Operation Urja Suraksha Indian Navy : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी भारतासह जगभरातील अनेक देशांत खनिज तेलासह नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा जाणवू लागला. हीच बाब लक्षात घेता भारतीय नौदलाने या समुद्री मार्गात अडकून पडलेली आपली व्यापारी जहाजे बाहेर काढण्यासाठी ‘ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा’ या मोहिमेला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत नेमकं चाललंय तरी काय? या जलमार्गात भारताची सध्या किती जहाजे अडकून पडली? त्याविषयीचा हा आढावा…
होर्मुझ सामुद्रधुनी का महत्त्वाची?
जगातील सुमारे २० टक्के खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होर्मुझ सामुद्रधुनीतून केली जाते. पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान इराणने या जलमार्गाची नाकेबंदी केल्याने तेथून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली. त्याचा थेट परिणाम जागतिक बाजारावर झाल्याने खनिज तेलाच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आणि त्यापाठोपाठ नैसर्गिक वायूच्या दरानेही उच्चांक गाठला. इराणने केलेली नाकेबंदी मोडून काढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी या क्षेत्रातून मार्गस्थ होणाऱ्या व्यापारी जहाजांना संरक्षण देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी करताना खुद्द अमेरिकेचीच मोठी फजिती झाल्याचे दिसून आले.
होर्मुझवर इराणचे किती नियंत्रण?
इराण हा होर्मुझच्या सामुद्रधुनीला लागून असलेला किनारी देश असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या जागतिक सागरी मार्गावर त्याचे प्रभावी नियंत्रण आहे. भौगोलिकदृष्ट्या ही सामुद्रधुनी अत्यंत अरुंद (केवळ ३३ किमी) आहे, त्यामुळेच इराणच्या सागरी क्षेत्राचा वापर टाळून या भागातून प्रवास करणे कोणत्याही जहाजासाठी अशक्य आहे. या मोक्याच्या स्थानाचा फायदा घेऊन इराणने याआधीही अनेकदा जागतिक शक्तींवर दबाव तंत्राचा वापर केलेला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून इराणने परवानगीशिवाय हा जलमार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे २० जहाजांवर हल्ले केले आहेत. त्याशिवाय होर्मुझमधून प्रवास करण्यासाठी अनेक जहाजांकडून त्यांनी टोलसारखी वसुली सुरू केली आहे.
होर्मुझमध्ये भारताची किती जहाजे अडकली?
मार्च महिन्यात आतापर्यंत केवळ १३८ जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला आहे. त्यामध्ये ८७ तेलवाहू जहाजे आणि नैसर्गिक वायूच्या टँकर्सचा समावेश आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी या जलमार्गातून दररोज १३८ ते १४० जहाजांची ये-जा होत होती. आता मात्र ही संख्या दिवसाला अवघ्या पाच ते सहा जहाजांवर आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत विविध देशांतील सुमारे २,००० मालवाहू जहाजे अडकून पडल्याचे आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेने म्हटले आहे. त्यामध्ये भारताच्या २० जहाजांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. इराणने सध्या मोजक्याच देशांतील जहाजांना या मार्गातून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. २८ फेब्रुवारीनंतर भारताकडे जाणाऱ्या केवळ सहा टँकर्सनी हा समुद्री मार्ग ओलांडला आहे.
ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा मोहीम काय आहे?
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प झाल्यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशाची ‘ऊर्जा सुरक्षा’ अबाधित राखण्यासाठी भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदलाने पाचपेक्षा अधिक युद्धनौका तैनात केल्या आहेत. ओमान आणि इराणदरम्यान असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्गदर्शन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्याद्वारे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा अत्यावश्यक पुरवठा घेऊन भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांचे संरक्षण केले जात आहे. भारतीय नौदल जहाजांना सुरक्षित मार्गाने नेण्यासाठी बॅकचॅनेल समन्वयाबरोबरच रिअल-टाइम नेव्हिगेशनची मदत करत आहे, जेणेकरून ही जहाजे सुरक्षितपणे होर्मुझ सामुद्रधुनी पार करू शकतील.
भारतीय जहाजांना कसा मिळतोय मार्ग?
सामान्यतः भारताकडे येणारी जहाजे सौदी अरेबियातील बंदरांमधून पर्शियन आखातातून होर्मुझ सामुद्रधुनीकडे जातात. हा प्रवास साधारण दोन दिवसांचा असतो. मात्र, पश्चिम आशियातील संघर्षामुळे ही प्रक्रिया आता सुरळीत राहिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, तणावपूर्ण वातावरणात लक्ष्य होऊ नये म्हणून जहाजांना भारतीय ओळख स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सामुद्रधुनी पार केल्यानंतर भारतीय नौदलाकडून संरक्षण दिले जात आहे. ओमानच्या आखातातून अरबी समुद्राकडे जाताना नौदलाची युद्धनौका जहाजांना धोक्याच्या क्षेत्रातून सुरक्षित बाहेर काढत आहे. नौदलाने ओमानचा आखात आणि अरबी समुद्र परिसरात अनेक युद्धनौका तैनात केल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान या मालवाहू जहाजांशी सतत संपर्क ठेवला जात आहे. ही मोहीम अत्यंत सावधगिरीने राबवली जात असून, नौदलाचे अधिकारी बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाशी समन्वय साधून काम करीत आहेत.
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली
भारतीय नौदलाच्या या मोहिमेमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेली दोन व्यापारी जहाजे भारताच्या दिशेने सुरक्षित मार्गस्थ झाली आहेत. या दोन्ही जहाजांमध्ये मिळून सुमारे ९२,००० टन एलपीजी गॅस आहे. ही जहाजे २६ ते २७ मार्चपर्यंत भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे. याआधीही नौदलाच्या पहाऱ्यात ‘शिवालिक’, ‘नंदा देवी’ आणि ‘जग लाडकी’ या भारताच्या कच्च्या तेलाच्या जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित पार केली होती. यादरम्यान सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्णपणे बंद केली नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. भारतासह चीन, रशिया आणि पाकिस्तान यांसारख्या मित्रराष्ट्रांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहील. त्यांच्या जहाजांना आमचे सशस्त्र दल सुरक्षित मार्ग काढून देत असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले आहे.
