जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारा आणि सर्वाधिक परतावा देणारा भारतीय शेअर बाजार सध्या दबावाखाली आहे. गेल्या काही आठवड्यांत प्रथम तैवान आणि त्यानंतर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने भारताला मागे टाकत जागतिक बाजार भांडवल क्रमवारीत अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान पटकावले. भारत सातव्या क्रमांकावर घसरला. हा बदल केवळ आकडेवारीचा नसून जागतिक गुंतवणुकीच्या प्रवाहात होत असलेल्या मोठ्या बदलांचा संकेत मानला जात आहे.

भारत जागतिक बाजार का घसरला?

गेल्या काही आठवड्यांत प्रथम तैवान आणि त्यानंतर दक्षिण कोरियाच्या भांडवली बाजाराने भारताला मागे टाकले. दक्षिण कोरियाचे बाजार भांडवल ५ ट्रिलियन (५ लाख कोटी) डॉलरच्या पुढे गेले, तर भारताचे सुमारे ४.८ ट्रिलियन डॉलरपर्यंत खाली घसरले आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री, रुपयावरील दबाव, कंपन्यांची मंदावलेली नफावाढ आणि कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रातील मर्यादित उपस्थिती यामुळे भारत पिछाडीवर पडला आहे. शेअर बाजारासाठी २०२६ हे वर्ष आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरले. आशियाई बाजारातील या बदलत्या चित्रामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भारत आणि कोरिया, तैवान तुलना

१ जूनपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ५.०४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. या तुलनेत भारताचे बाजार भांडवल ४.८४ ट्रिलियन डॉलरवर घसरले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात भारताला मागे टाकणारा तैवान ५.१५ ट्रिलियन डॉलरसह जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर कायम आहे, तर दक्षिण कोरिया सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

एआय क्रांतीचा सर्वाधिक फायदा?

सध्या जागतिक भांडवली बाजारात कृत्रिम प्रज्ञा हा सर्वात मोठा गुंतवणुकीचा विषय ठरला आहे. एआय डेटा सेंटर, क्लाऊड कॉम्प्युटिंग, रोबोटिक्स आणि प्रगत संगणकीय प्रणालींसाठी लागणाऱ्या चिप्सची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. याच ठिकाणी तैवान आणि दक्षिण कोरिया आघाडीवर आहेत. तैवानची तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि एसके हायनिक्स या कंपन्या जगातील अत्याधुनिक सेमीकंडक्टर आणि मेमरी चिप्सच्या उत्पादनात अग्रस्थानी आहेत. एआय क्षेत्रातील जागतिक गुंतवणुकीचा मोठा हिस्सा या कंपन्यांकडे वळला आहे. परिणामी तैवान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारांनी विक्रमी तेजी अनुभवली.

भारताची नेमकी अडचण काय?

भारत माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात बलाढ्य असला तरी एआय हार्डवेअर, सेमीकंडक्टर उत्पादन आणि प्रगत चिप डिझाइनमध्ये अद्याप मागे आहे. देशात जागतिक पातळीवरील मोठी चिप उत्पादक कंपनी नाही. त्यामुळे एआय गुंतवणुकीचा थेट फायदा भारतीय बाजाराला मिळत नाही. भारतीय आयटी कंपन्या एआय सेवा पुरवतात; मात्र एआय क्रांतीतून सर्वाधिक पैसा कमावणाऱ्या चिप कंपन्या भारतीय भांडवली बाजारात सूचिबद्ध नाहीत. परिणामी जागतिक निधी एआय-केंद्रित बाजारांकडे वळताना भारताकडे तुलनेने कमी प्रमाणात येत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांची माघार का?

गेल्या काही महिन्यांपासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढत आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे भारतीय समभागांचे उच्च मूल्यांकन. अनेक क्षेत्रांतील समभाग त्यांच्या ऐतिहासिक सरासरीपेक्षा महाग झाले होते. दुसरे म्हणजे कंपन्यांच्या नफावाढीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहिला. तिसरे म्हणजे अमेरिकेतील उच्च व्याजदरांमुळे उदयोन्मुख बाजारांमधील गुंतवणुकीवर दबाव वाढला. तसेच भारत हा जगातील सर्वात मोठ्या खनिज तेल आयातदार देशांपैकी एक आहे. प

श्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाच्या किमती १०० डॉलर प्रतिपिंपाच्या वर गेल्याने देशाचा आयात खर्च वाढला आहे. याचा परिणाम व्यापारी तूट, रुपयावरील दबाव आणि महागाईवर होत आहे. महागाई वाढल्यास व्याजदर कमी करण्याचा मार्ग कठीण होतो. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदार अधिक सावध झाले आहेत.

मान्सूनही ठरणार महत्त्वाचा?

भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात मान्सूनवर अवलंबून असल्याने हा घटक महत्त्वाचा मानला जातो. कमी पाऊस पडल्यास अन्नधान्य महागाई वाढू शकते. त्यामुळे ग्राहक खर्च आणि कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोरिया, तैवानची तेजी किती टिकाऊ?

या दोन्ही बाजारांच्या तेजीचा मोठा आधार काही मोजक्या चिप कंपन्या आहेत. एआय गुंतवणुकीचा वेग कायम राहिला तर त्यांना फायदा होत राहील. मात्र जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात मंदी आली किंवा एआय गुंतवणुकीचा वेग कमी झाला तर या बाजारांवरही दबाव येऊ शकतो. म्हणजेच सध्याची तेजी मजबूत असली तरी ती पूर्णपणे जोखमीपासून मुक्त नाही.

भारतासाठी पुढचा मार्ग कोणता?

भारताची सर्वात मोठी ताकद म्हणजे मोठी अर्थव्यवस्था, वाढता मध्यमवर्ग, मजबूत देशांतर्गत मागणी आणि उत्पादन क्षेत्राला मिळणारे सरकारी प्रोत्साहन. सेमीकंडक्टर उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि डेटा सेंटर क्षेत्रात होत असलेल्या नव्या गुंतवणुकींचे परिणाम पुढील काही वर्षांत दिसू शकतात. अल्पकालात भारतीय बाजार दबावाखाली राहू शकतो. मात्र दीर्घकालीन दृष्टीने अर्थव्यवस्थेची मजबूत पायाभूत रचना, लोकसंख्यात्मक लाभ आणि वाढती गुंतवणूक क्षमता यामुळे भारताची वाढीची कहाणी संपलेली नाही.

भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत आहे?

तसे म्हणता येत नाही. बाजार भांडवल आणि अर्थव्यवस्थेचा आकार हे वेगवेगळे मापदंड आहेत. भारताची अर्थव्यवस्था सुमारे ४.१५ ट्रिलियन डॉलरची असून ती दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा दुपटीहून अधिक मोठी आहे. तसेच भारत अजूनही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.

भारताकडे मजबूत देशांतर्गत मागणी, उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक, डिजिटल अर्थव्यवस्था आणि मोठा ग्राहकवर्ग ही बलस्थाने आहेत. मात्र अल्पकालात परदेशी गुंतवणूक परत आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट नफावाढ, स्थिर चलन, कमी महागाई आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन संधी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

भविष्य आशादायी?

भारतीय मजबूत अर्थव्यवस्था आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता असली तरी एआय हार्डवेअर आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील मर्यादित उपस्थितीमुळे सध्या बाजारमूल्याच्या शर्यतीत तो मागे पडला आहे. मात्र ही कायमस्वरूपी स्थिती नसून पुढील काही वर्षांतील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक भारतासाठी निर्णायक ठरू शकते.

gaurav.muthe@expressindia.com