अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू होऊन आता महिना होत आहे. या युद्धाने देशासाठी महत्त्वाची असलेली ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि सागरी मार्गांची सुरक्षा (सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन्स (एसएलओसी)) हे मुद्दे अधोरेखित झाले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमुळे तयार झालेल्या आव्हानाला तोंड देताना नौदल अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याचा आढावा…
सागरी वाहतुकीमधील ‘चोक पॉइंट्स’
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाला आता महिना होत आहे. या युद्धातील कळीचा मुद्दा राहिला, तो म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीचा. येमेनच्या हुथी बंडखोरांनीही या युद्धात उडी घेतल्यानंतर आता बाब अल मंडप सामुद्रधुनीचीही चर्चा होत आहे. सागरी व्यापारामध्ये जे महत्त्वाचे मार्ग आहेत, त्यामध्ये या सामुद्रधुनी येतात. त्यांना ‘चोक पॉइंट्स’ म्हणून संबोधले जाते. डोंगरांमध्ये जशी खिंड असते, तसाच हा प्रकार. हिंदी महासागर क्षेत्रामध्ये ‘केप ऑफ गूड होप’, ‘मोझाम्बिक चॅनेल’, ‘बाब अल मंडब’, ‘सुएझ कॅनॉल’, ‘होर्मुझ’ची सामुद्रधुनी, मलाक्का आणि सिंगापूरची सामुद्रधुनी, सुंडा सामुद्रधुनी, लोम्बोक आणि ओम्बाईची सामुद्रधुनी हे महत्त्वाचे सागरी मार्ग आहेत.
सागरी क्षेत्रामध्ये प्राधान्यक्रमाचे भाग
भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये प्रथम प्राधान्यक्रमामध्ये किनारी भाग, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन (ईईझेड) याबरोबरच पर्शियाचे आखात, ओमान, एडनचे आखात, लाल समुद्र याखेरीज होर्मुझची सामुद्रधुनी, बाब अल मंडब, मलाक्का, सिंगापूर, सुंडा, लोम्बोक, मोझाम्बिक चॅनेल, केप ऑफ गूड होप या क्षेत्रांचा समावेश आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाच्या सागरी मार्गांचाही या प्राधान्यक्रमात समावेश आहे.
नौदलाची महत्त्वाची भूमिका
नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी पश्चिम आशियातील घडामोडींविषयी एका मुलाखतीमध्ये खूप चांगली माहिती दिली. सागरी सुरक्षेच्या माध्यमातून ऊर्जा सुरक्षा आणि या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा आहे, असे सांगताना या संकल्पना परस्परसंलग्न असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘सारे जग सध्या परस्परांवर अवलंबून आहे. या साऱ्यात सागरी मार्गांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची असते. या मार्गांत एके ठिकाणी कुठे अडथळा तयार झाला, तर त्याचा परिणाम अन्य ठिकाणी कुठे तरी होतो. रस्ता, आकाशमार्गापेक्षा सागरी व्यापार स्वस्त असतो. भारताचाही मोठा व्यापार सागरी मार्गाने होतो. भारताची अर्थव्यवस्था सागरी व्यापारावर अवलंबून आहे.’ सागरी मार्गांच्या सुरक्षेबाबत ते म्हणाले, ‘हा आमच्या दैनंदिन कामाचा भाग आहे. येथे ‘मॅरिटाइन डोमेन अवेअरनेस’ हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हिंदी महासागर क्षेत्रात नौदल अतिशय बारकाईने नजर ठेवून असते. भारतीय नौदलाला या क्षेत्रामध्ये प्रत्येक नौकेची पूर्ण माहिती असते. कुठली नौका कुठून येते, कुठे जाते, हे सारे माहीत असते. नौदलाच्या मोहिमांवर आधारित तैनाती असतात. कुठल्याही प्रकारच्या संकटांचा सामना करण्यासाठी नौदल कायमच सज्ज असते. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी नौदलाचे अविरत प्रयत्न सुरू असून, ते कायम राहतील.’
बहुस्तरीय नीतीचा अवलंब
एका ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताच्या तेलवाहू नौका, टँकरना सुरक्षा पुरवताना नौदल बहुस्तरीय नीतीचा अवलंब करीत आहे. प्रत्यक्ष युद्धनौकांची सोबत, राजनैतिक पातळीवरील प्रयत्न आणि तंत्रज्ञानात्मक क्षमता यांचा उपयोग या कामी करण्यात येत आहे. यात सर्वांत महत्त्वाची भूमिका ‘हायड्रोग्राफिक चार्ट’ अर्थात समुद्रातून सुरक्षित आणि योग्य दिशेने प्रवास कसा करावा, याचे आरेखन, बजावते. भारताची विशेष नौका असे ‘चार्ट’ तयार करते. पश्चिम आशियातील तणावाच्या स्थितीतून, पाणसुरुंगांचे संकट टाळून नौका मार्गस्थ होताना या साऱ्याची मदत होते. तंत्रज्ञानाचाही आधार घेतला जातो. भारताची नौका असल्याचे ठळकपणे दाखवण्याच्या सूचना व्यापारी नौकांना दिल्या जातात. नौदलाच्या युद्धनौका व्यापारी नौकांबरोबर केवळ सोबतीची भूमिका न वठवता सर्वतोपरी सहाय्य करीत आहेत. ओमानच्या आखातापासून अरबी समुद्रापर्यंत प्रत्येक क्षणी नौदलाच्या युद्धनौका या नौकांना सहाय्य करतात.
नौदलाची यापूर्वीची कामगिरी
नौदलाने यापूर्वी १९८६ मध्ये ‘ऑपरेशन राजदूत’, २००६मध्ये ‘ऑपरेशन सुकून’, २०११ मध्ये ‘ऑपरेशन ब्लॉसम’, २०१५ मध्ये ‘ऑपरेशन राहत’ राबविले होते. नौदलाने आता ‘ऑपरेशन ऊर्जा’ सुरू केले आहे. आतापर्यंतच्या मोहिमांपेक्षा ही मोहीम खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे सागरी मार्गांचे आणि सागरी सुरक्षेचेही महत्त्व यामुळे अधोरेखित झाले आहे. येत्या काळात सागरी सुरक्षा अधिकाधिक मजबूत होण्याच्या दिशेने वेगाने पावले पडणे गरजेचे आहे.
prasad.kulkarni@expressindia.com
