Indian Railways New Ticket Cancellation Rules 2026 : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यातील पहिला निर्णय हा रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर मिळणाऱ्या परताव्या संदर्भातील आहे; तर दुसरा निर्णय गाडी सुटण्याच्या काही मिनिटे आधी प्रवाशांना बोर्डिंग पॉईंट म्हणजेच स्टेशन बदलण्याची मुभा देणारा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण नियमांबाबतची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने तिकीट रद्द करण्याचे नियम अचानक का बदलले? गाडी सुटण्याच्या आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना किती रक्कम परत मिळेल? त्याविषयीचा हा आढावा…

तिकीट रद्द करण्याबाबतचे नवीन नियम काय?

वर्षातील इतर दिवशी रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे सर्वसामान्यांसाठी इतके कठीण नसते; पण सण-वाराचे दिवस आल्यास सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होते. अशा वेळी गरजू प्रवाशांना आरक्षित तिकीटही मिळत नाही. सामान्य आरक्षण तिकिटाचे बुकिंग सुरू झाल्यावर काही क्षणांतच सर्व तिकिटे संपून जातात. रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, जर प्रवाशाने गाडी सुटण्याच्या आठ तास आधी तिकीट रद्द केल्यास त्याला एक रुपयाही परतावा मिळणार नाही. त्याशिवाय ८ ते २४ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीट दराच्या केवळ ५० टक्केच रक्कम प्रवाशांना मिळेल. उर्वरित रक्कम तिकीट रद्द करण्याचे शुल्क म्हणून कपात केली जाईल. २४ ते ७२ तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना ७५ टक्के परतावा मिळणार आहे. जर प्रवासाच्या ७२ तास आधी तिकीट रद्द केल्यास किमान रद्द शुल्क वजा करून उर्वरित रक्कम प्रवाशांना परत मिळेल.

तिकीट रद्द करण्याचे जुने नियम काय होते?

याआधी रेल्वेचे तिकीट रद्द करण्याचे नियम ४ तास, १२ तास व ४८ तास या कालावधींवर आधारित होते. त्यानुसार, गाडी सुटण्याच्या चार तासांपेक्षा कमी वेळेत तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा नव्हता; तर ४ ते १२ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास जवळपास ५० टक्के परतावा मिळत असे. १२ ते ४८ तासांदरम्यान रद्द केल्यास प्रवाशांना ७५ टक्के परतावा दिला जात होते. त्याशिवाय ४८ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास किमान शुल्क वजा करून प्रवाशांना जवळपास पूर्ण परतावा मिळत होता. यादरम्यान प्रवाशांनी ऐन वेळी तिकीट रद्द करू नये आणि गरजू प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल केल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : सोन्या-चांदीच्या दरात अचानक घसरण का झाली? भाव आणखीनच कोसळणार की वाढणार? तज्ज्ञांचे मत काय?

रेल्वेने तिकीट रद्द करण्याचे नियम का बदलले?

रेल्वेने तिकीट रद्द करण्याच्या नियमांत अचानक बदल का केला, असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे. त्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बदल आरक्षण चार्ट तयार करण्याच्या नवीन पद्धतीशी सुसंगत राहण्यासाठी करण्यात आला आहे. यापूर्वी रेल्वेचा चार्ट गाडी सुटण्याच्या काही काळ आधी तयार केला जात होता. त्यामुळे वेटिंग लिस्ट आणि आरएसी प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले की नाही हे अगदी शेवटच्या क्षणी समजत होते. नवीन नियमानुसार, प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन आधीच करता यावे, यासाठी चार्ट ९ ते १८ तास आधीच तयार केला जातो. सकाळी ५ ते दुपारी २ दरम्यानच्या रेल्वे गाड्यांचा चार्ट आदल्या रात्री ९ वाजेपर्यंतच तयार केला जातो. त्याचबरोबर दुपारी २ ते रात्री १२ आणि मध्यरात्रीच्या गाड्यांचा पहिला चार्ट साधारणपणे ९ तास आधी तयार केला जातो. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, जर चार्ट प्रवासाच्या ९ ते १८ तास आधीच तयार होत असेल, तर तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया जुन्या पद्धतीनुसार (४ तास आधी) ठेवणे तांत्रिकदृष्ट्या विसंगत ठरत होते.

प्रवाशांना बोर्डिंग पॉईंट कसा बदलता येणार?

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, प्रवाशांना गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी आपला बोर्डिंग पॉईंट बदलता येणार आहे. ही सुविधा लागू करण्यासाठी RailOne सारख्या तिकीट बुकिंग अ‍ॅप आणि अधिकृत पोर्टलमध्ये विशेष पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. सध्या तिकीट बुक करतानाच प्रवाशांना एकच बोर्डिंग पॉईंट निवडता येतो. त्यानंतर तो बदलण्याची सुविधा मिळत नाही. मुंबई, पुणे, दिल्लीसारख्या अनेक स्थानक असलेल्या मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सोईच्या स्थानकावरून प्रवास सुरू करण्याची लवचिकता मिळेल. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे नियम १ ते १५ एप्रिलदरम्यान टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : US-Iran War : डोनाल्ड ट्रम्प नरमले? अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम होणार? वादात कोण करतंय मध्यस्थी?

रेल्वेची ‘५२ आठवड्यांत ५२ सुधारणा’ मोहीम

भारतीय रेल्वेने या वर्षी ‘५२ आठवड्यांत ५२ सुधारणा’ करण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रवासी सेवांपासून ते मालवाहतुकीपर्यंत रेल्वेचा कायापालट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आतापर्यंत रेल्वे मंत्रालयाने एकूण नऊ मोठ्या सुधारणा जाहीर केल्या असून, त्यामध्ये प्रवाशांसाठीच्या या दोन महत्त्वाच्या उपायांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, दर आठवड्याला एक नवीन सुधारणा लागू करून रेल्वेची कार्यक्षमता वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्याद्वारे प्रवाशांचा प्रवास सुखकर करणे, मालवाहतुकीतून उत्पन्न वाढवणे आणि रेल्वेचे आधुनिकीकरण करणे यांवर भर दिला जात आहे.