Impact of Iran-Israel conflict on Indian students pursuing higher education in Gulf countries and safety guidelines : पश्चिम आशियामध्ये इराण आणि इस्रायल दरम्यान सुरू झालेल्या लष्करी संघर्षाने आता उग्र रूप धारण केले आहे. याचा थेट परिणाम फक्त जागतिक राजकारणावरच नाही, तर आखाती देशांमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या लाखो भारतीय विद्यार्थ्यांच्या भविष्यावरही होताना दिसत आहे.

हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी आखाती देश हे उच्च शिक्षणासाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. याचे कारण म्हणजे एकतर आखाती देश हे भारतापासून जवळ आहेत आणि येथे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत शैक्षणिक शुल्क कमी असून आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस देखील उपलब्ध आहेत. मात्र सध्या पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेला संघर्षामुळे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता, प्रवासात अडथळे येणे आणि शैक्षणिक वर्षामध्ये खंड पडणे या समस्या काळजीचा विषय बनल्या आहेत.

सध्या या भागत घडत असलेल्या घडामोडी पाहाता हा संघर्ष खूप वेगाने शेजारच्या देशांमध्ये पसरू शकतो, तसेच या संघर्षामुळे विमान प्रवास, सार्वजनिक सुरक्षितता आणि महाविद्यालयांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो हे दिसून येत आहे.

संयुक्त अरब अमिराती, कतार, सौदी अरेबिया किंवा कुवेत यांसारख्या देशांमध्ये शिक्षणासाठी जाण्याच्या विचारात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सध्याची परिस्थिती विचारात पाडणारी आहे. या देशांमध्ये जाण्याआधी सध्याची भू-राजकीय परिस्थितीमध्ये स्वीकारावी लागणारी जोखीम याचा विचार करावा लागणार आहे.

आखाती देशांमध्ये भारतीय विद्यार्थी

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एकत्र केलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये भारताचे १८.९ लाखांहून अधिक विद्यार्थी हे वेगवेगळ्या १५३ देशांमध्ये शिक्षण घेत होते. या विद्यार्थ्यांचा एक मोठा हिस्सा आखाती देशांमध्ये आहे.

सरकारी आकडेवारीनुसार हे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे-

  • संयुक्त अरब अमिराती (UAE): २५३८३२ विद्यार्थी (अंदाजे)
  • सौदी अरेबिया: ७५८३० विद्यार्थी (अंदाजे)
  • कुवेत: ५०००० विद्यार्थी (अंदाजे)
  • कतार: ४९३४६ विद्यार्थी (अंदाजे)
  • ओमान: ४४८४७ विद्यार्थी (अंदाजे)

विशेषतः दुबई हे एक मोठे शैक्षणिक केंद्र म्हणून पुढे आले आहे. नॉलेज अँड ह्युमन डेव्हलपमेंट अथॉरिटी (KHDA)ने दिलेल्या माहितीनुसार, दुबई येथील उच्च शिक्षण संस्थांमध्ये एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४२ ते ४३ टक्के विद्यार्थी हे भारतीय आहेत.

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा काय परिणाम होतो आहे?

अमेरिका-इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यानंतर इराणनने देखील प्रत्युत्तर देत हल्ले सुरू केल्याने पश्चिम आशियामध्ये संघर्ष पेटला आहे.

विश्लेषकांनी इशारा दिला आहे की या संघर्षाचा परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेत पाहायला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक घट आणि सुरक्षेबाबत अनिश्चितता निर्माण होऊ शकते.

या संघर्षादरम्यान अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्याचा विद्यार्थी आणि प्रवाशांवर वाईट परिणाम झाला आहे. आखाती देशांमधील काही भागात विमान उड्डानांमध्ये अडथळे आल्याचे आणि हवाई क्षेत्र बंदकेल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.

शिक्षणात देखील अडथळ्यांचा सामना करावा लागत असून काही संस्थांनी ‘डिस्टन्स लर्निंग’चा पर्याय स्वीकारला आहे.

जेव्हा भू-राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेशांमध्ये तणाव वाढला की त्याचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर किती लवकर परिणाम होऊ शकतो हेच या स्थितीमधून दिसून येत आहे..

आखाती देशांमधील भारतीयांसाठी काय सूचना देण्यात आल्या आहेत?

परराष्ट्र मंत्रालयाने या प्रदेशातील भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. संघर्षग्रस्त देशांमधील भारतीय दूतावासांनी विद्यार्थी आणि इतर नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास सेवेत असलेले हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत.

उदाहरण द्याचे झाल्यास, कतारमध्ये भारतीय दूतावासाने नागरिकांना सुरक्षेसंबंधी इशारा देण्यात आल्यानंतर घरातच राहावे असा सल्ला दिला आहे. यातून शेजारील देशांबरोबर वाढलेला तणाव हा दैनंदीन आयुष्याला कसा प्रभावित करू शकतो हे पाहायला मिळते.

जोखीम असूनही विद्यार्थी आखाती देशांमध्ये शिक्षणासाठी का जातात?

अनिश्चितता असूनही भारतीय विद्यार्थी आखाती देशांमध्ये शिक्षणसाठी जातात, यामागे अनेक कारणे आहेत.

१) भारतापासूनचे अंतर – भारत आणि आखाती देशांमधील शहरे यांच्यात विमान प्रवास कमी कालावधीचा आहे आणि येथे जाण्यासाठी वेळेवर विमाने देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना येथे भेट देणे सोपे जाते.

२) आंतरराष्ट्रीय विद्यापीठे – अनेक पाश्चिमात्य विद्यापीठांनी दुबई, अबु धाबी आणि कतार अशा ठिकाणी त्यांच्या शाखा सुरू केल्या आहेत.

३) करिअरच्या संधी – या प्रदेशात तुम्हाला बिझनेस, तंत्रज्ञान आणि हॉस्पिटॅलिटी अशा क्षेत्रांमध्ये नौकरीच्या संधी मिळतात.

४) संस्कृतीक जवळीक – येथे भारतीय समुदायांची संख्या मोठी असल्यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिकदृष्ट्या जुळवून घेणे अधिक सोपे जाते.

या सर्व कारणांमुळे युएस, युके आणि कॅनडा या पारंपारिक ठिकाणांऐवजी आखाती देशांची शिक्षणासाठी निवड केली जाते.

Students in Iran

आखाती देशात शिक्षणासाठी जाण्याआधी या गोष्टींचा विचार करा

शिक्षण क्षेत्रातील तज्ञांच्या मते, भू-राजनैतिक घडामोडींचा प्रत्येक परदेशात शिक्षणासाठी जाण्याची योजना आखणाऱ्या विद्यार्थ्याने विचार केला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना नियमितपणे तपासत राहिले पाहिजे.

काही मोठी घडामोड घडली तर काय केले जाईल याबाबत त्या शैक्षणिक संस्थेकडे धोरण असले पाहिजे. ते आहे का हे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वीच तपासून घ्यावे. तसेच विद्यार्थ्यांनी त्या देशातील भारतीय दूतावासाकडे स्वतःची नोंदणी करणे आणि तेथे आपले कॉन्टॅक्ट डिटेल्ससंबंधी माहिती अपडेट ठेवणे आवश्यक आहे.

इन्शुरन्स घेण्याचा विचार करा

जर तुम्हाला अचानक तो देश सोडावा लागला किंवा अनपेक्षित अडचणी आल्या तर प्रवास आणि आरोग्य विमा मदतीचा ठरू शकतो.