IAF’s Operation Kaveri: गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात सुदानमधील गृहयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने एक धाडसी ऑपरेशन हाती घेतले आणि तब्बल १२१ भारतीयांची सुटका नाईल नदीजवळील वाळवंटातील लष्करी तळावरून केली होती. हे धाडसी ऑपरेशन कसे केले याचा घेतलेला वेध!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्रीची वेळ होती, मिट्ट काळोख पसरला होता. फक्त आकाशातच नाही तर अनेकांच्या मनातही… या काळोख्या रात्री आशेचा एक किरण दिसावा, तसे C130J सुपर हर्क्युलिस वाहतूक विमानाचे दिवे लुकलुकले. किती मोठी ती जबाबदारी… हा आशेचा किरण ज्यांच्या खांद्यावर होता, त्यांची मनस्थिती काय असावी?… परकीय देश… अरुंद धावपट्टी… भोवताली दाटलेला मिट्ट काळोख. समोरचं काहीच दिसत नव्हतं. इतकंच नाही तर आज निसर्गही नाखुश होता… वाऱ्याने वेग पकडला होता… या वादळी वाऱ्यांचा मारा C130J सुपर हर्क्युलिस (वाहतूक विमान) झेलत होत. संकट खरंच खूप मोठं होतं. धावपट्टीच्या शेजारीच एका विमानाचे अवशेष पडले होते. नेमकं कशामुळे? काय झालं? गोळीबारामुळे त्या विमानाची ही अवस्था झाली की, काही तांत्रिक बिघाड झाला होता, काहीच कल्पना नव्हती. तरीसुद्धा, C130J ची धुरा सांभाळणाऱ्या वैमानिक आणि गरुड कमांडोंना स्वतःच्या जीवापेक्षा कर्तव्य महत्त्वाचं होतं. शेवटी भारतीय नागरिकांच्या रक्षणाचा प्रश्न होता. वैमानिकाने मोठ्या कौशल्याने ग्रे टर्बोप्रॉप विमान खडबडीत धावपट्टीवर यशस्वीरीत्या उतरवले आणि काही तासांतच भारतीय हवाई दलाने त्यांच्या इतिहासातील सर्वात धाडसी मोहिमांपैकी एक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. ही घटना गेल्यावर्षीची… ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानची राजधानी खार्तूम आणि त्याच्या आसपास अडकलेल्या १२१ भारतीयांना भारतीय हवाई दलाने सुरक्षित मायदेशी आणले.

नक्की काय घडत होते?

तारीख २७ एप्रिल (२०२३) भारताने ऑपरेशन कावेरी सुरू करून काही दिवस उलटले होते. याच ऑपरेशन अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम चालू होते. सुदानमधील सशस्त्र दल आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या प्रतिस्पर्धी गटांमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाला होता. भारत सरकारने भारतीय हवाई दलाची C130J सुपर हर्क्युलिस आणि C17 ग्लोबमास्टर वाहतूक विमानं तसेच नौदलाच्या आयएनएस सुमेधा आणि आयएनएस तरकश या युद्धनौकांना या बचाव मोहिमेसाठी सज्ज केले होते. खार्तूममधील विमानतळ बंद असल्यामुळे अडकलेल्या लोकांना देशाच्या विविध भागांतून पोर्ट सुदान येथे आणले जात होते. या महाकाय मोहिमेअंतर्गत तब्बल ३,८०० हून अधिक भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले. मात्र, खार्तूममध्ये अद्यापही २०० च्या आसपास नागरिक अडकले होते. त्यात भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. दुसऱ्या बाजूला पोर्ट सुदानला जाणारा प्रवास खूपच धोकादायक होता. त्यामुळे वाडी सेदना हा एक पर्यायी मार्ग म्हणून समोर आला. खार्तूमच्या सुमारे ४० किमी उत्तरेला, वाडी सेदना हे नाईल नदीच्या पश्चिमेकडील वाळवंटात आहे. इतकंच नाही तर या जागेला दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास आहे. हे स्थळ लष्करी तळ म्हणून तेव्हा वापरात होते. सुदानमधील गृहयुद्धादरम्यान ७२ तासांचा युद्धविराम असूनही, त्या एअरबेसवर अधूनमधून गोळीबार झाल्याच्या घटना नोंदवल्या जात होत्या. वाडी सेदना मिशनसाठी अंतिम मंजुरी २७ एप्रिलच्या दुपारी मिळाली.

बचाव मोहिमांचे समन्वय करणारी भारतीय हवाई दलाची टीम जेद्दाह या सौदी अरेबियाच्या शहरात होती. त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून तासभराच्या अंतरावर असणारे एअरबेस पुढच्या मोहिमेसाठी सज्ज होत होते. एअरबेसकडे जात असताना टीमने ऑपरेशनची तपशीलवार चर्चा करून अंतिम निर्णय घेतले. विमानामधील क्रू आणि गरुड कमांडोंशी संवादाचे मार्ग, जमिनीवर असलेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवणे आणि संभाव्य धोके यांविषयांवर चर्चा करण्यात आली. मोहिमेच्या सुरूवातीच्या काही मिनिटांपूर्वी सविस्तर ब्रीफिंग करण्यात आले आणि प्रत्येक सदस्याला लँडिंगनंतर त्यांचे विशिष्ट काम दिले गेले. “आम्हाला याची पूर्ण कल्पना होती की जमिनीवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि तेथे कोणतेही साधन उपलब्ध नाही. सुदानच्या सैन्याला धावपट्टीपर्यंत पोहोचण्याची परवानगी होती, तर प्रतिस्पर्धी RSF लढाई करणारे बाहेरील भागात होते. त्यामुळे गोळीबाराच्या क्रॉसफायरमध्ये अडकण्याचा धोका कायम होता. शिवाय धावपट्टीची अवस्था खूपच खराब होती याचीही कल्पना होती – धावपट्टी पूर्णपणे अंधारात होती, कोणतीही नेव्हिगेशनल साधने किंवा रेडिओ संपर्क नव्हता तसेच हवामान देखील अनुकूल नव्हते,” वाडी सेदना येथे लँडिंग केलेल्या C130J च्या वैमानिकाने द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

अधिक वाचा: World Cotton Day 2024: भारतीय वस्त्रोद्योगाला ब्रिटिशांनी लावला सुरुंग; नेमके काय घडले?

तरीसुद्धा, जेद्दाहमधील भारतीय हवाई दलाच्या टीमने त्यांची योजना पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती इतकी नाजूक होती की, सुदानच्या दोन गटांमधील युद्धविराम संपण्याआधी त्यांच्या हातात चारच तास होते. भारतीय हवाई दलाने लागलीच निघण्याची तयारी केली. रात्री ८ च्या सुमारास C130J ने जेद्दाहहून उड्डाण केलं. बरोबर दोन वैमानिक; स्टँडर्ड क्रू मध्ये एक नेव्हिगेटर, एक फ्लाइट गनर, एक फ्लाइट इंजिनियर आणि दोन-तीन तांत्रिक कर्मचारी होते आणि भारतीय हवाई दलाच्या स्पेशल फोर्समधील गरुड कमांडोंची आठ जणांची टीम होती. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी शस्त्र आणि उपकरणे बरोबर घेण्यात आली होती, टीमने रात्रीच्या ऑपरेशनसाठी नाईट व्हिजन उपकरणे आणि टॅक्टिकल टॉर्चेस देखील घेतल्या होत्या. जेद्दाहहून वाडी सेदना येथे जाणाऱ्या दोन तासांच्या उड्डाणादरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांची मानक कार्यप्रणाली (SOPs) पुन्हा एकदा तपासून पहिली.

“आम्ही अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी अनेकदा सराव केलेला असल्यामुळे, फक्त परिस्थितीनुसार आमच्या प्रक्रियांमध्ये बदल करण्याचा प्रश्न होता,” असे सहभागी असलेल्या एका गरुड कमांडोने सांगितले. विमान सुदानच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करताच समस्या सुरू झाल्या. हवामान बिघडू लागले. संरक्षण सूत्रांनी सांगितले की, धावपट्टीपर्यंतचा मार्ग रात्रीच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रो ऑप्टिकल- इन्फ्रारेड सेन्सर, नाईट-व्हिजन गॉगल्स आणि हेड्स-अप डिस्प्ले सेन्सरचा वापर करून पार केला गेला.

शेवटी रात्री १० वाजताच्या सुमारास विमान धावपट्टीवर उतरले.

वैमानिक विमानातच थांबलेले असताना, गरुड कमांडोचा टीम लीडर आणि इतर तीन कमांडोंनी जमिनीवरील ऑपरेशन्सची जबाबदारी घेतली. इतर क्रू सदस्य आणि बाकीचे गरुड कमांडो विमानाच्या आत आणि आसपासच राहिले, त्यांनी संचार व्यवस्थेवर लक्ष ठेवले, संभाव्य धोक्यांचा सामना करण्याची तयारी केली आणि प्रवाशांना विमानात चढण्यासाठी लागणाऱ्या औपचारिक गोष्टींमध्ये मदत केली. अनामिक evacuation point ‘बचावबिंदू’ धावपट्टीपासून काही मीटर अंतरावर होता. तिथे जात असताना गरुड कमांडोंनी सुदानच्या सैन्याने राखलेल्या दोन तात्पुरत्या चेकपोस्ट पार केल्या. “या चेकपोस्ट विमानापासून सुमारे ६०० मीटर अंतरावर होत्या. आम्ही लवकरच गर्दी पाहिली आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला की, कुठे भारतीय नागरिक दिसतात का. पण तिथे एकही नव्हता, त्यामुळे आम्ही पुढे निघालो,” अशी आठवण गरुड कमांडोने सांगितली.

अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?

थोडं पुढे गेल्यावर साधारण ३०० मीटर अंतरावर एक चेकपोस्ट होती. तिथे २ चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात विविध देशांमधील १,२०० नागरिक होते. परिस्थिती अगदीच गोंधळाची होती. प्रत्येकालाच या परिस्थितीतून बाहेर पडायचे होते. आम्हाला भारतीय नागरिकांचा शोध घ्यायचा होता. आम्हाला भारतीय नागरिक दिसले. टीमने लगेचच प्रत्येक नागरिकाचा शोध घेणे, ओळख पटवणे, पडताळणी करणे आणि त्यांची तपासणी करणे हे कष्टाचे काम सुरू केले. सुदानमधील भारतीय मिशनचे संरक्षण अधिकारी लेफ्टनंट कर्नल गुरप्रीत सिंग यांनी स्वत:ची ओळख करून दिली, त्यामुळे ही प्रक्रिया थोडी सुलभ झाली. ज्या नागरिकांना बाहेर काढायचे होते त्यामध्ये दोन गर्भवती महिला, तसेच अनेक लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक होते. अनेक तासांच्या मानसिक त्रासानंतर अखेर त्यांची सुटका होणार आहे हे लक्षात आल्यावर, त्यातील अनेक जण भावनाविवश झाले.

घड्याळ्याचे काटे पुढे सरकत होते. युद्धविराम संपण्यास अवकाश असला तरी टीमला आणखी एक चिंता होती. ती म्हणजे C130J चे इंजिन संपूर्ण ऑपरेशन दरम्यान सुरू ठेवावे लागत होते. यामागील मुख्य उद्देश ऐन वेळी विमानाला उड्डाण करावे लागले तर तयारी असावी हा होता– याचा अर्थ असा की, त्यांच्या जवळ फक्त दीड तास पुरेल इतके इंधन शिल्लक होते. म्हणूनच टीमने प्रवाशांना लवकरात लवकर विमानाकडे नेले. प्रवासी एका रांगेत उभे होते आणि हळूहळू विमानाकडे जात होते. अखेर, रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास C130J विमानाने उड्डाण केले आणि धावपट्टी पुन्हा एकदा अंधारात बुडाली… आणि भारतीय हवाई दलाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला!