चर्य आहे. पूल सर्वच चाचण्यांमध्ये उत्तीर्ण ठरला आहे. पूल पूर्णतः कधी सुरू होणार, ती नेमकी तारीख सांगता येणार नाही, पण मला आशा आहे की तो दिवस लवकरच येईल.”

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पाचे (यूएसबीआरएल) महत्त्व

मार्च १९९५ मध्ये मंजूर झालेल्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाला २००२ मध्ये गती मिळाली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या सर्वात आव्हानात्मक प्रकल्पांपैकी एक असणार्‍या या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले, त्यानंतरच या प्रकल्पाला वेग आला, असे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. हा प्रकल्प वर्षअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, सोपियन, बडगाम, श्रीनगर आणि बारामुल्ला जिल्ह्यांना भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडेल.

फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला आणि जम्मूमधील उधमपूरला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या ४८.१ किमी लांबीच्या बनिहाल-सांगलदान विभागाचे उद्घाटन केले होते. ‘टीओआय’नुसार या प्रकल्पामुळे काश्मीर खोरे आणि देशाच्या उर्वरित भागांमध्ये ३६५ दिवस कोणत्याही हवामानात कनेक्टिव्हिटी राहील; ज्यामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रांना चालना मिळण्यास मदत होईल.

सध्या काश्मीर हे भारताच्या उर्वरित भागाशी हवाई किंवा जमिनीच्या मार्गाने जोडलेले आहे. ३०० किलोमीटरच्या श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरूनच खोर्‍यापर्यंत पोहोचता येते. मात्र, हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद होतात. भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही दुर्गम झाला आहे. या रेल्वे लिंकमुळे हे अडथळे दूर होतील आणि काश्मीरला कमी खर्चात सर्व-हवामानात कनेक्टिव्हिटी मिळेल. या रेल्वेमुळे श्रीनगर आणि जम्मूदरम्यानचा प्रवासाचा वेळ रस्त्याच्या प्रवासाच्या तुलनेत पाच ते सहा तासांवरून तीन ते साडेतीन तासांपर्यंत कमी होईल.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक-युट्यूबवर सरकारचे नियंत्रण? नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात; काय आहेत कारणं?

यूएसबीआरएल प्रकल्पाचा एक भाग म्हणून बांधण्यात आलेला चिनाब रेल्वे पूल चिनाब नदी ओलांडण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग प्रदान असेल. ‘इंडियन एक्स्प्रेस’नुसार हा प्रकल्प काश्मिरी लोकांसाठी व्यापार सुलभ करण्यात मदत करेल. रेल्वेने भारताच्या इतर भागात सफरचंद, सुका मेवा, हस्तकला इत्यादी वस्तू पाठवता येईल; ज्यामुळे आणखी रोजगार वाढेल. भारताच्या इतर भागांतून काश्मीर खोऱ्यात येणार्‍या वस्तूंच्या वाहतूक खर्चातही लक्षणीय घट होऊ शकते.