भारतीय सैन्यदलांना आधुनिक युद्धासाठी सज्ज करण्यासाठी निर्मिलेल्या ‘भविष्यातील युद्धतंत्र’ अभ्यासक्रमाच्या चौथ्या तुकडीच्या प्रशिक्षणास नवी दिल्लीतील माणेकशॉ केंद्रात नुकतीच सुरूवात झाली. नवीन तंत्रज्ञान, युद्धपद्धती, विविध घटक युद्धाचे स्वरुप झपाट्याने बदलत आहेत. या परिस्थितीत प्रभावी सामाईक कारवाई, रणनीतीला अशा अभ्यासक्रमातून दिशा मिळणार आहे.

‘सीडीएस’ काय म्हणाले ?

अभ्यासक्रमाच्या उद्घाटन सत्रात भारतीय सैन्यदलांचे संरक्षणप्रमुख (सीडीएस) जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी युद्धतंत्राचे बदलते स्वरुप आणि लष्करी कारवायांवर प्रगत तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव याकडे लक्ष वेधले. भविष्यातील संरक्षणविषयक आव्हानांचा आधीच अंदाज घेणे आवश्यक आहे, अनेक आघाड्यांवर परिणामकारक प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. भविष्यातील संघर्षांना तोंड देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सज्ज क्षमता, स्वायत्त यंत्रणा, माहितीपूर्ण युद्धतंत्र, अंतराळ तंत्रज्ञान आणि विदाचलित (डेटा) निर्णय प्रक्रिया या घटकांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय संरक्षण सज्जता मजबूत करण्यासाठी सैन्य दल, उद्योग, शिक्षण क्षेत्र आणि संशोधक यांच्यात अधिक समन्वय, एकात्मता आणि सहकार्य असण्याची आवश्यकता मांडण्यात आली. या अभ्यासक्रमात भू-राजकीय परिस्थिती, उदयोन्मुख तंत्रज्ञान, सायबर युद्ध, बहुआयामी लष्करी कारवाया, वेगवेगळ्या संभाव्य परिस्थितींचे नियोजन आणि तंत्रज्ञान-सक्षम युद्ध आदी विषयांवर सैन्यदलांचे अधिकारी व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ विचार विनिमय करतील, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

भविष्यातील युद्ध

पुढील दोन दशकांतील युद्धाचे स्वरुप कसे असेल, याविषयी विविध पातळ्यांवर अभ्यास होत आहे. अमेरिकेच्या ‘नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल’च्या अहवालानुसार भविष्यातील युद्धे केवळ अग्नी क्षमतेवर नव्हे तर, माहिती आणि विदा संकलनावर आधारीत असतील. माहिती गोळा करणे आणि अचूक निर्णय घेणे यावर त्यांचे यश अवलंबून असेल. शत्रूच्या हालचालींवर २४ तास लक्ष ठेवले जाईल. यामुळे माहिती प्रणाली. सॅटेलाईट,जीपीएस यावर सायबर अथवा ‘इलेक्ट्रॉनिक जॅमिंग’द्वारे हल्ल्याचा धोका वाढेल. हायपरसॉनिक शस्त्रांचा वापर होईल. याविरोधात लेसर, मायक्रोवेव्ह यासारखी निर्देशित शस्त्र संरक्षणासाठी वापरली जातील.

जमिनीवर, हवेत आणि समुद्रात मानवरहित वाहनांचा वापर वाढेल. एकाचवेळी अनेक ड्रोन्स एकत्र येऊन, परस्परांशी संवाद साधून आणि परिस्थितीनुसार स्वत:ची रणनीती बदलून हल्ला करतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर इतका वाढेल की, मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वत:च लक्ष्य ठरवून हल्ला करणारी स्वायत्त शस्त्रे युद्धभूमीवर दिसू शकतील. थेट समोर येऊन युद्ध करण्याऐवजी छुप्या युद्धपद्धतीचा वापर वाढेल. यात सायबर हल्ले, समाज माध्यमातून खोटी माहिती पसरवून गोंधळ निर्माण करणे, समुद्राखालील फायबर ऑप्टिक वायरवर हल्ले करणे यांसारख्या मार्गांचा समावेश असेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अभ्यासक्रमाचे महत्व

तिन्ही सैन्यदलांसाठी एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाने विकसित केलेला ‘भविष्यातील युद्धतंत्र’ हा अभ्यासक्रम पावणेदोन वर्षांपूर्वी सुरू झाला. आता त्यामध्ये सैन्यदलांबरोबर देशातील प्रमुख संरक्षण संस्थांमधून प्रतिसाद वाढत आहे. या माध्यमातून आधुनिक युद्धाचे संचालन आणि तांत्रिक पैलूंची ओळख करून दिली जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव, ‘हायपरसॉनिक’ यांसारख्या विकसित होणाऱ्या युद्धतंत्रांच्या प्रतिमानांवर विशेष ‘मॉड्यूल’ सादर केली जातात. तंत्रज्ञानात होणारे बदल, जागतिक घडामोडी, नव्याने उद्भवणारे धोके लक्षात घेता तिन्ही सैन्यदलांसाठी अशा अभ्यासक्रमाची आवश्यकता होती. यातून जटील परिस्थितीचा सामना, नवतंत्रज्ञानाचा लाभ आणि नाविन्यपूर्ण डावपेचांशी जुळवून घेण्यास अधिकारी सुसज्ज होतील. अनिश्चित वातावरणात राष्ट्रीय हितसंबंध राखण्यात, भविष्यवादी व तंत्रस्नेही शक्तीच्या विकासात याचा उपयोग होणार आहे.

समन्वय वाढविण्यास बळ

लष्करातील मेजर ते मेजर जनरल आणि इतर सेवांमधील त्यांच्या समकक्ष स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाने आपले पद निरपेक्ष वैशिष्ट्य कायम राखल्यामुळे मेजर ते मेजर जनरल आणि त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांमध्ये मोकळ्या आणि आंतर-पद संवादाला प्रोत्साहन मिळाले. मेजर जनरलला देखील कदाचित मेजरकडून काही तरी शिकता येईल. आणि मेजरही मेजर जनरलकडून मोहीम आणि रणनीती शिकू शकतो. या अभ्यासक्रमात उद्योग आणि सैन्यदलात संवाद घडतो. खासगी कंपन्यांना एआय, स्वायत्त प्रणाली, मानवरहित सामग्री, सायबर सुरक्षा आणि प्रगत सामग्री यांसारख्या क्षेत्रांमध्ये तिन्ही दलांच्या कार्यात्मक गरजांविषयी प्रत्यक्ष माहिती मिळवणे शक्य झाले आहे.

प्रभावी सामाईक कारवाईची तयारी

भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्या क्षमता एकत्रित करणाऱ्या एकात्मिक युद्ध विभाग अर्थात थिएटर कमांड स्थापण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. या विभागात तिन्ही दलातील अधिकारी एका छताखाली काम करतील. यामध्ये सामाईक लष्करी कारवाई बरोबर पुरवठा व्यवस्था, वाहतूक, दळणवळणाची संयुक्त व्यवस्था आणि एकत्रित प्रशिक्षणाचाही समावेश आहे. ‘भविष्याकालीन युद्धतंत्र’ हा अभ्यासक्रम त्याचाच एक भाग. आधुनिक युद्धात एकात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.

प्रभावी सामाईक कारवाईसाठी तीनही दलात समन्वय वृद्धिंगत केला जात आहे. त्यासाठी एका दलातील अधिकारी दुसऱ्या दलात (क्रॉस पोस्टिंग) नियुक्तीतून उत्कृष्ट कार्यपद्धती विकसित करण्याचा प्रयत्न होत आहे. बहुविध युद्धक्षेत्रात भारताच्या तीनही सैन्यदलांची ताकद एकत्रितपणे वापरण्याची संकल्पना प्रशिक्षणातून मजबूत केली जात आहे. तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात संयुक्तपणे विशेष लष्करी शिक्षण घेणाऱ्या ‘पर्पल’ अधिकाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
aniket.sathe@expressindia.com