Learn about the tactical deployment of Indian Army Integrated Battle Groups IBG on China border from July 2026: भारतीय लष्कराच्या युद्धसज्जतेमध्ये आणि इतिहासामध्ये गेल्या काही दशकांतील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक संरचनात्मक बदल अखेर प्रत्यक्षात येत आहे. येत्या १ जुलै २०२६ पासून भारतीय लष्कराच्या पहिल्या ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स’ना (Integrated Battle Groups – IBGs) अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. हे नवे हायटेक युद्धगट पश्चिम बंगालमधील पानागढ येथे मुख्यालय असलेल्या १७ व्या माऊंटन स्ट्राइक कोअरअंतर्गत चीन सीमेवर तैनात केले जाणार असून, यामुळे भारताची प्रहार क्षमता कैक पटीने वाढणार आहे. ही केवळ संघटनात्मक पुनर्रचना नसून भारतीय लष्कराच्या युद्ध लढण्याच्या पद्धतीत अर्थात रणनीतिमध्ये होत असलेला हा मूलभूत बदल आहे.
वेग, समन्वय, तंत्रज्ञान आणि अचूक प्रहारक्षमता
गेल्या काही वर्षांत जगभरातील युद्धांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे युद्धात विजय हा केवळ सैन्य किती मोठे आहे यावर ठरत नाही; तर वेग, समन्वय, तंत्रज्ञान आणि अचूक प्रहारक्षमता यांवर तो अधिक अवलंबून असतो. रशिया-युक्रेन युद्ध, नागोर्नो-कराबाख संघर्ष, इस्रायल-हमास युद्ध तसेच २०२० मधील भारत-चीन सीमावाद या सर्व घटनांनी आधुनिक युद्धाचे स्वरूप बदलल्याचे अधोरेखित केले आहे. भारतीय लष्कराची ही नवी रचना त्या बदलत्या वास्तवाचेच प्रतिबिंब आहे.
पारंपरिक लष्करी रचना कालबाह्य का?
भारतीय लष्कराची विद्यमान रचना प्रामुख्याने डिव्हिजन आणि कोअर या मोठ्या लष्करी तुकड्यांवर आधारित आहे. एका कोअरमध्ये साधारणपणे ४० हजारांपासून एक लाख सैनिकांपर्यंतची क्षमता शकते. एवढ्या मोठ्या सैन्यदलाला सज्ज करून सीमेजवळ पोहोचविण्यास वेळ लागतो. विशेषतः हिमालयाच्या परिसरात वावरासाठी कठीण भूप्रदेश, मर्यादित रस्ते आणि प्रतिकूल हवामानामुळे ही प्रक्रिया अधिक संथ होते. सध्याची युद्धे कोणत्याही सैन्याला एवढा वेळ देतच नाहीत. प्रतिस्पर्ध्याने कारवाई सुरू केल्यानंतर काही तासांतच प्रत्युत्तर देणे आवश्यक असते. तुमचे सैन्य योग्य वेळी, योग्य ठिकाणी असणे आवश्यक असते. संपूर्ण कोअर हलविण्याऐवजी आवश्यक तेवढीच पण सर्व क्षमता असलेली लढाऊ तुकडी त्वरित पाठविण्याची गरज निर्माण झाली. याच विचारातून इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्सची संकल्पना पुढे आली.

इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप म्हणजे काय?
इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप म्हणजे स्वतःच्या बळावर स्वतंत्रपणे लढू शकणारी, ब्रिगेडपेक्षा मोठी पण डिव्हिजनपेक्षा लहान अशी स्वयंपूर्ण लढाऊ तुकडी. एका IBG मध्ये साधारण पाच हजारांहून अधिक सैनिक असतील. त्यामध्ये केवळ पायदळ नव्हे, तर तोफखाना, अभियांत्रिकी दल, इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्स (EME), सिग्नल्स, पुरवठा व्यवस्था, वैद्यकीय पथक, दारुगोळा, वाहतूक आणि इतर आवश्यक सहाय्यक दल एकाच कमांडखाली असतील. म्हणजेच ही स्वयंपूर्ण पद्धतीने लढणारी तुकडी असेल. युद्ध सुरू झाल्यावर स्वतंत्रपणे काम करण्यासाठी त्यांना डिव्हिजन किंवा कोअरकडून अतिरिक्त मदतीची वाट पाहावी लागणार नाही. निर्णय, हालचाल आणि हल्ला हे सर्व अधिक वेगाने करता येईल.
चीनच्या सीमेपासूनच सुरुवात कशासाठी?
पहिले IBGs चीन सीमेकडे तैनात असलेल्या १७ व्या माऊंटन स्ट्राइक कोअरमध्ये तयार होत आहेत. २०१३ मध्ये चीनच्या वाढत्या लष्करी आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर या कोअरची सुरुवात करण्यात आली होती. तिचे उद्दिष्ट केवळ संरक्षण नसून, गरज पडल्यास हिमालयीन क्षेत्रात आक्रमक कारवाया करणे हेही आहे. या कोअरअंतर्गत असलेल्या २३ इन्फंट्री डिव्हिजन आणि ५९ माऊंटन डिव्हिजनमधून प्रत्येकी दोन अशा एकूण चार IBGs तयार करण्यात येणार आहेत. याशिवाय स्वतंत्र फायर सपोर्ट ग्रुपही उभारण्यात येणार आहे. या प्रत्येक गटाचे नेतृत्व मेजर जनरल दर्जाचा अधिकारी करेल.
फायर सपोर्ट ग्रुपचे महत्त्व
या नव्या रचनेतील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे फायर सपोर्ट ग्रुप. यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा, क्षेपणास्त्र प्रणाली, अचूक प्रहार करणारी शस्त्रे आणि नव्याने उभारल्या जात असलेल्या ‘दिव्यास्त्र’ बॅटरीज यांचाही समावेश केला जाण्याची शक्यता आहे. युद्धाच्या वेळी वेगवेगळ्या IBGs ना आवश्यक त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात तोफगोळे उपलब्ध करून देण्याचे काम हा गट करेल. आधुनिक युद्धामध्ये ‘फायर पॉवर’ हा विजयाचा महत्त्वाचा घटक मानला जातो, त्यामुळे या संकल्पनेला विशेष महत्त्वाच प्राप्त झाले आहे.
संकल्पना नवीन नाही
इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्सची संकल्पना गेल्या सात-आठ वर्षांपासून चर्चेत आहे. तत्कालीन लष्करप्रमुख आणि नंतर देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ठरलेले जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराच्या पुनर्रचनेसाठी चार अभ्यासगट नेमले होते. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रस्ताव हा IBGs चा होता. २०१९ मध्ये पाकिस्तान सीमेजवळील नवव्या कोअरमध्ये या संकल्पनेची चाचणी घेण्यात आली. त्याच वर्षी पूर्वेकडील पर्वतीय भागात झालेल्या ‘हिमविजय’ या युद्धसरावामध्येही या रचनेची परिणामकारकता तपासण्यात आली. त्या अनुभवांच्या आधारे आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत आहे.
केवळ IBGs नव्हे, संपूर्ण लष्करातच बदलाचे वारे
भारतीय लष्कराची पुनर्रचना केवळ IBGsपुरती मर्यादित नाही. याच प्रक्रियेत रुद्र ब्रिगेड, भैरव बटालियन, दिव्यास्त्र बॅटरी आणि शक्तिबाण युनिट्स अशा नव्या संकल्पनाही विकसित होत आहेत. ‘रुद्र ब्रिगेड’मध्ये विविध लढाऊ दलांचे एकत्रिकरण केले जात आहे. ‘भैरव बटालियन’मध्ये ड्रोन, लोटरिंग म्युनिशन्स (घिरट्या घालून योग्य वेळ साधत हल्ला करणारे), अत्याधुनिक शस्त्रे आणि आधुनिक टेहळणी प्रणालींवर भर असेल. ‘दिव्यास्त्र’ आणि ‘शक्तिबाण’ यांचा भर लांब पल्ल्याच्या अचूक प्रहार क्षमतेवर असेल. याचा अर्थ भारतीय लष्कर सध्या तंत्रज्ञानाधारित, नेटवर्क-सेंट्रिक आणि वेगवान युद्धक्षमता विकसित करत आहे.
चीनकडून घेतलेला धडा
२०१५ नंतर चीननेही पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये मोठे बदल केले. पारंपरिक डिव्हिजन रद्द करून कम्बाइंड आर्म्स ब्रिगेड्सची (Combined Arms Brigades) उभारणी केली. या ब्रिगेडमध्ये रणगाडे, पायदळ, तोफखाना, हवाई संरक्षण, अभियांत्रिकी आणि रसद व्यवस्था एकाच छताखाली आणण्यात आली. भारताची IBG संकल्पना ही चीनची नक्कल नाही. मात्र, बदलत्या युद्धपद्धतीचा स्वीकार करताना चीनच्या सुधारणांमधून मिळालेल्या धड्यांचा त्यात स्पष्ट प्रभाव दिसून येतो.
लडाखनंतर बदललेले वास्तव
२०२० मध्ये पूर्व लडाखमध्ये चीनने अत्यंत वेगाने सैन्य, रणगाडे आणि तोफखाना भारतीय सीमेजवळ आणला. तिबेटमध्ये आधीपासून तयार करण्यात आलेले रस्ते, रेल्वेमार्ग आणि हवाई तळ यामुळे त्यांना ही हालचाल अल्पावधीत शक्य झाली. भारतालाही त्याच वेगाने प्रतिसाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सैन्य हलवावे लागले. त्या अनुभवातून भारतीय लष्कराला एक गोष्ट शिकायला मिळाली, ती म्हणजे भविष्यातील संघर्षामध्ये ज्याची हालचाल जलद, त्याचाच वरचष्मा युद्धात अधिक! IBGs ही त्या अनुभवातून जन्माला आलेली व्यावहारिक संकल्पना मानली जाते.
भविष्यातील आव्हाने
नवीन रचना उभारणे जितके महत्त्वाचे, तितकेच ती प्रभावीपणे चालविणेही आवश्यक असते. विविध दलांमधील समन्वय, आधुनिक कम्युनिकेशन अर्थात संवाद प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि अचूक शस्त्रास्त्रांचा एकात्मिक वापर यावर IBGs चे यश अवलंबून असेल. त्यासाठी सैनिकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच नव्या पद्धतीचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. रसद व्यवस्था, देखभाल आणि कमांड अॅण्ड कंट्रोल प्रणालीही नव्याने उभारावी लागेल.
भविष्यातील युद्धाची पायाभरणी
इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्सची स्थापना हा केवळ लष्करी बदल नाही; तर भारतीय संरक्षण धोरणातील एका नव्या युगाचा प्रारंभ आहे. भविष्यात प्रस्तावित थिएटर कमांड्स अस्तित्वात आल्यास हेच IBGs त्या संयुक्त कमांड्सचे मूलभूत लढाऊ घटक असतील. भारतीय लष्कराची पारंपरिक ताकद म्हणजे अधिक मनुष्यबळ क्षमता. परंतु भविष्यातील युद्धात वेग, समन्वय, माहिती, अचूकता आणि तंत्रज्ञान हेच निर्णायक ठरणार आहेत. त्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. चीनसोबतची वाढती स्पर्धा, सीमावर्ती भागातील बदलती सुरक्षा स्थिती आणि तंत्रज्ञानाधारित युद्धाचे वास्तव लक्षात घेतले, तर भारतीय लष्कराने सुरू केलेली ही पुनर्रचना केवळ आजच्या गरजांसाठी नाही, तर पुढील अनेक दशकांतील युद्धसज्जतेची पायाभरणी ठरणार आहे.
- संदर्भ:
- १. संरक्षण मंत्रालय, भारत सरकार – वार्षिक अहवाल (२०२५-२६).
२. भारतीय लष्कराची अधिकृत माहितीपत्रके आणि युद्धसिद्धांत.
३. Exercise HimVijay (२०१९) संबंधित अधिकृत निवेदने.
४. जनरल बिपीन रावत यांची लष्कराच्या पुनर्रचनेवरील भाषणे आणि मुलाखती.
५. International Institute for Strategic Studies (IISS), The Military Balance.
६. CSIS आणि RAND Corporation यांचे PLA व आधुनिक युद्धरचनेवरील अभ्यास.
