AI impact on Indian IT sector अँथ्रोपिक ही सुप्रसिद्ध एआय कंपनी एका नवीन टूलमुळे चर्चेत आली आहे. या नव्या एआय टूलमुळे जगभरातील तंत्रज्ञान आणि शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही झाल्याचे पाहायला मिळत आहे. रातोरात सॉफ्टवेअर कंपन्यांच्या मूल्यांकनातून शेकडो अब्ज डॉलर्स नाहीसे झाले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे येणाऱ्या व्यत्ययामुळे आपल्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो, या भीतीने गुरुवारीही (१२ फेब्रुवारी) भारतातील आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहेत की, गेल्या दोन दशकांत भारताच्या आर्थिक विकासाचा मुख्य आधार राहिलेले आयटी सेवा क्षेत्राचे भवितव्य काय असेल? आणि हे क्षेत्र या संकटाचा सामना कसा करेल? नेमकी परिस्थिती काय आहे? त्याविषयी जाणून घेऊयात…

आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

गुरुवारी भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी आयटी इंडेक्स चार टक्के पेक्षा जास्त घसरला. त्यामध्ये टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये तीन ते पाच टक्के घसरण झाली. हा आता एक कल होत चालला आहे. गेल्या एका वर्षात, निफ्टी आयटी इंडेक्स १७ टक्के पेक्षा जास्त कोसळला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि विप्रो या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स सुमारे ३० टक्क्यांनी घसरले आहेत, तर इन्फोसिसमध्ये २५ टक्क्यांची घट झाली आहे. इतर सर्व प्रमुख आयटी सेवा कंपन्यांनाही सेल ऑफचा सामना करावा लागत आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकन एआय कंपनी ‘अँथ्रोपिक’च्या एंटरप्राइझ-ग्रेड टूल्समुळे जागतिक स्तरावरील आयटी क्षेत्रावर मोठा दबाव आला. एका सामान्य प्रोडक्ट अपडेट म्हणून सुरू झालेल्या या घडामोडीला ब्रोकरेज फर्म जेफरीजने ‘सासपोकॅलिप्स’ नाव दिले आहे. ‘सॉफ्टवेअर-अ‍ॅज-ए-सर्व्हिस’ कंपन्यांसाठी हा प्रलय ठरू शकतो, असा याचा अर्थ आहे.

भारतीय आयटी क्षेत्राचे भवितव्य

‘अँथ्रोपिक’ने गेल्या आठवड्यात, क्लॉड कोवर्क नावाचे एक नवीन एआय टूल आणि त्याबरोबरच ११ प्लगइन्स सादर केले आहेत. हे प्लगइन्स दैनंदिन व्यावसायिक कामे स्वयंचलित करण्यास मदत करतात. या घोषणेने जागतिक तंत्रज्ञान बाजारपेठेत खळबळ उडवून दिली आहे. एआय केवळ सॉफ्टवेअर कंपन्यांना मदतच करणार नाही, तर कदाचित त्यांची जागाही घेऊ शकेल, अशी गेल्या काही महिन्यांपासून असलेली भीती स्पष्ट झाली आहे. भारतातील आयटी कंपन्यांसाठी याचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. भारतातील कंपन्यांचे व्यावसायिक मॉडेल डेटा प्रोसेसिंग, कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅनालिसिस, कंप्लायन्स मॉनिटरिंग आणि कस्टमर सपोर्ट यांसारख्या सेवांवर अवलंबून आहे. ही कामे आता एआय टूल्सद्वारे स्वयंचलित होऊ शकतात.

अँथ्रोपिकच्या घोषणेमध्ये कायदेशीर कामांसाठी कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू, एनडीए अ‍ॅनालिसिस आणि फायनान्स, सेल्स व डेटा अ‍ॅनालिटिक्समधील अर्जांसाठी विशेष टूल्सचा समावेश आहे. CoRover.ai चे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी अंकुश सबरवाल यांनी सांगितले, “एंटरप्राइझ एआय भारतीय आयटी सेवा उद्योगाला एका रात्रीत नष्ट करणार नाही, पण ते व्हॅल्यू चेनमध्ये निश्चितपणे मोठे बदल घडवून आणेल. जसजसे उद्योग अशा एआय प्रणांलींचा वापर करतील, तसतसे मनुष्यबळाच्या मॉडेलची व्यवहार्यता कमी होत जाईल. स्वतंत्रपणे कोडिंग, टेस्टिंग, ग्राहक सेवा आणि माहितीवर आधारित कामांचा यात समावेश आहे.”

एआयमुळे आयटी क्षेत्राचा विस्तार होऊ शकतो, असेही सबरवाल म्हणाले. मात्र, त्यांनी इशारा दिला की, केवळ अशाच कंपन्यांना याचा फायदा होईल ज्या आपल्या क्षेत्रातील ज्ञान, स्वतःचा डेटा आणि स्केलेबल एआय प्लॅटफॉर्मचा वापर करतात. ते पुढे म्हणाले, “महसूल वाढ ही केवळ माणसे वाढवून होणार नाही, तर ती बौद्धिक संपदा, प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शन, मॅनेज्ड एआय सेवा आणि निकालावर आधारित करारांमधून येईल.” कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने म्हटले आहे की, जर ‘कोफोर्ज’, ‘हेक्सावेअर’, ‘पर्सीस्टंट सिस्टिम्स’ आणि ‘LTIMindtree’ सारख्या कंपन्यांनी प्रस्थापित दिग्गज कंपन्यांच्या बाजारपेठेतील मोठा वाटा मिळवण्यात यश मिळवले, तर त्यांना या एआय व्यत्ययाचा फायदा होऊ शकतो. त्यांनी असेही सुचवले की, कंपन्यांनी आपल्या ग्राहकांच्या क्लाउड, डेटा मॉडर्नायझेशन आणि लेगसी मॉडर्नायझेशन उपक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे.

भारतातील गुंतवणूकदार चिंतेत

शेअर्सची ही विक्री बाजारात मोठा बदल दर्शवते. गेल्या दोन वर्षांपासून एआय बद्दल अशी चर्चा होती की, ते उत्पादकता वाढवेल आणि तंत्रज्ञान कंपन्यांसाठी व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करेल. गुंतवणूकदारांनी एआयशी संबंधित प्रत्येक गोष्टीत पैसे गुंतवले. त्यामुळे व्हॅल्युएशन ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. मात्र, आता एक वेगळेच चित्र समोर आले आहे. भारतातील गुंतवणूकदारांसमोर आता हा प्रश्न आहे की, ही घसरण म्हणजे तात्पुरती भीती आहे की हे आयटी क्षेत्राच्या भवितव्याविषयी धोक्याचे संकेत आहेत? या विक्रीमुळे बाजारमूल्यातील अब्जावधी रुपये बुडाले आहेत.

मुख्य म्हणजे ज्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी या कंपन्या धडपडत होत्या, त्याच तंत्रज्ञानाकडे आता त्यांच्या बिझनेस मॉडेलसाठी संभाव्य धोका म्हणून पाहिले जात आहे. भारतातील आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एआय प्रशिक्षण देण्यासाठी आणि क्लायंटसाठी एआयवर आधारित सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी मोठा खर्च केला आहे. पण एआय टूल्सने पूर्णपणे पारंपारिक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मची जागा घेतल्यास, त्या गुंतवणुकीवर आणि कंपन्यांच्या मुल्यांवर होईल. ही घसरणीची सुरुवात आहे की केवळ बाजारातील तात्पुरती चिंता आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.