लष्करामधील वसाहतवादी काळातील खुणा पुसण्याच्या उद्देशाने नव्या पद्धतीचे गणवेश भारतीय लष्कराने प्रस्तावित केले आहेत. यामध्ये वसाहतवादी खुणा पुसण्याच्या उद्दिष्टाबरोबरच अनावश्यक बाबीही हटविण्यात आल्या आहेत. या संबंधीचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले असून, लष्कराने अधिकृतरीत्या बदललेल्या गणवेशांबाबत जाहीर माहिती दिलेली नाही.
नव्या धोरणामध्ये काय?
सशस्त्र दलांची परंपरा कायम राखतानाच भारतातील समकालीन मूल्यांशी अनुरूप गणवेश तयार करण्यात आले आहेत. हे गणवेश आठ वर्षांनी बदलण्यात येत आहेत. या नव्या गणवेशांमध्येही तिन्ही दलांतील समन्वय अधिक चांगला कशा पद्धतीने होईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी ‘समान गणवेश क्रमांक’ (युनिफॉर्म नंबर स्कीम) असून, विविध प्रकारचे गणवेश तयार करणे आणि खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे. लष्करामध्ये सोहळ्यामध्ये परिधान करण्याचा गणवेश (सेरेमोनिअल ड्रेस), काम करतानाचा गणवेश (वर्किंग ड्रेस), भोजनावेळी परिधान करण्याचा गणवेश (मेस ड्रेस) आणि लढताना आवश्यक असलेला गणवेश (कॉम्बॅट ड्रेस) असे चार प्रकार आहेत. गणवेशाच्या प्रत्येक प्रकाराला एक नंबर दिला असून, त्यामुळे प्रशासनिक हाताळणीमध्ये सुविधा होणार आहे.
नवी गणवेश नियमावली
सध्याची गणवेश नियमावली अधिक सोपी करण्याचा प्रयत्न नव्या नियमावलीमध्ये करण्यात आला आहे. अधिक ठळकपणे दिसतील अशा खुणा, लिंगनिरपेक्षतेकडे (जेंडर न्यूट्रल) वाटचालीचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. हा केवळ गणवेशातील बदल नसून, संस्थात्मक ओळख आणि मूल्यांची हमी देण्याचा प्रयत्न असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
वसाहवादी खुणा पुसण्याचे प्रयत्न
या नव्या धोरणामध्ये पारंपरिक बंडी-जॅकेटचा समावेश नागरी परिधानासाठी करण्यात आला आहे. तसेच, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या ‘मेस ड्रेस’मधून ‘पाउच बेल्ट’ हटविण्यात आला आहे. तसेच, ब्रिटिशकालीन ‘रॉयल’ ही संकल्पना पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. गणवेश आधुनिक करण्याबरोबरच लष्कराची प्रतिष्ठा, कार्यप्रणाली आणि दीर्घ काळाची परंपरा कायम राहणार असल्याचे लष्कराने म्हटले आहे.
मुख्य सोहळ्यांमध्येच तलवार
नव्या नियमानुसार, यापुढे केवळ संचलन करताना परेड कमांडर, काँटिंजन्ट कमांडर हातामध्ये तलवार घेऊ शकतील. तसेच, काही ठरावीक जवान स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, लष्कर दिनी होणारे संचलन, ‘गार्ड ऑफ ऑनर’ अशा महत्त्वाच्या सोहळ्यांमध्ये तलवार घेऊ शकतील. ‘रिव्ह्यूइंग ऑफिसर’ना तलवार बाळगणे बंधनकारक राहणार नाही.
हिवाळ्यासाठी ‘बॅटल जॅकेट’
याखेरीज, लष्कराने नवा हिवाळी गणवेश, बॅटल जॅकेट प्रस्तावित केले आहे. सध्या हिवाळ्यासाठी असलेला ‘३ ए’ क्रमांकाचा गणवेश हटविण्यात आला आहे. त्यामुळे गणवेशामध्ये समानता येण्यास मदत होईल, असे लष्कराने म्हटले आहे. सर्व हुद्द्यांवरील अधिकाऱ्यांसाठी हे एकसमान जॅकेट असेल. हा बदल जून २०२९ पासून करण्यात येणार आहे.
वैयक्तिक पातळीवरील शिस्त
लष्करातील रँक, गणवेश, स्वच्छता याबरोबरच जवान-अधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर काय काळजी घ्यावी, याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. गणवेश परिधान केलेला असताना योग्य पद्धतीने कापलेले केस ठेवण्यासह त्या वेळी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगता येणार नाही. तसेच, टॅटू गोंदवून घेणे आणि मेक-अप करता येणार नसल्याचेही त्यात म्हटले आहे. तसेच, राजकीय, धार्मिक, विवाह किंवा खासगी कार्यक्रमांना गणवेश परिधान करता येणार नाही. आंदोलन, मोर्चे, माध्यमांचे कार्यक्रम यांदरम्यानही परवानगीशिवाय गणवेश परिधान करता येणार नाही.
भारतीयीकरणाचे यापूर्वीचे प्रयत्न
लष्कराने या वर्षाच्या सुरुवातीला वसाहतवादी खुणा पुसण्यासाठी २४६ रस्त्यांना, इमारतींना, आस्थापनांना नवी नावे दिली. यामध्ये १२४ रस्ते, ७७ कॉलनी, २७ इमारती आणि इतर लष्करी आस्थापना, प्रशिक्षण केंद्रे, उद्याने, मैदाने, हेलिपॅड आदींचा समावेश आहे. दिल्ली कँटोन्मेंटमधील कर्बी प्लेसचे नाव केनुगुरुज विहार असे करण्यात आले आहे, तर मॉल रस्त्याचे नाव अरुण खेत्रपाल मार्ग करण्यात आले आहे. अंबाला कँटोन्मेंटमध्ये पॅटर्सन रस्ता क्वार्टर आता धनसिंग थापा संकुल म्हणून ओळखले जात आहे. मथुरा कँटोन्मेंटमध्ये न्यू हॉर्न लाइनचे नाव अब्दुल हमीद लाइन्स ठेवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी अशी नावे बदलण्यात आली आहेत.
