Indian Tribal Gut Microbiome research marks a major breakthrough in human gut health and second brain mechanics: आपण खातो ते अन्न केवळ आपले पोट भरत नाही, तर आपल्या शरीरातील अब्जावधी सूक्ष्मजीवांनाही अन्न पुरवते. हे सूक्ष्मजीव पचन, रोगप्रतिकारकशक्ती, मानसिक आरोग्य, झोप, वजन एवढेच नव्हे तर माणसाची निर्णयक्षमता यांवरही परिणाम करतात, असे आता वैज्ञानिक संशोधनातून लक्षात आले आहे. त्यामुळेच आतड्यांना अनेक संशोधक ‘दुसरा मेंदू’ (Second Brain) म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील BRIC–नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS)च्या संशोधकांनी भारतातील विविध आदिवासी समुदायांच्या पोटातील सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून १४ पूर्णपणे नवीन जीवाणू प्रजाती आणि सुमारे २०० पूर्वी नोंद न झालेले स्थानिक जीवाणू स्ट्रेन्स शोधून काढले आहेत.
पोटातील सूक्ष्मजीव म्हणजे नेमके काय?
Gut Microbes या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामुळे भारताच्या सूक्ष्मजीव संपत्तीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. मानवी आतड्यांमध्ये राहणाऱ्या जीवाणू, बुरशी, विषाणू आणि इतर सूक्ष्मजीवांच्या समूहाला गट मायक्रोबायोम म्हणतात. आपल्या शरीरात असलेल्या मानवी पेशींपेक्षा या सूक्ष्मजीवांची संख्या प्रचंड आहे. ते पुढील महत्त्वाची कामे करतात:
- अन्नाचे पचन सुलभ करणे
- जीवनसत्त्वे तयार करण्यात मदत करणे
- रोगप्रतिकारकशक्ती नियंत्रित ठेवणे
- आतड्यांच्या आतील आवरणाचे संरक्षण करणे
- हानिकारक जंतूंना वाढू न देणे
NCCS मधील संशोधक डॉ. धीरज धोत्रे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना सांगितले की, “गट मायक्रोबायोम प्रत्येक व्यक्तीत वेगळा असतो. आहार, भौगोलिक परिस्थिती, औषधे, पर्यावरण आणि सांस्कृतिक सवयी यांचा त्यावर प्रभाव पडतो.”
कोणत्या समुदायांचा अभ्यास करण्यात आला?
प्रस्तुत संशोधनासाठी भारतातील आठ आदिवासी समुदायांची निवड करण्यात आली होती. त्यात वारली (पश्चिम किनारपट्टी), गोंड आणि माडिया (दख्खन पठार), कबुई (रोंगमेई नागा) (ईशान्येकडील डोंगराळ भाग) आणि बोटो, बाल्टी, ब्रोखपा आणि पुरीगपा (ट्रान्स-हिमालयन प्रदेश) यांचा समावेश होता. हे समुदाय भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून हजारो किलोमीटर अंतरावर राहतात आणि त्यांचा आहार व जीवनशैली एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत.

…तरीही काही सूक्ष्मजीवांमध्ये साम्य
संशोधकांना या मुद्द्यांचे आश्चर्य वाटले की, सर्वच आदिवासी समुदायांमध्ये तीन जीवाणू गट मोठ्या प्रमाणात आढळले: त्यात Segatella, Agathobacter आणि Faecalibacterium यांचा समावेश होता. हे जीवाणू पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. मात्र भारतीय Segatella चे आनुवंशिक स्वरूप युरोप आणि उत्तर अमेरिकेतील डेटाबेसमध्ये आढळणाऱ्या प्रकारांपेक्षा वेगळे होते.
‘सगळ्यांसाठी एकच हेल्दी गट’ ही कल्पना चुकीची?
अनेक आरोग्य चाचण्या, प्रोबायोटिक्स आणि मायक्रोबायोम विषयीची विश्लेषणे पाश्चिमात्य डेटावर आधारित असतात. पण भारतीयांचे अन्न, हवामान, मसाल्यांचा वापर, धान्ये, किण्वण केलेले पदार्थ आणि सामाजिक सवयी वेगळ्या असल्याने त्यांच्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांचाही स्वभाव वेगळा असणे स्वाभाविक आहे. डॉ. धोत्रे यांच्या मते, “आरोग्यदायी मायक्रोबायोमची व्याख्या प्रत्येक लोकसमूहासाठी स्वतंत्र असू शकते.”
हिमालयीन आहाराचा सूक्ष्मजीवांवर ठसा
सर्वाधिक वेगळेपणा म्हणजे ट्रान्स-हिमालयन समुदायांमध्ये दिसून आला. त्यांच्या पारंपरिक आहारात दूध, घरचे लोणी, गहू, बार्ली (जव), तांदूळ, पालेभाज्या, कंदमुळे, फळे आणि विविध प्रकारच्या बेरीज यांचा समावेश होता. या समुदायांमध्ये Bifidobacterium या उपयुक्त जीवाणूचे प्रमाण जास्त आढळले. तसेच लॅक्टोज, गॅलॅक्टोज आणि धान्यांतील कार्बोहायड्रेट पचविणाऱ्या जनुकांची संख्या अधिक होती. याचा अर्थ असा असू शकतो की पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या आहाराशी जुळवून घेत मायक्रोबायोममध्येही उत्क्रांती झालेली असावी.
पोट आणि मेंदूचा थेट संबंध
गेल्या दोन दशकांत विज्ञानाने Gut–Brain Axis म्हणजेच आतडे आणि मेंदूचा संबंध या संकल्पनेला अधिक महत्त्व दिले आहे. आपल्या आतड्यांमध्ये सुमारे १० कोटींहून अधिक मज्जापेशी असतात. हा मज्जासंस्थेचा भाग Enteric Nervous System म्हणून ओळखला जातो. तो मेंदूशी वॅगस नर्व्ह, हार्मोन्स आणि सूक्ष्मजीवांनी तयार केलेल्या रसायनांद्वारे सतत संवाद साधत असतो. त्यामुळेच ताण वाढला की पोट बिघडते, भीती वाटली की पोटात गोळा येतो आणि पोटाचे आरोग्य खराब झाले तर मनःस्थितीवर परिणाम होतो. त्यामुळेच अनेक न्यूरोसायंटिस्ट आतड्यांना ‘दुसरा मेंदू’ म्हणतात.
नोबेल पुरस्काराचा संदर्भ काय?
सुमारे आठ वर्षांपूर्वी, म्हणजे २०१७ मध्ये, शरीरातील सूक्ष्मजीव, जैविक घड्याळ आणि आरोग्य यांच्यातील संबंधांवर झालेल्या संशोधनाला फिजिऑलॉजी किंवा मेडिसिनमधील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. या सन्मानामुळे मानवी शरीरात राहणारे सूक्ष्मजीव आणि त्यांचा आरोग्यावर होणारा प्रभाव हे आधुनिक वैद्यकशास्त्रात केंद्रस्थानी आले. हा पुरस्कार थेट `दुसरा मेंदू’ या संकल्पनेसाठी नसला, तरी त्यानंतर गट मायक्रोबायोम विषयक संशोधनाला जागतिक स्तरावर गती मिळाली आणि पोटातील सूक्ष्मजीवांचा मानसिक व शारीरिक आरोग्याशी असलेला संबंध अधिक गांभीर्याने अभ्यासला जाऊ लागला.
प्रोबायोटिक्सबाबत या अभ्यासाने काय दाखवले?
बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रोबायोटिक्समध्ये Bifidobacterium adolescentis हा जीवाणू वापरला जातो. NCCS च्या अभ्यासात भारतीय समुदायांतील या जीवाणूंचे प्रकार औद्योगिक देशांतील प्रकारांपेक्षा आनुवंशिकदृष्ट्या वेगळे असल्याचे आढळले. याचा अर्थ असा नाही की परदेशी प्रोबायोटिक्स निरुपयोगी आहेत. मात्र संशोधकांच्या मते पुढील प्रश्न विचारणे आवश्यक आहे:
- भारतीय लोकांसाठी कोणते स्ट्रेन्स अधिक उपयुक्त आहेत?
- कोणते जीवाणू आपल्या आहाराशी अधिक सुसंगत?
- प्रदेशानुसार प्रोबायोटिक्स बदलायला हवेत का?
भारताला स्वतःचा ‘मायक्रोबायोम नकाशा’ का हवा?
भारत हा जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेला देश मानला जातो. पण ही विविधता केवळ जंगलात किंवा वन्यजीवांमध्ये नाही; तर ती मानवी शरीरातही दडलेली आहे. प्रस्तुत अभ्यासातून स्पष्ट झाले की, अगदी मर्यादित नमुन्यांमध्येही इतके नवीन सूक्ष्मजीव सापडू शकतात, तर संपूर्ण देशाचा अभ्यास केल्यास हजारो नवीन जीवाणू प्रजाती समोर येऊ शकतात. भारत-विशिष्ट मायक्रोबायोम डेटाबेस तयार झाल्यास पुढील क्षेत्रांना मोठा फायदा होऊ शकतो:
- पोषणशास्त्र
- मधुमेह आणि लठ्ठपणाविषयक संशोधन
- हृदयरोगाला अटकाव
- मानसिक आरोग्य
- वैयक्तिक औषधोपचार (पर्सनलाइज्ड मेडिसीन)
- भारतीय आहाराला अनुरूप प्रोबायोटिक्स विकसित करणे
आधुनिक जीवनशैली आणि हरवत चाललेले सूक्ष्मजीव वैविध्य
शहरीकरण, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा बेसुमार वापर, अँटिबायोटिक्सचा अतिवापर, कमी शारीरिक हालचाल आणि निर्जंतुकीकरणावर वाढते अवलंबित्व यामुळे जगभरात मायक्रोबियल विविधता कमी होत असल्याची चिंता जगभर व्यक्त केली जात आहे.
आदिवासी आधुनिक जीवनशैलीपासून अद्याप दूर
या पार्श्वभूमीवर आदिवासी समाज मात्र अद्याप या आधुनिक जीवनशैलीपासून दूर आहे. ते आजही स्थानिक धान्ये खातात, हंगामी भाज्यांचा वापर जेवणात करतात, किण्वण केलेल्या पदार्थांचे सेवन करतात आणि नैसर्गिक वातावरणात दीर्घकाळ राहतात. म्हणूनच आदिवासींचे मायक्रोबायोम हे मानवजातीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील जिवंत जैविक संग्रहालयच आहे, असे संशोधकांना वाटते.
सर्वसामान्यांनी काय धडा घ्यावा?
हे संशोधन आपल्याला महागडी उत्पादने खरेदी करण्यापेक्षा पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व अधोरिखित करते. तज्ज्ञांच्या मते आतड्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त सवयींमध्ये विविध धान्यांचे नियमित सेवन, भरपूर भाजीपाला आणि फळे, कडधान्ये, ताक, दही, किण्वण केलेले पदार्थ जेवणात असणे, अनावश्यक अँटिबायोटिक्स टाळणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमित झोप आणि व्यायाम या बाबी अत्यावश्यक आहेत.
पोटातील सूक्ष्मजीवांचं नातं आपल्या माती, अन्न, हवामान आणि संस्कृतीशी
पुण्यातील NCCS च्या या संशोधनाने एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे तो म्हणजे आपल्या पोटातील सूक्ष्मजीव हे आपल्या मातीशी, अन्नाशी, हवामानाशी आणि संस्कृतीशी जोडलेले असतात. भारतीय आदिवासी समुदायांच्या आतड्यांमध्ये सापडलेले १४ नवे जीवाणू हा केवळ एक वैज्ञानिक शोध नाही; तर हा भारताचा आगळावेगळा जैविक वारशाच आहे. भविष्यात कदाचित डॉक्टर औषधांसोबत “तुमच्या प्रदेशासाठी योग्य मायक्रोबायोम” अशी शिफारसही करतील. कारण आता विज्ञानाला कळले आहे की, आपल्या आरोग्याची खरी गुरुकिल्ली पोटात अर्थात पोटातील मेंदूमध्ये दडलेली आहे.
संदर्भसूची
- Dhotre D. et al. Gut Microbes (2026), BRIC–NCCS Pune tribal gut microbiome study.
- BRIC–National Centre for Cell Science (NCCS), Pune – अधिकृत संशोधन माहिती.
- Mayer, E. A. The Mind–Gut Connection. Harper Wave.
- Cryan, J. F., & Dinan, T. G. “Mind-altering microorganisms: the impact of the gut microbiota on brain and behaviour.” Nature Reviews Neuroscience.
- Sender, R., Fuchs, S., & Milo, R. “Revised estimates for the number of human and bacteria cells in the body.” PLoS Biology.
- Nobel Prize Outreach AB (2017). The Nobel Prize in Physiology or Medicine 2017 – https://www.nobelprize.org/.
- Foster, J. A., & McVey Neufeld, K.-A. “Gut–brain axis: how the microbiome influences anxiety and depression.” Trends in Neurosciences.
- Indian Council of Medical Research (ICMR) – भारतीय पोषण आणि मायक्रोबायोम संदर्भ साहित्य.
