Indian Navy Helicopters: गोव्यातील आयएनएस हंसा या हवाई तळावर बुधवारी एमएच-६०आर हेलिकॉप्टरच्या INAS 335 (ऑस्प्रेज) या दुसरी स्क्वॉड्रनचा ताफा भारतीय नौदलात दाखल झाला. पाण्यात सूर मारत माशाची शिकार करणाऱ्या पक्ष्याच्या नावावरून या स्क्वॉड्रनला ‘ऑस्प्रेज’ हे नाव देण्यात आले आहे. अमेरिकन बनावटीची ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स ही ब्लॅकहॉकची नौदलासाठी खास तयार केलेली आवृत्ती आहे.

पाण्याखाली दडलेल्या शत्रूचा वेध

पाण्याखाली दडलेल्या शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेण्यात माहीर असलेली यंत्रणा हा या हेलिकॉप्टर्सचा विशेष आहे. पाणबुडीचा शोध आणि वेध घेणाऱ्या या हेलिकॉप्टरची पहिली स्क्वॉड्रन INAS 334 गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये कोची येथील ‘आयएनएस गरुडा’ या हवाई तळावर समारंभपूर्वक नौदलात दाखल झाली होती. ही दोन्ही स्क्वाड्रन्स नौदलाच्या ताफ्यात सर्व प्रकारची ऑपरेशन्स करण्याची क्षमता राखतात. किनाऱ्यावरील तळांवरूनच नव्हे, तर विमानवाहू युद्धनौका किंवा हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या युद्धनौकांवरूनही झेपावत वेगवान कारवाईसाठी ही हेलिकॉप्टर्स आता सज्ज आहेत.

बहुआयामी भूमिका

एमएच-६०आर ही हेलिकॉप्टर्स पाणबुडीविरोधी युद्ध (ASW), भूपृष्ठावरील शत्रूविरोधी कारवाया (ASuW), शोध- बचाव (SAR), वैद्यकीय मदत (MEDEVAC) अशा विविध मोहिमांसाठी डिझाइन करण्यात आली आहेत. याशिवाय ‘व्हर्टिकल रिप्लेनिशमेंट’ (VERTREP) अर्थात समुद्रातील जहाजे तसेच युद्धनौकांदरम्यान किंवा किनाऱ्यावरून युद्धनौकांवर, त्याचप्रमाणे युद्धनौका एकमेकांच्या जवळ न आणताही केवळ हेलिकॉप्टरद्वारे विविध गोष्टींचा पुरवठा करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाऊ शकतो, म्हणूनच त्यांचा समावेश बहुआयामी (मल्टिरोल) हेलिकॉप्टर्समध्ये केला जातो.

Seahawk-Helicopter
सीहॉक- हेलिकॉप्टर्स भारतीय नौदलात (Photo: Ministry of Defence)

भारतीय वातावरणात चाचण्या

इंडियन रेफरन्स अॅटमॉस्फिअर (IRA) अर्थात भारतीय परिक्षेत्रातील वातावरणामध्ये काम करण्यास ही हेलिकॉप्टर्स सक्षम आहेत का, याच्या तपासणीसाठी त्यांच्या कठोर चाचण्या घेण्यात आल्या. त्यात आलेल्या सकारात्मक निकालानंतरच भारताने अमेरिकेकडून सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या करारांतर्गत अशा २४ पाणबुडीविरोधी हेलिकॉप्टर्सची खरेदी केली. दीर्घकाळ सेवेत असलेल्या ब्रिटिश बनावटीच्या ‘सी किंग’ हेलिकॉप्टर्सच्या जागी आता ही नवीन हेलिकॉप्टर्स दाखल होतील.

विशेष म्हणजे, २०२५ हे वर्ष नौदलातील हवाई ताफ्याच्या स्थापनेचे अमृत महोत्सवी म्हणजेच ७५ वे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाच्या क्षमतेतील ही भर महत्त्वाची ठरावी.

एमएच-६०आरची वैशिष्ट्ये

सिकॉर्स्की (लॉकहीड मार्टिन कंपनी) यांनी अमेरिकन नौदलाच्या निकषांनुसार एमएच-६०आर विकसित केली आहेत. २०११ साली कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारण्यात आलेल्या ‘ऑपरेशन नेपच्यून स्पीअर’मध्ये याच ब्लॅक हॉकचीच विशेष आवृत्ती असलेले हेलिकॉप्टर वापरण्यात आले होते. आणि त्याचीच अत्याधुनिक आवृत्ती भारतीय नौदलात दाखल होत आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक डिजिटल सेन्सर पॅकेज आहे. त्यात मल्टी-मोड रडार, इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर्स, इन्फ्रारेड कॅमेरे, डेटा-लिंक्स, हेलिकॉप्टर संरक्षण प्रणाली आणि ‘डिपिंग सोनार’ यांचा समावेश आहे. ऑन-बोर्ड मिशन सिस्टीम विविध सेन्सर्सकडून मिळालेला डेटा प्रक्रिया करून समुद्राच्या पृष्ठभागावरील आणि पाण्याखालच्या परिस्थितीचे समग्र चित्र उभे करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. त्यामुळे शत्रूच्या युद्धनौका वा पाणबुड्यांचा शोध घेणे, त्यांचा माग काढणे आणि लक्ष्यभेद करणे सुलभ होते. पाणतीर, हवेतून जमिनीवर डागली जाणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट्स आणि तोफा अशा शस्त्रांनी ही हेलिकॉप्टर्स सुसज्ज आहेत.

पारंपरिक आणि छुप्या हल्ल्यांना प्रत्युत्तर

एमएच-६०आर हे अत्यंत वेगवान आणि बहुपयोगी हेलिकॉप्टर असून पारंपरिक तसेच छुपे असे दोन्ही हल्ले सक्षम पद्धतीने परतावून लावण्याची क्षमता त्यात आहे. पारंपरिक धोक्यांमध्ये शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध व लक्ष्यभेद हे त्यांचे मुख्य कार्य आहे. ‘डिपिंग सोनार’, ‘सोनोबॉय’ यांच्या साहाय्याने पाणबुड्या शोधणे, त्यांचा माग काढणे आणि प्रसंगी पाणतीरांच्या मदतीने लक्ष्यभेद करणे, तसेच युद्धनौकांचाही लक्ष्यभेद, सागरी टेहळणी आणि खोल समुद्रातील मोहिमा यांचा यात समावेश होतो. परिणामी, या हेलिकॉप्टर्समुळे युद्धनौकांच्या हल्ल्याची व्याप्ती अनेक पटींनी वाढणार असून ब्ल्यू-वॉटर ऑपरेशन्स अधिक प्रभावी करणे, नौदलाला शक्य होणार आहे.

दहशतवाद आणि सागरी चाचेगिरीविरोधातही केला जाणार वापर

छुप्या धोक्यांमध्ये सागरी दहशतवाद, चाचेगिरी, तस्करी, समुद्रमार्गे होणारी घुसखोरी, नागरी किंवा मच्छीमारी नौकांचा आडोसा घेत केले जाणारे हल्ले किंवा विध्वंसक कार्ये रोखण्यासाठी तसेच ड्रोन्ससारखे मानवरहित धोके टाळण्यासाठीही त्यांचा वापर करता येईल, असा नौदलाला विश्वास आहे. छुप्या आव्हानांना तोंड देण्यात या हेलिकॉप्टर्सची मोठीच मदत होईल, असे अधिकाऱ्यांना वाटते आहे.

देखभाल- दुरुस्तीचा करार

गेल्या महिन्यात संरक्षण मंत्रालयाने एमएच-६०आरच्या पाच वर्षांच्या ‘सस्टेन्मेंट सपोर्ट’साठी अमेरिकेशी सुमारे ७,९९५ कोटी रुपयांचा ‘लेटर ऑफ ऑफर अँड अॅक्सेप्टन्स’ (LOA) करार केला. या पॅकेजमध्ये हेलिकॉप्टर्सचे सुटे भाग, सहाय्यक उपकरणे, प्रशिक्षण व तांत्रिक मदत, विविध यंत्रणांची देखभाल- दुरुस्ती, तसेच भारतात ‘इंटरमिजिएट’ स्तरावरील दुरुस्ती व नैमित्तिक व नियमित देखभाल सुविधांसाठीची उभारणी आदींचा समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले की, “या सस्टेन्मेंट सपोर्टमुळे अत्याधुनिक, सर्वप्रकारच्या हवामानात कार्यक्षम एमएच-६०आर हेलिकॉप्टर्सची उपलब्धता आणि देखभाल क्षमता यात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.