Indian Navy Three Warships deployment strategic maritime impact report: भारतीय नौदलाने २१ जून रोजी एकाच वेळी तीन वेगवेगळ्या सामरिक भूमिका बजावणाऱ्या स्वदेशी युद्धनौका सेवेत दाखल करून आपल्या सागरी क्षमतेत मैलाचा दगड गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोलकाता येथे आयएनएस दुनागिरी (INS Dunagiri), आयएनएस संशोधक (INS Sanshodhak) आणि आयएनएस अग्रय (INS Agray) यांना समारंभपूर्वक नौदलात दाखल करून घेण्यात आले. या तिन्ही युद्धनौकांची बांधणी कोलकाताच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने (GRSE) केली असून त्या ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी बनावटीच्या आहेत.

सागरतळाचा बारकाईने अभ्यास

विशेष म्हणजे या तिन्ही युद्धनौका पूर्णपणे वेगळ्या भूमिका बजावणाऱ्या आहेत. यातील एक युद्धनौका खोल समुद्रात युद्ध करू शकते, दुसरी समुद्राचा बारकाईने अभ्यास करून समुद्रतळाचे नकाशे तयार करते, तर तिसरी किनारपट्टीलगतच्या पाण्यात लपलेल्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या तिन्ही युद्धनौका बांधणी प्रकल्पांमुळे २०० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाही (MSME) चालना मिळाली आहे.

आयएनएस दुनागिरी: सागरी युद्धासाठी सज्ज स्टेल्थ फ्रिगेट

या तिन्ही युद्धनौकांपैकी सर्वात मोठी आणि सर्वाधिक शस्त्रसंभार वाहणारी युद्धनौका म्हणजे आयएनएस दुनागिरी. ही एक आधुनिक स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेट आहे. फ्रिगेट म्हणजे विनाशिकेपेक्षा आकाराने थोडी लहान, पण महासागरात दूरवर स्वतंत्र मोहिमा पार पाडण्यासाठी अतिशय सक्षम युद्धनौका.

Indian Navy Three Warships INS Dunagiri Sanshodhak Agray commissioning ceremony | PM Modi at Indian Navy Three Warships event in Kolkata | भारतीय नौदलात ३ स्वदेशी युद्धनौका दाखल आयएनएस दुनागिरी | आयएनएस संशोधक आणि अग्रय युद्धनौका सामरिक महत्त्व
INS Dunagiri (Image- Indian Navy)

शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देण्याची क्षमता

दुनागिरी ही भारतीय नौदलाच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रोजेक्ट १७ए’ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या नव्या पिढीतील स्टेल्थ फ्रिगेट्सपैकी एक आहे. ‘स्टेल्थ’ म्हणजे शत्रूच्या रडार आणि सेन्सर यंत्रणांना सहज चकवा देण्याची क्षमता असलेली युद्धनौका. या युद्धनौकेवर भारताने रशियासोबत संयुक्तपणे विकसित केलेले ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली (MRSAM), अत्याधुनिक एमएफएसटीएआर (MFSTAR) रडार, सोनार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली आणि पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रेही या युद्धनौकेवर तैनात आहेत.

‘ब्लू वॉटर नेवी’साठी…

नौदल अधिकाऱ्यांच्या मते, अशा बहुउद्देशीय फ्रिगेट्स ‘ब्लू वॉटर नेव्ही’ संकल्पनेचा कणा असतात. ब्लू वॉटर म्हणजे किनाऱ्यांपासून हजारो किलोमीटर दूर असलेले महासागरी क्षेत्र. अशा ठिकाणी पारंपरिक युद्ध, दहशतवादविरोधी कारवाया, सागरी चाचेगिरीविरोधी मोहिमांसाठी तयार राहावे लागते आणि सामरिक अस्तित्त्व दाखविण्याची क्षमता तुमच्याकडे असावी लागते. या स्टेल्थ फ्रिगेटमध्ये या सर्व क्षमता पुरेपूर आहेत.

आयएनएस संशोधक : ‘वैज्ञानिक’ युद्धनौका

पहिल्याच दृष्टीक्षेपात ही संशोधननौका इतर युद्धनौकेएवढी आकर्षक दिसत नसली तरी आयएनएस संशोधक ही भारतीय नौदलासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही ‘सर्व्हे व्हेसल-लार्ज’ (SVL) प्रकारातील युद्धनौका असून तिचे मुख्य काम समुद्राचे खरेतर सागरतळाचे मोजमाप करणे आणि त्याचा सखोल अभ्यास करणे हे आहे. समुद्राची खोली किती आहे, समुद्रतळाची रचना कशी आहे, बंदरांकडे जाणारे मार्ग कोणते आहेत, जहाजांसाठी सुरक्षित मार्ग कोणते आहेत, सागरी प्रवाह कसे वाहतात यासारखी माहिती गोळा करण्याचे काम ही युद्धनौका करते.

सागराची अचूक शास्त्रीय नोंद युद्धनौका/ पाणबुड्यांसाठी महत्त्वाची

पाण्याखालील वापरता येण्याजोगी वाहने (AUV), रिमोटली ऑपरेटेड व्हेइकल्स (ROV), मल्टी-बीम इको साउंडर्स यांसारखी अत्याधुनिक उपकरणे आयएनएस संशोधकवर बसविण्यात आली आहेत. ही उपकरणे समुद्राच्या पृष्ठभागाखालील माहिती अत्यंत अचूकपणे नोंदवू शकतात. नौदलातील तज्ज्ञांच्या मते, समुद्राची खोली, सागरतळातील डोंगर-दऱ्या, प्रवाह, प्रवाळभित्ती, बंदरांचे मार्ग आणि किनारपट्टीजवळील अडथळे यांचा अभ्यास करत युद्धनौका किंवा पाणबुड्यांना त्यांचा मार्ग आखावा लागतो. त्यामुळेच समुद्राचे अचूक ज्ञान हे युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचे शस्त्र मानले जाते. ही माहिती केवळ लष्करी उद्देशांसाठीच नव्हे तर व्यापारी जहाजवाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, सागरी संशोधन, किनारी विकास आणि पर्यावरणीय अभ्यासासाठीही उपयुक्त ठरते. आयएनएस संशोधक ही संधायक वर्गातील चौथी आणि अखेरची नौका आहे. याआधी आयएनएस संधायक, निर्देशक आणि इक्षाक या नौका सेवेत दाखल झाल्या आहेत.

आयएनएस अग्रय : किनारपट्टीचे रक्षण करणारी पाणबुडीविरोधी युद्धनौका

आयएनएस अग्रय ही आकाराने लहान असली, तरी तिची भूमिका अत्यंत विशेष आणि महत्त्वाची आहे. ही युद्धनौका विशेषतः किनारपट्टीलगतच्या उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठीच खास तयार करण्यात आली आहे. अग्रय ही ‘अर्नाळा’ (Arnala Class) वर्गातील पाणबुडीविरोधी युद्धनौकांपैकी एक आहे. तिच्यावर हलक्या वजनाचे पाणतीर, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट प्रणाली आणि आधुनिक सोनार बसविण्यात आले आहेत.

पाणबुड्यांचा शोध घेणे कठीण

नौदलात किनाऱ्यालगतच्या समुद्री क्षेत्राला ‘लिटोरल वॉटर्स’ असे संबोधले जाते. या भागात पाणबुड्यांचा शोध घेणे अत्यंत अवघड असते. मासेमारी नौका, व्यापारी जहाजे, समुद्रतळातील विविध रचना आणि किनारी हालचालींमुळे निर्माण होणारा आवाज यामुळे सोनार यंत्रणांची कार्यक्षमता कमी असते. यामुळेच अग्रयसारख्या विशेष युद्धनौकांची आवश्यकता भासते. कारण आधुनिक पाणबुड्या या शोध घेण्यासाठी जगातील सर्वात अवघड लष्करी साधनांपैकी एक मानल्या जातात.

तिन्ही युद्धनौकांचे एकत्र कमिशनिंग का महत्त्वाचे?

भारतीय नौदलाच्या दृष्टीने या समारंभाचे महत्त्व केवळ तीन युद्धनौका एकाच वेळेस सेवेत दाखल होण्यापुरते मर्यादित नव्हते. तर त्यातून नौदलाची बहुआयामी क्षमता एकाच वेळी वाढल्याचा संदेश जगाला देणे हे अधिक महत्त्वाचे होते. आयएनएस दुनागिरी भारताला महासागराच्या दूरवरच्या भागात सामरिक ताकद देते. आयएनएस संशोधक समुद्राचे ज्ञान आणि ‘मॅरिटाईम डोमेन अवेअरनेस’ वाढवते. तर आयएनएस अग्रय किनारपट्टी आणि नौदल तळांचे संरक्षण अधिक मजबूत करते.

चीन व पाकिस्तानी भारतीय सागरी हद्दीत वाढते अस्तित्व

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या क्षेत्रात त्यांच्या नौदलाचे अस्तित्व वाढवले आहे. परिणामी, भारताच्या सागरी जबाबदाऱ्या अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान-निकोबार बेटे आणि विस्तीर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रापर्यंत विस्तारल्या आहेत. अशा परिस्थितीत या तिन्ही युद्धनौका भारतीय नौदलाची क्षमता विविध स्तरांवर बळकट करतात. यातून भारतीय नौदलाची स्पष्ट रणनीतिही दिसून येते. दूरवरच्या महासागरी मोहिमांसाठी मोठ्या युद्धनौका, समुद्र समजून घेण्यासाठी सर्व्हेनौका आणि किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी पाणबुडीविरोधी नौका.

स्वदेशी जहाजबांधणी उद्योगासाठीही मोठा संदेश

या ‘ट्राय-कमिशनिंग’चा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भारताच्या जहाजबांधणी उद्योगाची वाढती परिपक्वता. वेगवेगळ्या तंत्रज्ञानांवर आधारित, वेगवेगळ्या भूमिका पार पाडणाऱ्या तीन स्वतंत्र प्रकारच्या युद्धनौका एकाच वेळी देशात विकसित होणे आणि सेवेत दाखल होणे हे मोठे यश मानले जात आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला चालना देत भारत आता केवळ युद्धनौका खरेदी करणारा देश राहिलेला नाही; तर अत्याधुनिक सागरी युद्धसामग्रीची रचना, निर्मिती करतो आहे. ही क्षमता जगभरात मोजक्याच राष्ट्रांकडे आहे, त्यात भारताचा समावेश आहे, हे महत्त्वाचे. आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय या तिन्ही एकाच वेळेस नौदलात समाविष्ट होणे हे भारतीय नौदलाच्या वाढत्या क्षमतांचा आणि महासागरी महत्त्वाकांक्षांचा स्पष्ट संदेश जगाला देणारी कृती ठरते.