जागतिक पातळीवरील आर्थिक सल्लागार संस्था पीडब्लूसीने (PwC) एक अहवाल प्रकाशित केला आहे. भारतातील व्यावसायिक कुटुंबांना व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपवताना कोणती आव्हाने येतात, ते अहवालात सांगण्यात आले. पुढची पिढी व्यवसायातील आव्हानांचा सामना करू शकेल की नाही? याबाबत भीती ज्येष्ठांना वाटत असते. त्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होण्याचे प्रमाण अधिक आहे. हे वाद कधीकधी चव्हाट्यावर येतात. न्यायालय, समाज माध्यमांमध्ये या वादांबाबत चर्चादेखील होते.

PwC च्या भारतातील सर्वेक्षणात सहभागींपैकी ५२ टक्के जणांनी सांगितले की, पुढच्या पिढीकडे व्यवसाय सोपवताना घरातील ज्येष्ठांकडूनच विरोध होतो. त्यामुळे व्यवसाय सांभाळू शकणारे नवीन नेतृत्व तयार होण्यात अडथळे येतात. तर जागतिक पातळीवरील सर्वेक्षणात सहभागींपैकी फक्त २९ टक्के जणांनी घरातील ज्येष्ठांकडून विरोध होत असल्याचे सांगितले. अलिकडच्या काळात भारतातील रेमंड, अपोलो टायर, रॅनबॅक्सी आणि मोदी ग्रुप या उद्योग समुहांमध्ये कौटुंबिक कलह दिसून आले. त्यामुळे भारतात ही समस्या का आहे? भारतातील कौटुंबिक व्यवसायांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? ते जाणून घेऊयात.

पुढच्या पिढीकडे व्यवसाय सोपवताना कुटुंबात वाद

भारतात व्यवसाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवताना कुटुंबात वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कुटुंबातील वाद सार्वजनिक रूप धारण करून माध्यमांत झळकतात व चर्चेचा विषय ठरतात. तसेच अनेक कौटुंबिक वाद हे न्यायालयात जातात. अशा वादांमुळे शेअर्स धारक, गुंतवणूकदार यांचा त्या व्यवसायावरील विश्वास कायमचा जाण्याची शक्यता अधिक असते. त्याचा व्यवसायावर देखील परिणाम होतो. भारतात असेच काही वाद मागील काही वर्षांमध्ये समोर आले आहेत.

रेमंडबाबत पिता-पुत्रात टोकाचा वाद

रेमंडबाबत देखील असाचा वाद निर्माण झाला होता. विजयपत सिंघानिया यांनी रेमंड हा ब्रँड तयार केला. त्यानंतर वयोमानानुसार त्यांनी रेमंडची सुत्रे त्यांच्या मुलाच्या म्हणजेच गौतम सिंघानिया यांच्या हातात सोपवली. त्यानंतर पितापुत्रामध्ये टोकाचा वाद झाला. तो वाद माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला होता. विजयपत यांनी मुलाने आपल्याला कंपनीत काढून टाकल्याचे माध्यमांमध्ये सांगितले होते, तसेच आता त्यांच्याकडे ‘काहीच उरले नाही’, असे विजयपत यांनी व्याकुळतेने सांगितले होते. ते मुलापासून स्वतंत्र राहत असल्याची माहितीही समोर आली होती.

अपोलो टायर, रॅनबॅक्सी व केके मोदी ग्रुपमधील कौटुंबिक कलह

अपोलो टायर कंपनीतही नव्वदच्या दशकात असाच वाद निर्माण झाला होता. ओंकार कंवर यांचा त्यांचे वडील व अपोलो टायरचे संस्थापक रोनक सिंग यांच्याबरोबर वाद झाला होता. रोनक सिंग हे १९७६ पासून अपोलो टायरचे अध्यक्ष होते. कंपनीवरील नियंत्रणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. सध्या ओंकार कंवर हे अपोलो टायरचे अध्यक्ष आहेत.

फार्मा क्षेत्रातील महत्वाच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रॅनबॅक्सीला सन फार्माने विकत घेतल्यानंतर वाद निर्माण झाला होता. परविंदर सिंह यांनी या कंपनीची सूत्रे त्यांच्या मुलांकडे सोपवली होती. मुलांनी आक्रमकपणे काही निर्णय घेतले होते. त्यानंतर परविंदर व त्यांच्या मुलांमध्ये कंपनीवरील नियंत्रणावरून वाद उद्भवला होता.

केके मोदी ग्रुपमध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोटुंबिक वादामुळे या समूहात देखील कायदेशीर लढाई सुरू होती. वडिलांच्या मृत्यूनंतर गोडफ्रे फिलिप्स इंडिया या कंपनीच्या नियंत्रणावरून मुलगे समीर व ललित आणि त्यांची विधवा आई बिना मोदी यांच्यात वादानंतर कायदेशीर लढाई सुरू झाली होती. हे प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. दरम्यान, भारतात व्यवसायावरील हक्कावरून भावंडामध्येही वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुकेश अंबानी व अनिल अंबानी हे त्यांपैकी एक उदाहरण आहे.

कौटुंबिक व्यवसायात पुढच्या पिढीला रस नसणे हे आव्हान

वडिलांनी किंवा कुटुंबाने उभ्या केलेल्या व्यवसायात पुढच्या पिढीला रस नसणे, हीदेखील एक मोठी समस्या भारतात आहे. पुढची पिढी ही मुख्यत: कंपनी चालवून पैसा कमावण्यापेक्षा कुटुंबाचा पैसा गुंतवून पैसे कमावणे जास्त सोईस्कर असल्याचे मानते, असे समोर आले आहे.

कोटक महिंद्रा समूहाचे संस्थापक उदय कोटक यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, व्यावसायिक कुटुंबातील पुढची पिढी ही कंपनी चालवण्यापेक्षा पैशांची गुंतवणूक करण्यावर अधिक भर देते. म्युच्यूअल फंड, शेअर बाजार, गुंतवणूक यांना पुढची पिढी फुल टाइम जॉब मानते, असे कोटक म्हणाले.

पीडब्ल्यूसीच्या सर्वेक्षणात २७ टक्के जणांनी सांगितले की त्यांना कौटुंबिक व्यवसाय चालवण्यात रस नाही, तर ५६ टक्के जणांनी सांगितले की, पुढच्या पिढीला चांगल्या प्रशिक्षणाची, कौशल्य विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर त्यांना व्यवसाय चालवण्यासाठी देता येईल.

पुढच्या पिढीत कोटुंबिक व्यवसायाबाबत उदासीनता

व्यावसायिक कुटुंबातील पुढच्या पिढीतील तरूणाई ही मुख्यत: परदेशात शिक्षण घेते, असे आढळले आहे. परदेशात शिक्षण घेतल्यानंतर ते तिथेच नोकरी करतात, तिथल्या संस्कृतीशी मिसळून राहतात. त्यामुळे कुटुंबाचा व्यवसाय पुढे चालवण्याबाबत त्यांच्यात उदासीनता दिसून येते. या सगळ्या गोष्टींमुळे भारतातील कौटुंबिक व्यवसायांसमोर काही आव्हाने निर्माण झाली आहेत, असे पीडब्ल्यूसीच्या अहवालातून दिसून येते.

पीडब्ल्यूसीचे इंडियाचे अध्यक्ष संजीव क्रिष्णन म्हणाले, “भारतातील व्यवसायिक कुटुंब समूह हे जागतिक अस्थिरतेच्या काळातही त्यांच्यातील आत्मविश्वास व महत्वाकांक्षेच्या बळावर चांगली कामगिरी करत आहेत. व्यावसायिक स्थिरतेच्या पलिकडे जाऊन व्यवसायाची वाढ करण्यात ते उत्तम कामगिरी बजावत आहेत. तंत्रज्ञानात गुंतवणूक, एआयचा वापर, दूरदृष्टी ठेवून विचार करणे या गोष्टींमध्ये कौटुंबिक व्यवसाय अग्रेसर आहेत.”