शांतताकाळात भारतीय हवाई दलास विमानांचे नुकसान आणि वैमानिकांचे मृत्यू, अशा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नियमित सराव, प्रशिक्षणात अनेक लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे इतिहास सांगतो. जागतिक हवाई शक्ती मानांकनात सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या हवाई दलासाठी ही बाब चिंताजनक ठरते.

दुबई एअर शोमधील घटना

दुबई येथील एअर शोमध्ये हवाई प्रात्यक्षिकांदरम्यान स्वदेशी तेजस विमान दुर्घटनाग्रस्त झाले. यात वैमानिक विंग कमांडर नमांश सियाल यांचा मृत्यू झाला. आजवर देशातील लढाऊ विमानांचे अपघात आणि नव्या करकरीत तेजसची परदेशातील दुर्घटना यामध्ये फरक आहे. तेजसचे सामर्थ्य जागतिक पटलावर अधोरेखित करताना ही दुर्घटना घडली.

चौकशीत कारण समोर येईल. परंतु, एअर शोमध्ये अपघात होणे अलीकडे दुर्मीळ मानले जाते. विमानाची गुणवत्ता, कामगिरीवर प्रश्न उपस्थित होतात. मागील काही वर्षात तेजसमध्ये मलेशिया, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा जवळपास १६ देशांनी स्वारस्य दाखविले. अपघातामुळे नजीकच्या काळात संभाव्य निर्यात मंदावण्याची शक्यता वर्तविली जाते.

एचएएलचा दावा काय?

दुबईतील दुर्घटनेनंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तेजस विमानात कोणतीही समस्या नाही. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला. त्याची सुरक्षितता कामगिरी जगातील सर्वोत्तम असल्याचे एचएएलचे प्रमुख डी. के. सुनील यांनी अधोरेखित केले. दुबईमध्ये जे घडले, ती दुदैवी घटना होती. तिचा विमानाची मागणी व निर्यातीवर परिणाम होणार नाही. एचएएल ताकदीने पुढे जाईल. तेजस हे पूर्णपणे सुरक्षित विमान असून त्याच्या भविष्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. तेजस जगात निर्यात होईल, असा विश्वास एचएचएलकडून व्यक्त केला जातो.

अपघातांची मालिका

भारतीय हवाई दलाच्या विमानांचे चालू वर्षात सहा अपघात झाले. या यादीत पिलाटस प्रशिक्षक विमान, मिराज २००० आणि जॅग्वार लढाऊ विमानांचा समावेश आहे. गेल्या दशकभरात हवाई दलाची १०६ विमाने अपघातग्रस्त झाली. त्यात ७४ वैमानिकांचा मृत्यू झाला. शांतता काळात विमानांचे नुकसान होण्याची घटना चिंताजनक आहे.

एका आकडेवारीनुसार भारताने २०२४ मध्ये आठ, २०२३ मध्ये आठ, २०२२ मध्ये पाच, २०२१ मध्ये ११ आणि २०२० मध्ये पाच विमाने गमावली होती. ही शांतताकालीन मोहिमांमध्ये सहभागी होती. दरवर्षी सातपेक्षा जास्त विमाने गमावली जातात. अलीकडेच निवृत्त झालेल्या रशियन बनावटीच्या मिग – २१ च्या अपघातांनी या विमानांना ‘उडत्या शवपेट्या’ म्हणून संबोधले गेले.

कारणं काय ?

जुनाट विमाने अपघातास कारक ठरत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ काढतात. संसदीय समितीच्या अहवालात ३४ पैकी १९ अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे उघड झाले होते. नऊ अपघात तांत्रिक दोषांमुळे झाले. देखभाल दुरुस्तीचे आव्हान, वैमानिकांची कमतरता, प्रशिक्षणाचा अभाव आणि मानवी चुका याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आजही दलाच्या ताफ्यात जॅग्वार आणि मिग- २९ सारखी जुनी विमाने आहेत. सुमारे ४५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या जॅग्वारचा जगात भारतीय हवाई दल एकमेव वापरकर्ता आहे. त्याची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सने २००५ मध्ये या विमानाला निरोप दिला होता.

आधुनिकीकरणावर परिणाम?

आधुनिकीकरण मोहिमेत स्वदेशी तेजसबरोबर काही विमाने परदेशातून खरेदी करण्याची योजना आहे. मिग – २९, जॅग्वार आणि मिराज – २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर आहेत. त्यांची जागा तेजसला दिली जाईल. तेजस वितरणात आधीच विलंब झाल्यामुळे दलाची चिंता वाढली. हवाई दलास लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची आवश्यकता आहे. मंजूर क्षमतेच्या तुलनेत सध्या केवळ २९ तुकड्या अस्तित्वात आहेत.

एचएएल तेजसच्या उत्पादन वाढीला चालना देत असताना दुबईतील एअर शोमधील दुर्घटनेने काही प्रश्न उपस्थित झाले. परंतु, सांख्यिकीय दृष्टिकोनातून दोन दशकात दोन अपघात आणि एक हजारहून अधिक उड्डाणांमुळे तेजसला जागतिक लढाऊ विमान कार्यक्रमात सुरक्षित बिंदूवर आणले. एफ-१६, ग्रिपेन आणि युरोफायटर टायफून सारख्या कार्यक्रमात सुरुवातीच्या सेवा काळात अपघातांचे प्रमाण जास्त होते.