अमेरिकेतील आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान (हेल्थकेअर अँड लाइफसायन्सेस) क्षेत्र भारतातील आयटी कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. दरम्यान, अमेरिकेतील या क्षेत्रावर सध्या आर्थिक ताण आला आहे. तसेच या क्षेत्राने आता कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (एआय) खर्च वाढवण्यावर भर दिला आहे. त्याचा फटका भारतातील आयटी कंपन्यांना बसत आहे. भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांच्या उत्पन्नात मागील वर्षी या क्षेत्रातील बदलामुळे घट झाल्याचे दिसून आले. जागतिक पातळीवरील अस्थिरता, अमेरिकेतील ग्राहक कंपन्यांकडून बजेटमध्ये केली जाणारी कपात तसेच एआयवरील वाढता खर्च यांमुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले. आयटी कंपन्यासमोर भविष्यात काही आव्हाने निर्माण झाली आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात.

प्रत्येक मोठ्या आयटी कंपनीचे विविध क्षेत्रांमध्ये स्वत:चे ग्राहक असतात. परंतु, अमेरिकेतील ‘हेल्थकेअर आणि लाइफसायन्सेस’ हे क्षेत्र व भारतातील आयटी कंपन्या एकमेकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. अमेरिकेतील या क्षेत्रात सध्या मंदीसदृश वातावरण आहे. उदाहरणार्थ, विप्रो कंपनीचे ‘हेल्थ’ क्षेत्रातील उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या १४ टक्के आहे. पहिल्या तिमाहीत त्यात २.६ टक्क्यांनी घट झाली आहे. विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्रीनी पल्लिया म्हणाले, अमेरिकेतील आरोग्य सेवा क्षेत्रावर दबाव आला आहे. तेथील ‘हेल्थकेअर’ची सुविधा देणाऱ्या कंपन्या व विमा कंपन्यांचे बजेट स्थिर राहिले आहे. तसेच या कंपन्या आता एआयवरील खर्च वाढवण्याच्या तयारीत आहेत.

पल्लिया म्हणाले, “आमच्यासाठी त्यांचे बजेट स्थिर राहिले. काही ठिकाणी आम्हाला नकारात्मक वाढ पाहायला मिळाली. सध्या बहुतांश बजेट हे स्वेच्छानिर्णयानुसार केल्या जाणाऱ्या खर्चाकडे वळवले जात आहेत. परंतु, ते प्रामुख्याने एआयवरील खर्च वाढवणार असल्याचे दिसते.” भारतातील इतर प्रमुख आयटी कंपन्यांच्याही या क्षेत्रातील उत्पन्नात पहिल्या तिमाहीत घसरण दिसून आली. टीसीएसचे उत्पन्न १ टक्के, तर एचसीएल टेक्नॉलॉजीजचे उत्पन्न ०.५ टक्क्यांनी घटले आहे. यात टेक महिंद्रा ही एकमेव कंपनी अपवाद ठरली. या क्षेत्रात टेक महिंद्राच्या उत्पन्नात २.६ टक्क्यांची सकारात्मक वाढ नोंदवली गेली.

हेल्थकेअर क्षेत्राची कामगिरी का मंदावली?

भारतीय आयटी कंपन्यांसाठी अमेरिकेतील ‘हेल्थकेअर आणि लाइफसायन्सेस’ क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. अमेरिकेतील आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, विमा कंपन्या, लाइफसायन्सेस कंपन्या व वैद्यकीय उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्या भारतीय आयटी कंपन्यांच्या ग्राहक आहेत. २०१९ मधील करोना महामारीनंतर अमेरिकेतील आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना सामान्यांना परवडेल अशा सुविधा द्याव्या लागल्या. तसेच अमेरिकेतील सरकारने काही नियम व उपाययोजना लागू केल्याने आरोग्य सुविधांशी संबंधित कंपन्यांवर ताण आला आहे. या उपाययोजनांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या औषधांच्या किमतींवर मर्यादा घालणे आणि मेडिकेअरशी संबंधित खर्च कमी करणे यांचा समावेश आहे. हे पाऊल नागरिकांसाठी फायदेशीर असले, तरी यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्याला मोठा फटका बसला आहे.

“अमेरिकन सरकारच्या कडक कारवाईमुळे तेथील आरोग्य कंपन्या आणि विमा कंपन्यांची स्वेच्छानिर्णयानुसार खर्च करण्याची क्षमता कमी झाली आहे. भारतीय आयटी कंपन्यांसाठी परिस्थिती अधिक बिकट होण्याचे कारण म्हणजे या अमेरिकन ग्राहकांनी आता त्यांच्या मर्यादित खर्च क्षमतेचा ओघ एआय आणि ऑटोमेशनकडे वळवला आहे. जेणेकरून नफ्यावरील ताण कायम असताना या माध्यमातून खर्च कमी करता येईल”, असे एका देशांतर्गत ब्रोकरेजमधील आयटी क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विश्लेषकाने सांगितले. अमेरिकेतील आरोग्य सेवा कंपन्या सर्व्हर मेंटेनन्स, बॅक ऑफिस ऑपरेशन्स आणि कंप्लायन्स (नियम पालन) यांसारख्या कामांसाठी भारतीय आयटी कंपन्यांशी संपर्क साधत असतात. परंतु आता त्या एआयवर मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. त्यामुळे भारतातील आघाडीच्या कंपन्यांना जागतिक एआय कंपन्यांकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

“खर्च आता एआयकडे वळतोय”

‘एसबीआयकॅप्स सिक्युरिटीज’चे रिसर्च हेड सनी अग्रवाल म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत नेमकी समस्या काय आहे हे सांगणे कठीण आहे. ही एका विशिष्ट क्षेत्राची किंवा एखाद्या ग्राहकापुरती मर्यादीत समस्या असू शकते. परंतु, विवेकाधीन खर्च ज्यात नवीन नवीन गोष्टींवर प्रयोग केले जातात त्यात नक्कीच घट होत आहे. तो खर्च आता एआयकडे वळवला जात आहे.”

या सर्व कारणांमुळे मागील वर्षी भारतातील प्रमुख आयटी कंपन्यांच्या ‘हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस’ क्षेत्रातील उत्पन्नात घसरणीचा कौल दिसून आला आहे. उदाहरणार्थ, विप्रो कंपनीच्या या क्षेत्रातील उत्पन्नात गेल्या चार तिमाही पैकी तीन तिमाहींमध्ये सलग घट झाली आहे. तर एचसीएल टेकच्या या क्षेत्रातील उत्पन्नात आर्थिक वर्ष २०२६ मध्ये १.८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. दरम्यान, काही कंपन्यांना आगामी तिमाहींमध्ये या क्षेत्रातील कामगिरीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. टीसीएसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) के. कीर्तिवासन यांनी सांगितले की, दुसऱ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांमध्ये या क्षेत्रात तेजी येण्याची त्यांना अपेक्षा आहे. दुसरीकडे, विप्रोचे सीईओ पल्लिया म्हणाले की, अमेरिकन आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपन्या सध्या एआयवर लक्ष केंद्रित करत असल्या तरी एआयची अंमलबजावणी आणि अनुपालन यांसारख्या नवीन संधी देखील लवकरच निर्माण होतील अशी त्यांना अपेक्षा आहे.