भारत आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरितांना आपल्या देशात अजिबात नोकऱ्या देऊ नका, अशा आशयाची पोस्ट ब्रिटनमधील उजव्या विचारसरणीचे नेते तथा खासदार रुपर्ट लो यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर समाजमाध्यमांवर मोठा वादंग उठला असून अनेकांनी त्यांच्यावर स्थलांतरितविरोधी भावना भडकावल्याचा आणि विशिष्ट वांशिक गटांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. मात्र, या टीकेचा रुपर्ट यांच्यावर फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. उलट त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करीत मला कुणी वर्णद्वेषी म्हटले तरी चालेल, पण माझ्या भूमिकेत अजिबात बदल होणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
नेमके काय म्हणाले रुपर्ट लो?
उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील काही शहरे आणि गावांना भेट दिल्यास आपण ब्रिटन सोडून पूर्णपणे दुसऱ्याच देशात आल्यासारखे वाटते. हे अचानक घडलेले नसून लेबर, रिफॉर्म आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षांच्या राजकारण्यांनी जाणीवपूर्वक लाखो कुशल कामगारांना आपल्या देशात आणण्याचा निर्णय घेतला. ही एक गंभीर समस्या असून ती सुधारण्याऐवजी झपाट्याने वाढतच चालली आहे. भारत आणि पाकिस्तानातून आलेल्या स्थलांतरितांना आपल्या देशात अजिबात नोकऱ्या देऊ नका, ते आपल्या नोकऱ्या हिरावून घेतात, असे रुपर्ट लो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. त्यांच्या या टीकेचा रोख ब्रिटनमधील मुस्लीम समुदायाकडे होता. मँचेस्टर शहरातील काही भाग वेगाने ‘इस्लामिक’ होत असल्याचा दावा त्यांनी केला. एखाद्या पुरुषासोबत बुरखा घातलेल्या दोन, तीन किंवा चार महिलांना रस्त्यावरून चालताना पाहणे मला अत्यंत क्लेशदायक वाटते. या बदलत्या लोकसंख्येमुळे ब्रिटिश महिलांना आता काही भागांमध्ये सुरक्षित वाटत नाही. महिलांना अत्यंत वाईट वागणूक देणाऱ्या मुस्लीम समाजातील पुरुष आता या ठिकाणी बहुसंख्येने राहत आहेत. हे लोक अनेक मुलांना जन्माला घालतात आणि त्यांचा खर्च हा करदात्यांच्या पैशांतूनच होतो. संसदेत इतर कोणीही या विषयावर उघडपणे बोलत नाही, असेही रुपर्ट यांनी नमूद केले.
शरीया न्यायालयांवर बंदी घालण्याची मागणी
मुस्लीम समुदायाला उद्देशून समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टमुळे वादंग उठल्यानंतर खासदार रुपर्ट लो यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी ब्रिटनमधील स्थलांतर आणि सांस्कृतिक धोरणात व्यापक बदल करण्याची मागणी केली. सरकारने बुरख्यावर बंदी घालावी, शरीया न्यायालये बंद करावीत, नात्यातील विवाहांवर निर्बंध आणावेत, हलाला पद्धतीने होणारे महिलांवरील अत्याचार थांबवावे, तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धार्मिक प्रार्थनांवरही नियंत्रण आणावे, असे रुपर्ट लो म्हणाले. याशिवाय त्यांनी मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर उलटवून टाकण्याची, परदेशी इस्लामवादी व्यक्तींना देशाबाहेर पाठवण्याची आणि राजकीय इस्लामचा प्रभाव संपवण्याची मागणी केली. आम्हाला नेहमी गप्प बसण्यास आणि हे सर्व शांतपणे स्वीकारण्यास सांगितले जाते, पण आता तसे होणार नाही. आम्ही या गोष्टी स्वीकारण्यास साफ नकार देतो, अशी आक्रमक भूमिकाही त्यांनी मांडली.
कोण आहेत रुपर्ट लो? ते राजकारणात कसे आले?
वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे रुपर्ट लो ब्रिटनमधील ग्रेट यारमथ मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी ‘रिस्टोर ब्रिटन’ या राजकीय पक्षाची स्थापनाही केलेली आहे. राजकारणात येण्यापूर्वी रुपर्ट यांनी अनेक दशके वित्तीय आणि व्यावसायिक क्षेत्रात कारकीर्द घडवली. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९८० आणि १९९० च्या दशकात लंडनमधील अनेक नामांकित वित्तीय संस्थांमध्ये काम केले. याशिवाय ते लंडन इंटरनॅशनल फायनान्शियल फ्युचर्स एक्सचेंजच्या संचालक मंडळावरही होते. वित्तीय क्षेत्राबाहेर त्यांनी ‘सिक्युअर रिटायरमेंट्स’ नावाचा वृद्धाश्रम व्यवसायही उभारला होता. १९९० च्या दशकाच्या मध्यात रुपर्ट यांनी साउथॅम्प्टन फुटबॉल क्लबची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यानंतरच्या पुढील एका दशकाहून अधिक काळ ते या क्लबचे सर्वात प्रभावशाली व्यक्ती राहिले. त्यांच्या कार्यकाळात साउथॅम्प्टन क्लबने २००३ च्या ‘एफए कप’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर रुपर्ट लो हे उजव्या विचारसरणीच्या राजकारणाशी जोडले गेले. एका मुलाखतीत त्यांनी आपल्याच पक्षातील प्रभावशाली नेते नायजेल फॅराज हे यशस्वी पंतप्रधान ठरतील की नाही हे सांगण्यासाठी अजून वेळ आहे, असे विधान केले होते. त्यानंतर झालेल्या वादातून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पुढे रुपर्ट यांनी अपक्ष खासदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जून २०२५ मध्ये त्यांनी ‘रिस्टोर ब्रिटन’ या संघटनेची घोषणा केली आणि पुढे याच संघटनेचे रूपांतर राजकीय पक्षात झाले. सध्या रुपर्ट हे या पक्षातून निवडून आलेले एकमेव खासदार आहेत.
इस्लामीकरणाला आणि धार्मिक पद्धतींना विरोध
‘रिस्टोर ब्रिटन’ हा पक्ष मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर, शरीया न्यायालये, बुरखा पद्धत, तसेच हलाला पद्धतींच्या विरोधात आहे. खासदार रुपर्ट लो वारंवार ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा उल्लेख करत असून त्याविरोधात कठोर उपाययोजनांची मागणी करतात. या पक्षाची व्यापक विचारधारा कठोर सीमा नियंत्रण, मर्यादित सरकारी हस्तक्षेप, कमीत कमी नियम आणि पारंपरिक सामाजिक मूल्यांवर आधारित आहे. रुपर्ट लो यांनी केलेल्या ‘टोटल रिमायग्रेशन’ (मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवणे) या मागणीने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांच्यासारख्या व्यक्तींनीही त्यांच्या या भूमिकेचे कौतुक केल्याचे समजते. यादरम्यान भारत आणि पाकिस्तानी स्थलांतरितांबाबत रुपर्ट यांनी केलेल्या दाव्यांवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’च्या आकडेवारीनुसार, रुपट यांच्या ग्रेट यारमथ मतदारसंघातील लोकसंख्या सुमारे ९९ हजार ७५० आहे. त्यामध्ये फक्त ९०७ नागरिक भारतीय किंवा पाकिस्तानी वंशाचे आहेत. त्यात ७८६ भारतीय आणि १२१ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. म्हणजेच या दोन्ही समुदायांचे प्रमाण मतदारसंघाच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. याउलट या भागातील सुमारे ९४.६ टक्के लोकसंख्या श्वेतवर्णीय समुदायाची आहे, त्यामुळे खासदार रुपर्ट यांचा स्थलांतरितांविरोधात इतका रोष का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
