Indian Origin Woman Murder in Toronto : कॅनडातील टोरंटो शहरात भारतीय वंशाच्या तरुणीसह एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. एकाच आठवड्यात घडलेल्या या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली. हिमांशी खुराणा (वय ३०) आणि शिवांक अवस्थी (वय २०) असे हत्या झालेल्या तरुण-तरुणीची नावे आहेत. याप्रकरणी टोरंटो पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅनडात भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यादरम्यान शिवांश आणि हिमांशीची हत्या नेमकी कोणी केली? पोलिसांचा नेमका दावा काय? त्याविषयीचा हा आढावा…

हिमांशी खुराणाची हत्या कोणी केली?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशी खुराणा ही ३० वर्षीय भारतीय वंशाची तरुणी टोरंटो शहरातील स्ट्रॅचन अव्हेन्यू परिसरात वास्तव्यास होती. गेल्या शुक्रवारी (१९ डिसेंबर) ती अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली. यादरम्यान रात्रभर शोधमोहीम राबवल्यानंतर शनिवारी (२० डिसेंबर) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांना हिमांशीचा मृतदेह एका घरात आढळून आला. तपासाअंती तिची हत्या झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या प्रकरणी कॅनडा पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध देशव्यापी अटक वॉरंट जारी केले आहे. हा प्रकार ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ किंवा वैयक्तिक संबंधांतील वादातून घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिमांशीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा ३२ वर्षीय प्रियकर अब्दुल गफुरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

आरोपी अब्दुल आणि मृत हिमांशीमध्ये अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या अब्दुल गफुरी हा फरार असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो कोणालाही दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेवर टोरांटोमधील भारताच्या महावाणिज्य दूतावासाने शोक व्यक्त केला आहे. मृत हिमांशीच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जात असून स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तपासात सहकार्य केले जात असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आरोपी अब्दुल गफुरीवर पूर्व नियोजित हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. जर हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

आणखी वाचा : बांगलादेशात हिंदू तरुणाची हत्या कशामुळे झाली? कोण होता अमृत मंडल? युनूस सरकारचा दावा काय?

शिवांक अवस्थीची गोळ्या झाडून हत्या

भारतीय वंशाच्या तरुणीच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच टोरंटो विद्यापीठाजवळ आणखी एका विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवांक अवस्थी असे २० वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- शिवांक हा टोरंटो विद्यापीठात शिक्षण घेत होता. २३ डिसेंबर रोजी त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी विद्यापीठ परिसरातच गोळ्या झाडल्या. यानंतर स्थानिकांनी शिवांकला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. शिवांकच्या हत्येनंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या हत्याकांडानंतर विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भारतीय दूतावासाने व्यक्त केले दु:ख

शिवांकची हत्या करणाऱ्या अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित कुठेही आढळल्यास तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी स्थानिकांना केले आहे. टोरंटोमधील भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आम्ही शिवांकच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. शिवांक हा टोरांटो विद्यापीठात जीवशास्त्र विषयातील तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच्या निधनानंतर विद्यापीठ प्रशासनाने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर करीत श्रद्धांजली वाहिली आहे. शिवांक अवस्थी याच्या निधनाने आम्हाला धक्का बसला आहे. तो नेहमी सरावाच्या वेळी सर्वांना प्रोत्साहित करायचा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य उमलवायचा. शिवांश आमच्या नेहमीच आठवणीत राहील आणि त्याची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे विद्यापीठाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचा नेमका आरोप काय?

शिवांकवर गोळीबार झाल्यानंतर विद्यापीठाचा स्कारबोरो कॅम्पसने तातडीने लॉकडाऊन केले आहे. विद्यार्थ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित स्थळी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. शिवांकच्या हत्येनंतर कॅनडात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांनी यापूर्वी अनेकदा कॅम्पसच्या सुरक्षेबाबत तक्रारी केल्या होत्या, परंतु विद्यापीठ प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, संशयित आरोपी आणि त्यांच्या हेतूबाबत प्रशासनाने पुरेशी माहिती न दिल्याबद्दलही विद्यार्थ्यांनी टीका केली आहे.

हेही वाचा : उन्नाव बलात्कार प्रकरण : उच्च न्यायालयाने माजी आमदाराच्या शिक्षेला स्थगिती का दिली? कारण काय?

कॅनडातील हिंदूंना कोण लक्ष्य करतंय?

गेल्या काही वर्षांत कॅनडातील भारतीय वंशांच्या प्रामुख्याने हिंदू समुदायातील नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार- २०१९ ते २०२५ या कालावधीत कॅनडातील भारतीय वंशाच्या व्यक्तींवरील हल्ल्यांमध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्थलांतरितांच्या संख्येत वेगाने वाढ झाल्याने हे हल्ले होत असल्याचा दावा काहींनी केला आहे. कॅनेडियन लोक याला गृहनिर्माण संकट, नोकऱ्यांची कमतरता आणि सार्वजनिक सेवांवरील भार मानतात, त्यामुळे तिथे स्थलांतरविरोधी भावना वाढल्या आहेत; ज्या द्वेषपूर्ण गुन्हे आणि ऑनलाइन गैरवर्तनातून दिसून येतात, असे एका स्थानिक माध्यमाने आपल्या वृत्तात म्हटले आहे. भारत-कॅनडा संबंधांमधील तणावामुळे (खालिस्तान मुद्द्यावर) काही गटांमध्ये भारतविरोधी भावना वाढल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कॅनडामधील हिंदू समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत, त्यामुळे भारत सरकारकडून या संदर्भात काय कठोर भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.