भारतातील कारगिल, गलवान आणि डोकलामसह ७७ हून अधिक ऐतिहासिक लष्करी स्थळे पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहेत. हा उपक्रम देशभक्ती वाढवणे, सीमावर्ती भागाचा विकास करणे आणि सैनिकांच्या बलिदानाची माहिती सामान्य नागरिकांना देण्याचे काम करतो, असे सरकारला वाटते.. ‘भारत रणभूमी दर्शन’ असे या उपक्रमाचे नाव आहे. हा उपक्रम लष्कर आणि पर्यटन मंत्रालय संयुक्तपणे राबवित आहे.
बॅटलफिल्ड टुरिझम म्हणजे काय?
युद्धभूमीवरील पर्यटन म्हणजे असा प्रवास ज्याचा प्रमुख उद्देश युद्धभूमी, लष्करी चौक्या, स्मारके, किल्ले, संग्रहालये अशा ठिकाणांना भेटी देणे हा आहे. काही पर्यटक विशेषतः विद्यार्थी, इतिहासाचे अभ्यासक शिकण्यासाठी अशा पर्यटनांना येतात. अन्य एक आठवण, लष्कराचा आदर ठेवण्यासाठी येतात. सैनिकांच्या बलिदानाची जाण ठेवतात.
युद्धभूमी पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न
गेली दोन वर्षे भारत सरकार, लष्कर आणि राज्य सरकारांचे पर्यटन विभाग मिळून जाणीवपूर्वक या युद्धभूमीवरील पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आधी जेथे जाण्यास मज्जाव होता तेथील प्रत्यक्ष युद्धभूमीवरील ठिकाणेदेखील पर्यटनासाठी खुली केली जात आहेत.
भारतीय सैन्य दलांच्या शौर्य आणि बलिदानाशी संबंधित ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे पर्यटकांसाठी खुली करून जागरूकता वाढवण्यासाठी सरकारने भारत रणभूमी दर्शन उपक्रमांतर्गत ७७ स्थळे खुली केली आहेत, अशी माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लोकसभेत दिली होती.
कोणत्या राज्यांमध्ये?
निवडलेल्या स्थळांमध्ये विविध राज्यांचा समावेश आहे, ज्यात जम्मू आणि काश्मीरमधील ११, हिमाचल प्रदेशातील चार, राजस्थानमधील सात, गुजरातमधील पाच, लडाखमधील पाच, सिक्कीममधील सात, अरुणाचल प्रदेशातील २१ आणि उत्तराखंडमधील आठ यांचा समावेश आहे. अलीकडेच १५ डिसेंबर २०२५ रोजी सिक्किमने चो ला आणि डोक ला खिंड पर्यटकांसाठी खुली केली. भारत-चीन सीमेवर असणाऱ्या या भागात जाण्यास पूर्वी बंदी होती. ही दोन्ही शिखरे समुद्रसपाटीपासून १५ हजार फूट उंचीवर आहेत. १९६७ मध्ये चो ला येथे भारत-चीनमध्ये चकमक झाली होती. डोक ला मध्ये २०१७ साली तणावाचे वातावरण होते. अशी ठिकाणे पर्यटकांसाठी खुली करून भारताने दाखवलेलं धारिष्ट्य हे अनेक सीमांवरील संवेदनशील प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या देशाच्या व्यापक धोरणात्मक हालचालींचे प्रतिबिंब आहे. अलीकडच्या महिन्यांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने लष्कराच्या समन्वयाने अशी अनेक ठिकाणे, स्मारके पर्यटकांसाठी खुली केली आहेत. या अंतर्गत कारगिल (१९९९), १९६२, १९७१ ची युद्धे आणि चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे.
सरकारचा उद्देश काय?
अशा धोरणात्मक निर्णयांमुळे लोकांना देशाच्या लष्करी इतिहासाची माहिती होते, दुर्गम भागात पायाभूत विकासाला चालना मिळते, तेथील स्थानिकांना रोजगार मिळतो. सीमावर्ती भागांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा हाही सरकारचा यामागचा उद्देश आहे. ऐतिहासिक स्थळांची तरुण पिढीला ओळख करून देता येते, त्यांना प्रेरणा देता येते. सीमाभाग म्हणजे केवळ सुरक्षा कडे इतकीच ओळख न राहता तेथील निसर्ग, त्या ठिकाणची वैशिष्ट्ये पण लोकांसमोर यावीत, असाही यामागील उद्देश आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांना देशाच्या दुर्गम भागातील शौर्यगाथा थेट अनुभवता येणार आहेत. भारत रणभूमी दर्शनचे ॲपही जानेवारी २०२५ मध्ये सुरू करण्यात आले आहे. या ॲपमध्ये माहिती, नकाशे आणि ऐतिहासिक कथा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
युद्धभूमीशी संबंधित ठिकाणे कोणती?
लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारक, राजस्थान येथील लोंगेवाला युद्ध स्मारक, नागालँडमधील कोहिमा युद्ध स्मशानभूमी (शहीद सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक ), हिमालयीन युद्धक्षेत्रे, सिक्कीममधील डोकलाम, लडाखमधील गलवान खोरे, सियाचीन हिमनदी अशा काही ठिकाणांवर युद्धभूमीशी संबंधित स्मृती आहेत. दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान १९४४ मध्ये कोहिमा येथे ब्रिटीश आणि जपानी सैन्यामध्ये मोठी लढाई झाली होती, ज्याला ‘पूर्वेकडील स्टालिनग्राद’ म्हटले जाते. शिवाय हे ठिकाण निसर्गरम्यही आहे. हिरवेगार डोंगर, दऱ्यांनी नटलेल्या कोहिमात हवामान वर्षभर सुखद असते.
