इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटपाठोपाठ आता इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेतूनही पाकिस्तानी खेळाडू हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘द हंड्रेड’मधील आठपैकी चार फ्रँचायझींची मालकी भारतीयांनी मिळवली असून त्यांनी आपल्या संघात पाकिस्तानी खेळाडूंना न घेण्याचा ‘अ-लिखित’ नियम बनवला आहे.

मात्र, यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळ (ईसीबी) कोंडीत सापडले आहे. ‘इंग्लंडमधील सर्वसमावेशक खेळात असा प्रकार घडता कामा नये,’ असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत.

‘द हंड्रेड’ स्पर्धा नक्की काय आहे?

भारतातील ‘आयपीएल’, ऑस्ट्रेलियातील ‘बिग बॅश लीग’ यांच्या धर्तीवर इंग्लंडनेही स्वत:ची वेगळी लीग तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०२१ मध्ये ‘द हंड्रेड’ स्पर्धा सुरू केली. याचे वेगळेपण म्हणजे यात १००-१०० चेंडूंचे सामने होतात. नेहमीच्या सहा चेंडूच्या षटकाऐवजी पाच चेंडूंचे षटक टाकले जाते. हा प्रयोग यशस्वी ठरला असून इंग्लंडमध्ये ही स्पर्धा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. अन्य देशांतील लीगप्रमाणेच ‘द हंड्रेड’मध्येही परदेशी खेळाडूंचा सहभाग असतो.

भारतीय फ्रँचायझींकडे कोणते संघ?

इंग्लंडमधील कौंटी संघ आपल्या परंपरेला धरूनच चालण्यासाठी ओळखले जातात. खासगीकरण नकोच, अशी त्यांची पूर्वी भूमिका असायची. मात्र, त्यांनाही ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या आर्थिक ताकदीपुढे नमते घ्यावे लागले. ‘आयपीएल’ फ्रँचायझींनी विविध काैंटी संघांसह करार करताना ‘द हंड्रेड’मधील संघांचीही मालकी मिळवली आहे.

सनरायजर्स हैदराबादच्या (सन टीव्ही नेटवर्क लिमिटेड) मालकांनी ‘सनरायजर्स लीड्स’, दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी (जीएमआर समूह) ‘सदर्न ब्रेव्ह’, मुंबई इंडियन्स समूहाने ‘एमआय लंडन’ आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या मालकांनी (आरपीएसजी समूह) ‘मँचेस्टर सुपर जायंट्स’ या संघांतील हिस्सा विकत घेतला आहे.

पाकिस्तानी खेळाडूंना विरोधच?

‘आयपीएल’मध्ये २००९ सालापासून पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आली आहे. आता ‘द हंड्रेड’मध्येही पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागावर टांगती तलवार आहे. ‘द हंड्रेड’मधील भारतीय संघ-मालक पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करणार नसल्याची माहिती इंग्लंडमधील ‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्राने दिली आहे.

‘द हंड्रेड’मध्ये पाकिस्तानी खेळाडूंनी यापूर्वी सहभाग नोंदवला आहे. आगामी हंगामाच्या लिलावासाठी एकूण १८ देशांतील ९५० हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यापैकी ५० हून अधिक खेळाडू पाकिस्तानचे आहेत. यात पाकिस्तानच्या ट्वेन्टी-२० संघाचा विद्यमान कर्णधार सलमान अली आघा, शाहीन आफ्रिदी, सैम अयुब, उस्मान तारिक, शादाब खान, हारिस रौफ, नसीम शाह, अबरार अहमद आणि इमाद वसीम यांचाही समावेश आहे.

भारतीय संघ-मालकांना भीती?

गेल्या वर्षीचा पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ यामुळे भारत आणि पाकिस्तान संबंध आणखीच चिघळले आहेत. खेळाच्या, विशेषत: क्रिकेटच्या मैदानावरही ते दिसून आले आहे. आशिया चषक, तसेच सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणे टाळले. या सर्व पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध केल्यास भारतात त्याचे पडसाद उमटू शकतील अशी ‘द हंड्रेड’मधील भारतीय संघ-मालकांना भीती असल्याचे समजते.

अन्य लीगमधील चित्र कसे?

‘आयपीएल’मधील फ्रँचायझींकडे विविध लीगमधील संघांची मालकी आहे. त्या स्पर्धांतही पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करणे या फ्रँचायझी बहुतेक वेळा टाळतात. दक्षिण आफ्रिकेतील ‘एसए२०’ लीगमधील सर्व सहा संघ ‘आयपीएल’ फ्रँचायझींच्या मालकीचेच आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या चार हंगामांत एकाही पाकिस्तानी खेळाडूला सहभाग नोंदवता आलेला नाही.

तसेच अमिराती येथील ‘आयएलटी२०’ आणि अमेरिकेतील ‘मेजर लीग क्रिकेट’मध्येही ज्या संघांची मालकी ‘आयपीएल’ फ्रँचायझींकडे आहे, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, याला काही अपवादही आहेत. यापूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमधील (सीपीएल) बार्बाडोस रॉयल्स संघाकडून आझम खान खेळला आहे. या संघाची मालकी ‘आयपीएल’मधील राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीकडे आहे. तसेच यासिर शाह, शादाब खान आणि मोहम्मद हसनैन या पाकिस्तानी खेळाडूंनी ट्रिन्बागो नाइट रायडर्सकडून ‘सीपीएल’मध्ये सहभाग नोंदवला आहे. या संघाची मालकी ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्सकडे आहे.

‘ईसीबी’ची भूमिका काय?

‘द हंड्रेड’ स्पर्धेतून पाकिस्तानी खेळाडूंना डावलण्याबाबत ‘ईसीबी’ने ठाम भूमिका घेतली. अशा प्रकारे वेचक निवड प्रक्रिया खपवून घेतली जाणार नाही, असे ईसीबीचे म्हणणे आहे. पण फ्रँचायझींनी तरीही पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध केले नाही, तरी ईसीबी नेमके काय करणार हे स्पष्ट नाही. ही केवळ चर्चा असून अधिकृतरीत्या काहीही समोर आले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

असे असले तरी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने ‘ईसीबी’ला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. ‘‘ईसीबीने लवकरच काहीतरी केले पाहिजे. ही त्यांची स्पर्धा आहे आणि त्यात असा प्रकार घडता कामा नये,’’ असे वॉनने ‘एक्स’वर म्हटले आहे. ‘द हंड्रेड’मधील अन्य चार संघ मात्र पाकिस्तानी खेळाडूंना कारारबद्ध करण्याबाबत सकारात्मक असल्याचे समजते.