What Ails The Indian Armed Forces : भारतीय लष्करातील जवानांच्या आरोग्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक लेखा समितीने बुधवारी लोकसभेत एक अहवाल सादर केला. या अहवालात भारतीय सशस्त्र दलातील जवानांमध्ये जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले. कडक शिस्त आणि खडतर शारीरिक प्रशिक्षण असूनही जवानांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांना नेमकं झालंय तरी काय? त्यांना आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या जाणवत आहेत? त्याविषयीचा हा आढावा…

मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर रात्रंदिवस कडक पहारा देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याचे नेहमीच कौतुक केले जाते. आजवर अनेक महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये भारतीय लष्कराने मोठमोठे पराक्रम गाजवत शत्रूंना धूळ चारली आहे. मात्र, कडक शिस्त आणि खडतर शारीरिक प्रशिक्षण घेणाऱ्या या जवानांनाही जीवनशैलीशी संबंधित आजाराने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेषत: उच्च रक्तदाब आणि टाइप-२ मधुमेह यांसारख्या आजारांचे प्रमाण भारतीय जवानांमध्ये लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे.

अहवालात नेमके काय नमूद करण्यात आले?

खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संसदेत सादर केलेला हा अहवाल २०२३ च्या महालेखापरीक्षक (CAG) अहवालावर आधारित आहे. संरक्षण मंत्रालयाशी संबंधित ‘भारतीय लष्करातील अपंगत्व पेन्शन’ या विषयावरील समितीच्या जुन्या निरीक्षणांवर सरकारने काय कारवाई केली, याचा आढावा या अहवालातून घेण्यात आला आहे. त्यामध्ये भारतीय लष्करासह नौदल आणि हवाई दलातील जवानांच्या आरोग्याची सविस्तर आकडेवारी मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे, देशातील सामान्य नागरिकांच्या तुलनेत लष्करातील आजारांचे प्रमाण कमी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कामाचा ताण, भौगोलिक परिस्थिती आणि बदलती जीवनशैली ही या आजारांमागची कारणे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी वाचा : Who is Smita Ghosh : कोण आहेत भारतीय वंशाच्या स्मिता घोष? त्यांनी ट्रम्प प्रशासनाला न्यायालयात का खेचले? कारण काय?

नौदलातील किती जवानांना आजारांनी ग्रासलं?

सार्वजनिक लेखा समितीच्या अहवालानुसार, भारतीय सैन्यात उच्च रक्तदाबाचे प्रमाण ९.६१ टक्के तर टाइप-२ मधुमेहाचे प्रमाण २.७८ टक्के नोंदवण्यात आले आहे. त्या तुलनेत राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, भारतातील सामान्य लोकसंख्येमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण १८.३ टक्के आणि मधुमेहाचे प्रमाण ४.९ टक्के आहे. लष्करातील सततची आरोग्य जागरूकता, शारीरिक व्यायाम आणि जीवनशैलीविषयक आजार रोखण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या कडक धोरणांमुळे हे शक्य झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतीय नौदल आणि वायुदलातील आजारांचे प्रमाणही या अहवालात मांडण्यात आले आहे. भारतीय नौदलात उच्च रक्तदाबामुळे ‘लो मेडिकल कॅटेगरी’मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या ३८४ असून ९९९ नौसैनिकांमध्येही हा आजार आढळून आला आहे. मधुमेहाच्या बाबतीत २५२ अधिकारी ‘लो मेडिकल कॅटेगरी’मध्ये आहे, तर ४६६ नौसैनिकांनाही या आजाराने ग्रासल्याचे निदर्शनास आले आहे.

हवाई दलातील आजाराची स्थिती काय?

‘लो मेडिकल कॅटेगरी’ ही संज्ञा अशा कर्मचाऱ्यांसाठी वापरली जाते, ज्यांची पूर्ण लढाऊ क्षमता आरोग्याच्या कारणांमुळे बाधित झाली आहे. अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी अनिवार्य वैद्यकीय आणि फिटनेस चाचण्या द्याव्या लागतात. भारतीय हवाई दलातील जवानांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ४.०५ टक्के तर मधुमेहाचे प्रमाण २.८५ टक्के इतके आहे. १३ सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, हवाई दलातील ६३५ अधिकारी मधुमेहाने, ७१८ उच्च रक्तदाबाने, २४४ लठ्ठपणाने; तर १७० अधिकारी हृदयविकाराने ग्रासले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या आकडेवारीवरून सशस्त्र दलांमध्ये जीवनशैलीजन्य आजारांचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्ट होत असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली जात आहे.

किती जवानांना जीवनशैलीशी संबंधित आजार?

जीवनशैलीशी संबंधित आजारांमुळे भारतीय नौदलातील एकूण ११,४७६ जवानांपैकी ६३६ (५.६%) जण ‘लो मेडिकल कॅटेगरी’मध्ये आहेत. विशेष म्हणजे, उच्च श्रेणीतील अधिकाऱ्यांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून ४१० पैकी ७७ (१८.८%) जण ‘लो मेडिकल कॅटेगरी’मध्ये असल्याचे समोर आले आहे. कॅप्टन पदावर असलेल्या १,२३२ पैकी २२८ (१८.५%) अधिकाऱ्यांचा समावेश या वर्गात आहे; तर सब-लेफ्टनंट दर्जातील ८८३ अधिकाऱ्यांपैकी एकाही अधिकाऱ्याला ‘लो मेडिकल कॅटेगरी’मध्ये ठेवण्यात आलेले नाही. दुसरीकडे हवाई दलातील जवानांमध्ये उच्च रक्तदाबाचे एकूण प्रमाण ५.५३ टक्के आहे. यामध्ये फ्लाइंग स्टाफमधील ३.३० टक्के, ग्राउंड ड्युटीमधील ७.२८ टक्के आणि मेडिकल स्टाफमधील २.७० टक्के जवानांचा समावेश आहे. फ्लाइंग स्टाफमध्ये वैमानिक आणि नेव्हिगेटर यांचा समावेश होतो; तर ग्राउंड ड्युटीमध्ये अभियांत्रिकी, एअर ट्रॅफिक कंट्रोल, प्रशासन, लेखा, हवामानशास्त्र, शिक्षण आणि लॉजिस्टिक्स अशा विविध शाखांचा समावेश आहे. याशिवाय हवाई दलातील जवानांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाणही झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : अमेरिकेच्या लष्करप्रमुखांची पदावरून हकालपट्टी; ट्रम्प प्रशासनाने कठोर निर्णय का घेतला?

जवानांमधील आजारांचे मूळ कारण काय?

भारतीय सशस्त्र दलातील जवानांमध्ये वाढणाऱ्या जीवनशैली संबंधित आजारांमागे वाढते वय आणि मानसिक ताण ही प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. लोकलेखा समितीने चिंता व्यक्त करत या आजारांचे मूळ शोधण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानुसार, अधिकारी श्रेणीतील व्यक्ती जवानांच्या तुलनेत अधिक काळ सेवा बजावतात. जवानांचे निवृत्तीचे वय साधारण ३४ ते ३७ वर्षे असते; तर अधिकारी वयाच्या ५६ वर्षांपर्यंत सेवेत असतात. वाढत्या वयानुसार मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याचा नैसर्गिक धोकाही वाढतो. अधिकारी आणि दीर्घकाळ सेवा करणारे जवान विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक तणावाखाली अधिक काळ राहतात, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. समितीने स्पष्ट केले की, या आजारांची कारणे अनेक असू शकतात आणि मर्यादित माहितीच्या आधारे केवळ एकाच कारणावर बोट ठेवणे कठीण आहे.

तिन्ही दलांच्या उपाययोजना काय?

जवानांमध्ये आजारांचे वाढते प्रमाण पाहता तिन्ही दलांनी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या मते, जवानांमध्ये जीवनशैलीजन्य आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी नियमितपणे त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्यासाठी लष्करी रुग्णालयांमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती मोहिमा आणि आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. याशिवाय वजन वाढलेल्या किंवा जीवनशैलीजन्य आजार असलेल्या जवानांच्या दारूच्या कोट्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. कामाचा तणाव कमी करण्यासाठी त्यांना मानसोपचार सल्ला देण्यासारख्या उपाययोजनांचाही अवलंब केला जात आहे. या उपाययोजनांद्वारे सशस्त्र दलांमध्ये वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.