भारतीय लष्करातील आधुनिकीकरणाची गरज अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे. त्या अंतर्गत नुकतेच ‘विक्रम व्हीटी २१’ या अत्याधुनिक वाहनाचे प्रारूप सादर करण्यात आले. आता हे वाहन लष्करात दाखल करण्यापूर्वी आवश्यक त्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘विक्रम व्हीटी २१’ या चिलखती वाहन निर्मितीची गरज, या वाहनाची वैशिष्ट्ये, प्रारूप निर्मितीपर्यंतचा प्रवास या अनुषंगाने घेतलेला वेध…
नवे चिलखती वाहन महत्त्वाचे का?
भारतीय सैन्य गेली चार दशके बीएमपी २ या पायदळ लढाऊ वाहनांवर अवलंबून आहे. मात्र बदलत्या युद्ध तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ही वाहने आता कालबाह्य ठरत चालली आहेत. ड्रोन तंत्रज्ञान, नेटवर्क-आधारित युद्धाच्या युगात अधिक वेगवान, सुरक्षित, ‘स्मार्ट’ चिलखती वाहनांची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अहिल्यानगर येथील वाहन संशोधन आणि विकास (व्हीआरडीई) या संस्थेने विकसित केलेले ‘विक्रम व्हीटी २१’सारखे स्वदेशी बनावटीचे चिलखती वाहनाचे ट्रॅक आणि व्हील या दोन्ही प्रकारातील प्रारूप महत्त्वाचे ठरते. व्हीआरडीईने डीआरडीओच्या अन्य प्रयोगशाळांच्या मदतीने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले. त्यामुळे आता चार दशके जुनी प्रणाली बदलली जाणार आहे.
२०२२ मध्ये प्रकल्पाला मंजुरी आणि २९२ कोटी रुपयांचा निधी मिळाला. २०२३ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून २०२६ मध्ये प्रारूप सादर करण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यात आला. जर्मनीच्या प्युमा, रशियन बीएमपी ३ अशा सर्वोत्तम प्रणालींच्या तोडीचे प्रारूप विकसित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
फ्यूचर इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल म्हणजे काय?
बीएमपी २ प्रकारातील चिलखती वाहने १९८६ पासून वापरात आहेत. कालांतराने या वाहनांच्या आधुनिकीकरणाची गरज व्यक्त करण्यात आली. त्यातून २००५ मध्ये फ्यूचर इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकल (एफआयसीव्ही) ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यात भविष्याचा वेध घेऊन लष्करासाठी लढाऊ वाहनांची निर्मिती करण्याचा उद्देश होता. एफआयसीव्हीच्या माध्यमातून रशियन बनावटीच्या बीएमपी २ या लढाऊ वाहनाची जागा घेणे, तसेच २०१७ पर्यंत ही वाहने सैन्यात समाविष्ट करण्याची अपेक्षा होती. त्यानुसार या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास डिसेंबर २००९ मध्ये पूर्ण करण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर २००९ मध्ये डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिलसमोर (डीएसी) सादर करण्यात आला. त्याला मंजुरीही मिळाली.
मात्र, त्यानंतर हा प्रकल्प बरीच वर्षे रखडला होता. २०१२, २०१५ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न पूर्णत्वास गेला नाही. मात्र, २०१९ मध्ये प्रकल्पाचे स्वरूप बदलून खासगी उद्योगाने डिझाइन करून सैन्याला सादर करण्याची कल्पना पुढे आली. हा पर्यायही यशस्वी झाला नाही. २०१० ते २०२० या काळात उद्योगांनीच हा प्रकल्प करावा, डीआरडीओने थेट डिझाइन आणि विकासात उतरू नये, असा मंत्रालय आणि संबंधित घटकांचा विचार होता. त्यामुळे डीआरडीओ, व्हीआरडीईसारख्या सरकारी प्रयोगशाळा यात सहभागी झाल्या नाहीत. मात्र, २०२२ मध्ये डीआरडीओने तातडीची निकड लक्षात घेऊन या कामाला गती देत व्हीआरडीईकडे ट्रॅक आणि व्हील या दोन्ही प्रकारातील वाहन विकसित करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानंतर तीन वर्षांत व्हीआरटीईने ट्रॅक आणि व्हील प्रकारातील वाहनांची प्रारूपे विकसित केली.
नव्या वाहनांची वैशिष्ट्ये काय?
डीआरडीओच्या व्हीआरडीई या प्रयोगशाळेने खासगी उद्योगांच्या सहकार्याने विकसित केलेले ‘विक्रम व्हीटी-२१’ हे प्रारूप आधुनिक प्रगत लढाऊ चिलखती वाहन आहे. या वाहनाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य ३० मिमीचा मानवरहित टॉवर आहे. यामुळे गोळीबार करताना जवान थेट धोक्यापासून दूर राहतात. त्यासोबत या वाहनाला ७.६२ मिमी पीकेटी मशीनगन आणि तिसऱ्या पिढीची रणगाडारोधी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता देण्यात आली आहे.
संरक्षणाच्या दृष्टीने एसटीएएनएजीच्या स्तर चार आणि पाच प्रमाणे बॅलेस्टिक, स्फोटक संरक्षण देण्यात आले आहे. उच्च क्षमतेचे इंजिन आणि स्वयंचलित ट्रान्समिशनमुळे वाहनाचा वेग आणि अडथळे पार करण्याची क्षमता जास्त आहे. ट्रॅक आणि व्हील्ड अशा दोन्ही प्रकारांत उपलब्ध असल्याने या वाहनाचा वेगवेगळ्या भूभागांमध्ये वापर शक्य आहे. तसेच हायड्रो जेट्सच्या साहाय्याने या वाहनाचा पाण्यातही वापर करता येऊ शकतो. या वाहनामध्ये प्रगत सेन्सर्स, निरीक्षण प्रणाली आणि डिजिटल संपर्क यंत्रणा आहे. त्यामुळे युद्धभूमीवरील माहिती तात्काळ (रिअल-टाइम) मिळून निर्णय प्रक्रिया जलद होते. तसेच प्रतिसाद क्षमता वाढते. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लक्ष्य ओळख आणि शस्त्र निवड अचूक करण्याचेही नियोजन आहे. तसेच प्रगत भू-नकाशीकरण प्रणालीमुळे रणांगणावरील परिस्थितीचे अचूक आकलन करता येऊ शकते.
प्रारूप विकसनानंतर पुढे काय?
प्रारूप विकसित झाल्यानंतर या वाहनाच्या सैन्याकडून वेगवेगळ्या प्रदेशांत, वेगवेगळ्या भूभागांवर चाचण्या घेतल्या जाणार आहेत. उदाहरणार्थ, डोंगराळ भाग, वाळवंट, बर्फाळ प्रदेश. ही प्रक्रिया सुमारे दोन वर्षे चालू शकते. त्यानंतर २०२८ पर्यंत हे वाहन सैन्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘बीएमपी २’ या वाहनांची जागा नवी ‘विक्रम व्हीटी २१ कडून घेतली गेल्यास हे वाहन लष्कराच्या आधुनिकीकरण प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा, तसेच लष्कराच्या क्षमता वर्धनासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरू शकणार आहे.
chinmay.patankar@expressindia.com
