Indian Seafarers Death in US Millitary Attack: अमेरिकन लष्कराने ओमान किनारपट्टीजवळ एका जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताला केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दुजोरा दिला आहे. “बेपत्ता झालेल्या तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. भारत सरकारने अमेरिकेच्या उप-राजदूतांना समन्स बजावले आहे. याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवला आहे”, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली.
अमेरिकेने भारतीय खलाशांच्या जहाजावर हल्ला का केला?
ओमानच्या आखातात १० जून रोजी एका व्यावसायिक जहाजावर हल्ला केल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले होते. सूचनांचे पालन न केल्यामुळे अमेरिकन लष्कराने हल्ला केला, अशी माहिती देण्यात आली होती. अमेरिकेने हल्ला केलेल्या ‘सेटेबेल्लो’ या जहाजात २४ भारतीय खलाशी होती. त्यांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जणांना वाचवण्यात आले. भारताने अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. इराणमधून तेल घेऊन हे जहाज जात होते, असे अमेरिकेने म्हटले. भारताने या हल्ल्यानंतर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
एकाच आठवड्यात तीन जहाजांवर हल्ला
अमेरिकेने एकाच आठवड्यात भारतीय खलाशी असलेल्या तीन जहाजांवर हल्ला केला आहे. सर्वात आधी मॅट्रिव्हेक्स, त्यानंतर सेटेबेल्लो आणि आज (११ जून) जलवीर या जहाजावर हल्ला करण्यात आला. ‘जलवीर’वरील सर्व २० भारतीय खलाशी सुखरूप असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. पश्चिम आशियातील युद्धा दरम्यान याआधी मार्च महिन्यात पर्शियन आखातात झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकूण भारतीय खलाशांची संख्या आता सहा झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे भारतीय खलाशी व त्यांचे जागतिक पातळीवरील योगदान चर्चेत आले आहे.
जगातील सागरी व्यापार क्षेत्रात किती भारतीय खलाशी?
भारत हा खलाशांचा पुरवठा करणारा जगातील आघाडींच्या देशांपैकी एक आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, आजच्या घडीला सुमारे तीन लाख भारतीय नागरिक सागरी व्यापार क्षेत्रात कार्यरत आहेत. सागरी व्यापार क्षेत्र किंवा सागरी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० ते १२ टक्के कर्मचारी किंवा अधिकारी भारतीय आहेत. भारतीय कंपन्या किंवा विदेशातील कंपन्यांच्या जहाजांवर हे खलाशी काम करतात.
सागरी व्यापार क्षेत्रातील ‘डेटा’नुसार, भारतीय खलाशी महत्त्वाच्या पदांवर काम करतात. कॅप्टन, नेव्हिगेशन ऑफिसर, मरिन इंजिनियर, टेक्निकल एक्स्पर्ट या पदांवर काम करणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायू, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम हे खलाशी करतात. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुरळीत चालते. जगातील एकूण व्यापारापैकी ९० ते ९५ टक्के व्यापार हा जलमार्गाने होतो. सागरी वाहतूक जागतिक पुरवठा व्यवस्थेत अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. जगात पश्चिम आशियासारखा तणाव निर्माण झाल्यास त्याचा फटकाही सर्वाधिक भारतीय खलाशांना बसतो.
एकूण ७८ भारतीय खलाशांना युद्धाची झळ
पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या हल्ल्यांमध्ये तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. तर एक भारतीय खलाशी गंभीर जखमी झाला होता. हे सर्व खलाशी एका विदेशी ध्वज असलेल्या जहाजावर कार्यरत होते. सरकारी माहितीनुसार, पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान एकूण ७८ भारतीय खलाशांना हल्ल्यांचा सामना करावा लागला होता. त्यांपैकी ७० खलाशी वाचले, चार खलाशी जखमी झाले, तीन खलांशांचा मृत्यू झाला, तर एक खलाशी बेपत्ता आहे.
खलाशांसाठी भारत सरकार काय करते?
युद्धाने प्रभावित झालेल्या हजारो भारतीय खलाशांना मायदेशी परत आणण्याचे तसेच त्यांना मदत पुरवण्याचे काम भारत सरकारकडून केले जाते. सरकारने आतापर्यंत एकूण ३४७४ भारतीय खलाशांना भारतात सुखरूप आणले आहे, हा आकडा ३० एप्रिल रोजी २९२९ होता, तर मार्च महिन्यात २५३ होता. त्यात वाढ होऊन तो आता ३४७४ झाला आहे, अशी माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने दिली आहे. भारतीय नौदल, परराष्ट्र मंत्रालय, आयएफसी- आयओआर, एमआरसीसी आणि इंडियन मिशन यांच्या एकत्रित सहकार्याने भारतीय खलाशांना वाचवण्याचे काम केले जाते.
समुद्रात अडकलेल्या खलाशांच्या मदतीसाठी हजारो फोन कॉल, इमेल्स
पश्चिम आशियातील युद्धामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. त्यामुळे जहाजांची वाहतूक ठप्प झाली होती. पीटीआयच्या मार्च मधील एका वृत्तानुसार, किमान ३७ भारतीय तिरंगा ध्वज असलेल्या जहाज पर्शियन आखात व ओमानच्या आखातात अडकून पडल्या होत्या. त्यांवर ११०० हून अधिक भारतीय खलाशी होते. क्षेपणास्त्रांची भीती, इतर देशांच्या गस्त घालणाऱ्या नौका, वाहतुकीचे बंद झालेले मार्ग यांमुळे जहाज अडकून पडल्या होत्या. या परिस्थितीत प्रचंड अस्वस्थता, अनिश्चितता, कुटुंबांशी संपर्क साधण्याची मर्यादित माध्यमे आणि मानसिक तणाव यांचा सामना खलाशांना करावा लागतो.
मार्च महिन्यात पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘डीजी शिपिंग कम्युनिकेशन सेंटर’ला ११ हजार ६०० फोन कॉल्स आणि जवळपास २५ हजार ८०० इमेल्स प्राप्त झाले होते. खलाशी व खलाशांच्या कुटुंबियांनी सरकारकडे मदतीची याचना करण्यासाठी फोन व इमेल्स पाठवले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
