भारतीय वंशाचे व्यक्ती आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. अवघ्या सहा आठवड्यापूर्वी लिझ ट्रस यांनी त्यांचा पराभव केला होता. पण लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान पदावरून नाट्यमय पद्धतीने पायउतार झाल्या. यामुळे ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या सर्वोच्चपदी विराजमान होण्याची दुसरी संधी मिळाली. आता ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली आहेत. यामुळे त्यांचं जगभरातून कौतुक केलं जात आहे. पण ऋषी सुनक यापूर्वी काही वेळा वादाच्या भोवऱ्यातही अडकले आहेत. ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांचे संबंधित वाद जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

अनिवासी नागरिक आणि ग्रीनकार्ड
उच्चभ्रू पार्श्वभूमी आणि त्यांच्या संपत्तीवरून ऋषी सुनक विरोधकांच्या टीकेचे धनी ठरत आहेत. अलीकडेच ‘संडे टाइम्स’ने ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत २५० लोकांची यादी जाहीर केली होती. यामध्ये ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचा समावेश होता. संबंधित वृत्तानुसार, ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती ७३० दशलक्ष पौंड इतकी आहे. भारतीय रुपयांत हा आकडा साडेसहा हजार कोटीहून अधिक आहे.

ऋषी सुनक हे ब्रिटनच्या संसदेतील सर्वात श्रीमंत खासदार असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांची पत्नी अक्षता मूर्ती या ‘अनिवासी नागरिक’ असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. अक्षता मूर्ती या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असल्या तरी अद्याप त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडलं नाही. यामुळे विदेशात केलेल्या कमाईवर ब्रिटनमध्ये कर भरण्यास त्या पात्र ठरत नाहीत. ही माहिती समोर आल्यानंतर ब्रिटनमध्ये अनेकांनी संताप व्यक्त केला.

यावर स्पष्टीकरण देताना अक्षता मूर्ती यांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, भारत आपल्या नागरिकांना एकाच वेळी दुसर्‍या देशाचं नागरिकत्व धारण करू देत नाही. ऋषी सुनक यांनीही आपल्या पत्नीचं खंबीरपणे समर्थन केलं. तिने अद्याप भारतीय नागरिकत्व सोडलं नाही, कारण भविष्यात कधी ना कधी तिला भारतात परत जाऊन आपल्या पालकांची देखभाल करावी लागेल. तिला परत भारतात जावं लागू शकतं, असा युक्तिवाद सुनक यांनी केला. यानंतर ८ एप्रिल रोजी अक्षता मूर्ती यांनी स्वत: जागतिक उत्पन्नांवर ब्रिटनमध्येही कर भरेन, अशी ग्वाही दिली.

हेही वाचा- विश्लेषण: आता खरंच ‘नो टेन्शन’! तणावातही आनंदी ठेवते डेन्मार्कची लोकप्रिय ‘Hygge’ पद्धत; नेमकं हे घडतं कसं?

कर न भरण्याचं प्रकरण ताजं असताना ऋषी सुनक यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ पर्यंत अमेरिकेचं ग्रीन कार्ड होतं, हा मुद्दाही समोर आला. ब्रिटनमध्ये खासदार झाल्यानंतर सुमारे सहा वर्षाहून अधिक काळ सुनक यांच्याकडे अमेरिकेचं ग्रीन कार्ड होतं. तर अर्थमंत्री झाल्यानंतर जवळपास १८ महिने त्यांच्याकडे अमेरिकेचं ग्रीन कार्ड होतं. यावरूनही सुनक यांना ब्रिटनमध्ये टीकेचा सामना करावा लागला. ब्रिटनमधील राजकीय कारकीर्द अपयशी ठरली तर अमेरिकेत परत जाण्याचा पर्याय सुनक यांनी खुला ठेवला असल्याची टीका लिबरल डेमोक्रॅटचे नेते सर एड डेव्ही यांनी केली होती.

रशियामध्ये गुंतवणूक?
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर, ऋषी सुनक यांनी ब्रिटीश कंपन्यांना रशियात गुंतवणूक न करण्याचं आवाहन केलं होतं. “ब्रिटीश कंपन्यांनी रशियामध्ये गुंतवणूक केल्यास अप्रत्यक्षपणे याचा फायदा व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीला होऊ शकतो. सध्याच्या घडीला रशियात गुंतवणूक करणं जोखीमेचं आहे. यामुळे जास्तीत जास्त आर्थिक नुकसान होऊ शकतं. युक्रेनमधील रक्तपात थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन रशियातील गुंतवणूक थांबवली पाहिजे. हा विचार पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे” असं आवाहन सुनक यांनी केलं होतं.

हेही वाचा- विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका, पण पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांची मागणी का वाढली?

तथापि, सुनक यांचा हा सल्ला त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनीच पाळला नसल्याचं समोर आलं. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अक्षता मूर्ती यांच्या वडिलांची कंपनी इन्फोसिसने रशियातून बाहेर पडण्यास नकार दिला. तसेच या कंपनीच्या माध्यमातून मिळणारा नफा अक्षता मूर्ती घेत राहिल्या. हे प्रकरण समोर आल्यानंतर ऋषी सुनक पुन्हा वादाऱ्या भोवऱ्यात अडकले. तथापि, सुनक यांच्या प्रवक्त्याने सारवा-सारव करताना म्हटलं की, कंपनीच्या निर्णयामध्ये मूर्ती किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचा थेट संबंध नाही.

ब्रेड विवाद
यावर्षी सुरुवातीला ‘बीबीसी ब्रेकफास्ट’ने ऋषी सुनक यांची मुलाखत घेतली होती. संबंधित मुलाखतीत देशातील वाढत्या महागाईवर प्रश्न विचारला असता सुनक यांनी देशात ब्रेडच्या किमती वाढत असून लोकांना जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीनं विचारलं तर की, तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्रेड आवडतो? यावर उत्तर देताना सुनक म्हणाले, “मला ‘हॉव्हिस सीडेड’ प्रकारचा ब्रेड आवडतो. आमच्याकडे सगळ्याच प्रकारचे ब्रेड असतात. आरोग्याच्या दृष्टीने मी, माझी पत्नी आणि मुलं आम्ही घरातील सर्वजण वेगवेगळ्या प्रकारचं ब्रेड खातो.” या उत्तरानंतर सुनक यांना नेटकऱ्यांच्या टीकेला तोंड द्यावं लागलं. देशात ब्रेडच्या किमती वाढत असल्याचं सांगत असताना घरात सर्वच प्रकारचे ब्रेड असतात, असं विरोधीभासी विधान केल्यामुळे सुनक यांच्यावर अनेकांनी टीकास्र सोडलं होतं.