Indian Origin Brothers Sentenced 835 Years in USA : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या दोन भावंडांना तब्बल ८३५ वर्षांच्या एकत्रित तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. भास्कर सावनी व अरुण सावनी अशी दोषींची नावे असून, या प्रकरणाने संपूर्ण भारतात एकच खळबळ उडवून दिली. आरोपींचे एफबीआय संचालक काश पटेल यांच्याबरोबरचे जुने फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण नेमके आहे तरी काय? कोण आहेत सावनी बंधू? अमेरिकेतील न्यायालयाने त्यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षा का सुनावली? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

नेमके प्रकरण काय?

अमेरिकेतील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सावनी बंधूंनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अनेक प्रकारचे गुन्हे केले. बनावट कंपन्या आणि कागदपत्रांच्या आधारे व्हिसा नियमांचे उल्लंघन करणे, अमेरिकन सरकारच्या ‘मेडिकेड’ या आरोग्य विमा योजनेतून कोट्यवधी डॉलर्स हडप करणे, बेकायदा मार्गाने कमावलेला पैसा पांढरा करणे आणि सरकारला करापोटी मिळणारा महसूल बुडवणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या संपूर्ण कटात त्यांची सहकारी अलेक्झांड्रा ओला रॅडोमिक हिचाही सहभाग निष्पन्न झाला असून, तिलाही दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकन न्यायालयाने या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, सावनी बंधूंना एकत्रितपणे ८३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

काय आहेत नेमके आरोप?

अमेरिकन अ‍ॅटर्नी ऑफिसच्या माहितीनुसार, सावनी बंधू त्यांच्या कंपन्यांचा वापर करून अनेक वर्षांपासून फसवणुकीचे रॅकेट चालवत होते. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, हे एक दीर्घकाळ चाललेले गुन्हेगारी कारस्थान होते. सरकारी योजनांमधील त्रुटींचा फायदा घेऊन आणि इतरांची फसवणूक करून स्वतःची संपत्ती वाढवण्यासाठी हा गैरप्रकार करण्यात आला. त्यासाठी न्यायालयाने भास्कर सावनी यांना ४२० वर्षे आणि अरुण सावनी यांना ४१५ वर्षे अशी एकूण ८३५ वर्षांच्या एकत्रित तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांची सहकारी रॅडोमिक हिला ४० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे. त्याशिवाय या गुन्हेगारी गटाशी संबंधित असलेले निरंजन सावनी, आमेन ढिल्लो, सुनील फिलीप आणि सुसान मालपार्टिडा यांनाही विविध कलमांखाली दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेतील ही एक अत्यंत दुर्मीळ आणि कठोर शिक्षा मानली जात आहे.

आणखी वाचा : इराणचे नवे सर्वोच्च नेते किती गंभीर जखमी? मोजतबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

सावनी बंधूंनी नेमकी कशी फसवणूक केली?

सावनी बंधूंनी अमेरिकन सरकार आणि सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारीचे एक जाळे विणले होते. त्यांनी बनावट व्हिसा अर्ज आणि याचिका दाखल करून, परदेशी कामगारांना (ज्यात बहुतांश भारतीय होते) अमेरिकेत आणले. एकदा नोकरीवर रुजू झाल्यावर या कामगारांकडून विविध शुल्काच्या नावाखाली पैसे उकळले जायचे. इतक्यावरच न थांबता, या कामगारांना त्यांच्या पगाराचा काही हिस्सा सावनी समूहाला परत देण्यास भाग पाडले जायचे. कामगारांचा काम करण्याचा परवाना कंपनीवर अवलंबून असल्याने त्याचा गैरफायदा सावनी बंधू घेत होते. भारतीय वंशाच्या या दोन्ही भावंडांना अमेरिकेच्या मेडिकेड या आरोग्य विमा योजनेत फसवणूक केल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आले.

सावनी बंधूंच्या ‘घोटाळ्यांची’ कुंडली

तपासात असे आढळले की, अमेरिकन सरकारच्या आरोग्य विमा योजनेचा परवाना सावनी ग्रुपला मिळाला होता. मात्र, परवान्याची वैधता संपल्यानंतरही सावनी बंधूंनी या विमा योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे कोट्यवधी रुपये लाटले. त्यासाठी आरोपींनी एका डॉक्टरचा ‘नॅशनल प्रोव्हायडर आयडेंटिफायर’ क्रमांक चोरून विम्याची खोटी बिले सादर केली. सरकारी वकिलांच्या मते, फसवणुकीतून मिळालेला पैसा लपवण्यासाठी सावनी बंधूंनी विविध कॉर्पोरेट बँक खात्यांचे गुंतागुंतीचे जाळे तयार केले होते. तसेच, त्यांनी सुमारे १.६ दशलक्ष डॉलर्सचे वैयक्तिक उत्पन्न आणि कामगारांचा पगार यांवरील कर भरला नाही. घराची देखभाल, मालमत्ता कर आणि मुलांच्या कॉलेजची फी यांसारखे वैयक्तिक खर्च त्यांनी व्यवसायाचा खर्च म्हणून दाखवून अमेरिकन सरकारची फसवणूक केली. सावनी ग्रुपने या घोटाळ्यातून ३० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त पैसे कमावल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा :  नासाचा ६०० किलोचा उपग्रह पृथ्वीवर धडकणार; समुद्रात पडणार की शहरावर? वैज्ञानिकांचा इशारा काय?

कोण आहेत सावनी बंधू?

अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सावनी बंधू हे पेनसिल्व्हेनियामध्ये आपले मोठे साम्राज्य चालवत होते. भास्कर सावनी हे व्यवसायाने दंतवैद्य असून, ते वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात. अरुण सावनी हे प्रामुख्याने सावनी ग्रुपचे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. संपूर्ण गुन्हेगारी कारस्थानाचे आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन त्यांच्याकडेच होते. २०२३ मध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांनी सावनी बंधूंवर गुन्हे दाखल केले आणि संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोप निश्चित झाल्यानंतरही दोघे बंधू सार्वजनिक कार्यक्रमाला बिनधास्तपणे हजेरी लावत होते. यादरम्यान काळात एफबीआयचे नवनियुक्त संचालक काश पटेल यांच्याबरोबरचे त्यांचे फोटोही व्हायरल झाले. गंभीर गुन्ह्यांचा तपास सुरू असताना अमेरिकन तपास यंत्रणेच्या सर्वोच्च प्रमुखांबरोबर आरोपींचे फोटो समोर आल्याने अमेरिकन प्रशासनावरही टीका होत आहे. आरोपींनी आपल्या राजकीय ओळखीचा वापर करून आणखी काही गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला आहे का, असा प्रश्न अमेरिकन समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे.