Indian Monsoon Climate Change study reveals the critical rain irregularity reasons impacting Indian agriculture: भारतीय उपखंडाची जीवनवाहिनी असलेला मान्सून सध्या मोठ्या संक्रमणातून जात आहे. देशातील निम्मी शेती अद्याप पावसाच्या पाण्यावर अवलंबून असताना, गेल्या काही दशकांत पावसाच्या वितरणात कमालीचा असमतोल निर्माण झाला आहे. ‘कमी दिवस, पण तीव्र पाऊस’ या नव्या पॅटर्नमुळे एकाच वेळी पूर आणि दुष्काळाचे दुहेरी संकट देशावर घोंगावत आहे.

पावसाचा कालावधी, तीव्रता आणि वितरण

भारतीय उपखंडातील मान्सून हा केवळ हवामानाचा भाग नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा, अन्नसुरक्षेचा, जलव्यवस्थापनाचा आणि सामाजिक स्थैर्याचाही आधारस्तंभ आहे. भारतातील निम्मी शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे मान्सून चांगला झाला तर अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि पाऊस कमी झाला तर त्याचे परिणाम शेतीपासून उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रांवर दिसून येतात. मात्र गेल्या काही दशकांमध्ये भारतीय मान्सूनचे स्वरूप बदलत असल्याचे शास्त्रज्ञ सातत्याने सांगत आहेत. एकूण पावसाचे प्रमाण फारसे बदलले नसले तरी त्याचा कालावधी, तीव्रता आणि वितरण यामध्ये मात्र असमतोल दिसतो आहे.

कधी काही तासांत महिन्याभराचा पाऊस पडतो, तर काही भागांमध्ये आठवडे- आठवडे पाऊसच पडत नाही. त्यामुळेच एक प्रश्न ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे भारतीय मान्सूनची अनियमितता वाढते आहे का?

मान्सूनची प्रक्रिया

भारतीय मान्सून हा जमीन आणि समुद्र यांच्यातील तापमानातील फरकामुळे निर्माण होतो. उन्हाळ्यात भारतीय भूभाग प्रचंड तापतो. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्याच वेळी हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातील तुलनेने थंड व दमट हवा भारतीय उपखंडाकडे खेचली जाते. ही आर्द्र हवा पर्वतरांगांना धडकून पाऊस निर्माण करते. मात्र ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आहे. तिच्यावर हिंदी महासागराचे तापमान, एल निनो-ला नीना, हिमालयातील बर्फाचे आवरण, जेट स्ट्रीम, वातावरणातील आर्द्रता आणि जागतिक तापमानवाढ अशा अनेक घटकांचा प्रभाव असतो.

Jalgaon rain update today | Dhule weather forecast yellow alert | Maharashtra monsoon current status | IMD lightning warning North Maharashtra
हवामानबदल आणि पाऊस

हवामानबदल आणि मान्सून

मान्सूनच्या बदलत्या स्वरूपामागे सर्वाधिक चर्चेत असलेला घटक म्हणजे हवामानबदल (Climate Change). औद्योगिक क्रांतीनंतर वातावरणातील कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि इतर हरितगृह वायू यांच्या प्रमाणात खूप मोठी वाढ झाली आहे. परिणामी पृथ्वीचे सरासरी तापमान सुमारे १.२ अंश सेल्सियसने वाढले आहे. तापमानातील ही वाढ केवळ उष्णता वाढवत नाही, तर पृथ्वीच्या जलचक्रामध्येही महत्त्वाचा बदल घडवून आणते.

अधिक पावसाची शक्यता

वैज्ञानिकांच्या मते तापमानात १ अंश सेल्सियसने वाढ झाल्यास वातावरणाची आर्द्रता पकडून ठेवण्याची क्षमता ७ टक्क्यांनी वाढते. त्यामुळे पूर्वीपेक्षाही अधिक पाऊस पडण्याची शक्यता वाढते. याच कारणामुळे भारतात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अनेक अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. विशेषतः मध्य भारतात गेल्या काही दशकांमध्ये मुसळधार पावसाच्या घटनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे.

अतिपाऊस आणि दुष्काळ एकाच वेळी कसे?

हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या सर्वात मोठ्या विरोधाभासांपैकी एक म्हणजे अतिपाऊस आणि दुष्काळ एकाच वेळी कसे? पूर्वी मान्सूनमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक दिवस पडत असे. आता मात्र पावसाचे स्वरूप ‘कमी दिवस, पण जास्त तीव्रता’ असे होत आहे. परिणामी काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि नंतर दीर्घकाळ कोरडे वातावरण राहते.
यामुळे दोन समस्या निर्माण होतात.

  • पहिली समस्या म्हणजे पूर. कमी कालावधीत पडणारा मुसळधार पाऊस जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जातो. नद्या तुडुंब भरतात आणि शहरे तसेच ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण होते.
  • दुसरी समस्या म्हणजे दुष्काळ. पाऊस भरपूर पडला तरी तो योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पडत नसल्यामुळे पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळत नाही. परिणामी पावसाचे वार्षिक प्रमाण सामान्य राहिले तरी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.

हिंदी महासागरातील तापमानवाढ

भारतीय मान्सूनवर हिंदी महासागराचा मोठा प्रभाव आहे. गेल्या काही दशकांमध्ये इतर महासागरांच्या तुलनेत हिंदी महासागराच्या पाण्याच्या तापमानात अधिक वेगाने वाढ होत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे. या प्रक्रियेला ‘इंडियन ओशन वॉर्मिंग’ असे म्हटले जाते. समुद्राच्या तापमानातील वाढीमुळे वातावरणातील दाब वाढतो आणि मान्सूनच्या वाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. हिंदी महासागरातील तापमानवाढीमुळे मध्य भारतात अतिवृष्टी वाढल्याचे काही अभ्यासांमध्ये लक्षात आले आहे. आणि याच कारणामुळे दुसरीकडे काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याचेही संशोधकांना आढळले आहे.

एल निनो आणि ला नीना यांची भूमिका

प्रशांत महासागरातील तापमानातील बदलांचा भारतीय मान्सूनवर दूरगामी परिणाम होतो. एल निनोच्या काळात प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील पाणी अधिक उष्ण होते. यामुळे जागतिक वातावरणीय अभिसरणात बदल होतात आणि भारतातील मान्सून कमकुवत होण्याची शक्यता वाढते. त्याउलट ला नीना परिस्थितीत भारतीय मान्सून तुलनेने चांगला राहतो. मात्र हवामान बदलामुळे या नैसर्गिक घटनांचे स्वरूपही बदलत असल्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे मान्सूनचा अंदाज अधिक गुंतागुंतीचा ठरतो आहे.

शेतीवर होणारे परिणाम

  • भारतीय शेती ही मान्सूनवर आधारित अर्थव्यवस्थेचे सर्वात संवेदनशील उदाहरण आहे.
  • धान्य, कापूस, सोयाबीन, ऊस, डाळी आणि तेलबिया यांसारख्या पिकांच्या उत्पादनावर पावसाचा थेट परिणाम होतो.
  • अनियमित पावसामुळे पेरणी उशिरा होते. कधी अंकुरल्यानंतर दीर्घ खंड पडल्याने पिके सुकतात. तर कधी काढणीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होते.

उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते की, सुरुवातीला पाऊस कमी पडतो आणि नंतर अचानक अतिवृष्टी होते. परिणामी शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसतो.

हवामानातील ही अनिश्चितता कृषी विमा, पीक नियोजन आणि जलव्यवस्थापनासाठीही मोठे आव्हान ठरते.

अर्थव्यवस्थेवरील परिणाम

  • भारतीय सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) शेतीचा वाटा पूर्वीपेक्षा कमी झालेला असला तरी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अजूनही मोठे आहे.
  • मान्सून कमकुवत राहिला तर कृषी उत्पादन घटते. अन्नधान्याच्या किमती वाढतात. महागाई वाढते. ग्रामीण भागातील उत्पन्न कमी होते आणि त्याचा परिणाम ग्राहकांकडून केल्या जाणाऱ्या खर्चावर होतो.
  • अतिवृष्टीमुळे पायाभूत सुविधांचे नुकसान होते. रस्ते, पूल, रेल्वे मार्ग आणि शहरी व्यवस्थांवर मोठा ताण येतो. पूर आणि दुष्काळ व्यवस्थापनासाठी सरकारला अतिरिक्त खर्च करावा लागतो.
  • जागतिक बँक आणि विविध संशोधन संस्थांच्या अंदाजानुसार हवामान बदलामुळे भारताच्या आर्थिक वाढीवर आगामी दशकांमध्ये लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

शहरांसाठी नवे संकट

  • मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये अतिवृष्टीचे प्रमाण वाढताना दिसते आहे.
  • यामागे केवळ हवामान बदलच नाही, तर अनियंत्रित शहरीकरण, नैसर्गिक नाले आणि जलमार्गांचे अतिक्रमण, काँक्रीटीकरण आणि हरित क्षेत्रातील घट हे घटकही जबाबदार आहेत.
  • पावसाची तीव्रता वाढत असताना शहरांची जलनिस्सारण व्यवस्था मात्र त्यानुसार विकसित झालेली नाही. परिणामी काही तासांच्या पावसानेही मोठ्या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होते.

पुढे काय?

  • हवामानबदलाचा परिणाम पूर्णपणे टाळणे शक्य नाही, असे बहुतेक शास्त्रज्ञ मानतात. मात्र त्याचे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात.
  • त्यासाठी हवामानबदलाला अनुकूल शेती, पाण्याचे व्यवस्थापन, जलसंधारण, अधिक अचूक हवामान अंदाज, पूरपूर्व सूचना प्रणाली आणि हवामान-प्रतिरोधक पायाभूत सुविधा यांची आवश्यकता आहे.
  • तसेच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे, अक्षय्य ऊर्जेचा वापर वाढवणे आणि पर्यावरणीय संवर्धन यांनाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे.

दुहेरी लढा

भारतीय मान्सून सध्या संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. तो पूर्णपणे कमकुवत झालेला नाही, पण त्याचे स्वरूप अनिश्चित आणि टोकाचे होत चालले आहे. हवामानबदल, महासागरांचे वाढते तापमान यामुळे पाऊस आता पूर्वीसारखा नियमित राहिलेला नाही. याचे परिणाम केवळ शेतीपुरते मर्यादित नसून अर्थव्यवस्था, अन्नसुरक्षा, जलसुरक्षा आणि शहरी व्यवस्थांपर्यंतही झाले आहेत. मान्सून हा भारतासाठी जीवनवाहिनीच आहे. मात्र आता वातावरणबदलामुळे पावसाच्या पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे. म्हणजेच पाऊस खूप कोसळला तर पूर येणार नाही म्हणून नियोजन आणि कमी पडला तर त्या कमी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचे नियोजन, असा हा दुहेरी लढा असणार आहे.

  • संदर्भसूची
  • Intergovernmental Panel on Climate Change, AR6 Synthesis Report, 2023.
  • India Meteorological Department, Monsoon Reports and Climate Assessments, Periodical repots
  • Ministry of Earth Sciences, Assessment of Climate Change over the Indian Region, 2020.
  • Indian Institute of Tropical Meteorology, Indian Monsoon Variability Studies.
  • World Meteorological Organization, State of the Global Climate Reports.
  • Roxy Mathew Koll et al., “Indian Ocean Warming and Its Impact on the Indian Monsoon”, विविध शोधनिबंध.
  • Nature Climate Change, Increasing Extreme Rainfall Events in Central India, 2017.

i