रशिया-युक्रेन युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली आहे. भारतावरही या दोन देशांमधील युद्धाचा परिणाम झाला आहे. अनेक भारतीयांना नोकरीचे आमिष दाखवून रशियन सैन्यात भरती करण्यात आले आहे. २०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारतीयांची फसवणूक करून, त्यांना रशियन सैन्यात भरती केले गेले. त्यांना युद्धात लढण्यासाठी पाठविले गेल्याची बातमी समोर आल्याने अनेक भारतीय कुटुंबे अस्वस्थ आणि चिंतेत आहेत. आता परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, एकूण ४५ भारतीयांची रशियन सैन्यातून सुटका करण्यात येणार आहे. तसेच आणखी ५० भारतीयांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ४५ पैकी सहा भारतीयांच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ते लवकरच मायदेशी परततील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू आणि काश्मीरमधील आझाद युसूफ कुमार यांचाही या सहा भारतीयांमध्ये समावेश आहे. त्यांनी ‘दी इंडिपेंडंट’ला सांगितले, “आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. आम्ही येथे जे काही अनुभवले आहे, ते आम्ही भारताच्या विमानात चढू आणि आपल्या देशात उतरू तेव्हाच संपेल. रशियन सैन्यात किती भारतीय सेवा देत आहेत? ते तिथे कसे पोहोचले आणि त्यांच्या सुटकेसाठी अधिकारी काय करीत आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.

२०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यात रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारतीयांची फसवणूक करून, त्यांना रशियन सैन्यात भरती केले गेले. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : माणसाप्रमाणे विचार करणारं AIचं नवं मॉडेल; नोकऱ्यांवर गदा आणणार का?

रशियन सैन्यात भारतीय गेले कसे?

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर ९० हून अधिक भारतीयांना रशियन सैन्यात काम करण्यास भाग पाडले जात असल्याची बातमी समोर आली. त्याशिवाय ऑगस्टपर्यंत या संघर्षामध्ये आठ भारतीयांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. रशियन सैन्यात काम करताना फसवणूक झालेल्यांची कुटुंबे सरकारला त्यांची सुरक्षित सुटका करावी म्हणून विनंती करीत आहेत. या युद्धाशी काहीही संबंध नसताना रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीय नागरिकांची कुटुंबे त्यांच्या परतीसाठी प्रयत्न करीत आहेत आणि अतिशय चिंतेत आहेत. मात्र, गुरुवारी (१२ सप्टेंबर) परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत रशियाच्या लष्कराने ४५ भारतीयांना सोडण्यात आल्याची माहिती दिली. “पंतप्रधान मोदींनी जुलैमध्ये रशियाला भेट दिली तेव्हापासून ३५ भारतीयांना रशियन सैन्यातून सोडण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी १० भारतीय नागरिकांना सोडण्यात आले होते,” असे जयस्वाल म्हणाले. ते म्हणाले की, सध्या रशियन सैन्यात काम करीत असलेल्या उर्वरित ५० भारतीयांना परत आणण्यासाठी अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.

रशियन सैन्यात काम करताना फसवणूक झालेल्यांची कुटुंबे सरकारला त्यांची सुरक्षित सुटका करावी म्हणून विनंती करीत आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

भारतात परतण्याची वाट पाहणाऱ्या ४५ जणांपैकी २४ वर्षीय मोहम्मद सुफियान हा तेलंगणातील नारायणपेट येथील रहिवासी आहे. त्यांनी ‘द हिंदू’शी सांगितले, “आम्ही युक्रेन सीमेवरील युद्धभूमीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेड झोनमध्ये होतो. मृतदेह नेण्याचे आमचे काम होते. सतत बॉम्बस्फोट आणि गोळीबार होत होता. त्यांनी आम्हाला लपण्यासाठी दिलेले बंकर इतके छोटे होते की, तेथे श्वास घेणेही कठीण होते. सुफियानबरोबर प्रतीक्षेत असणारे समीर अहमद म्हणाले, “सीमेवरून आमच्या बेस कॅम्पपर्यंत पोहोचायला आम्हाला ३६ तास लागले. आमचे करार रद्द करण्यात आले आणि आता आम्ही स्वतःहून मॉस्कोला पोहोचलो आहोत. समीरचे भाऊ मोहम्मद मुस्तफा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, त्याच्या घरी परतल्याची बातमी कुटुंबाला मिळाली आहे आणि ते आनंदी आहेत. “आम्ही आनंदी आहोत; परंतु आम्हाला या युद्धात मरण पावलेल्या भारतीय बांधवांचे दुःखही आहे. हा दिवस जवळपास आठ महिन्यांच्या संघर्षानंतर आला आहे,” असे त्यांनी ‘दी इंडिपेंडंट’ला सांगितले.

नोकऱ्यांचे आमिष आणि सैन्यात भरती

रशियन सैन्याच्या रिलेमध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या अनेक भारतीयांची एजंटकडून फसवणूक झाली. आपल्या प्रियजनांशी बोलू शकलेल्या काहींचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि स्थानिक एजंटनी त्यांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून रशियात नेले. रशियात अडकलेल्यांनी आरोप केला आहे की, दुबईमध्ये नोकरी देण्याचे वचन देणाऱ्या यूट्यूबरने त्यांची फसवणूक केली. इतरांनीही आपण अशाच घोटाळ्यात अडकल्याची माहिती दिली. बाबा व्लॉग्स चॅनेल चालविणारे दुबईस्थित यूट्युबर फैसल खान यांच्यावर अनेकांनी आरोप केले.

रशियन सैन्यात अडकलेल्या भारतीयांनी असेही म्हटले आहे की, त्यांना अगदी कमी प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी फक्त १० दिवसांचा असतो आणि त्यानंतर त्यांना युद्धावर पाठवले जाते, जिथे त्यांच्यापैकी बरेच जण जगण्यासाठी संघर्ष करतात. या वर्षाच्या सुरुवातीला व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंजाब आणि हरियाणातील पुरुषांचा एक गटदेखील दिसला होता, ज्यांनी रशियन सैन्याचा गणवेश परिधान केलेला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधून दावा करण्यात आला होता की, त्यांना युक्रेनमध्ये युद्ध लढण्यासाठी फसवले गेले.

सुटकेसाठी प्रयत्न

जेव्हापासून या भारतीयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांच्या कुटुंबांनी राजकीय नेत्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हापासून सरकारने त्यांच्या सुटकेसाठी पावले उचलली आहेत. सुफियानचा भाऊ सलमान जहूर सय्यद यांनी ‘दी इंडिपेंडंट’ला सांगितले की, त्यांनी हे प्रकरण हैदराबादचे खासदार ओवेसी यांच्याकडे मांडले. ओवेसी यांनी पहिल्यांदा संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी अहवाल दिला की, त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी माध्यमांद्वारे हा मुद्दा उचलण्यात आला आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय आणि रशियन सैन्य यांच्यात झालेल्या करारामुळे त्यांची सुटका थांबली आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ९ ऑगस्ट रोजी लोकसभेत बोलताना याचा उल्लेख केला होता. ते म्हणाले, “समस्या ही आहे की, रशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या भारतीय नागरिकांनी रशियन लष्कराशी सेवेसाठी करार केला होता.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये रशियाच्या दौऱ्यावर असताना राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडेही हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी रशियाचे पुतिन यांनी वचन दिले होते की, युक्रेनच्या युद्धात सहभागी होण्यासाठी दिशाभूल केलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी त्यांचा देश सर्वतोपरी प्रयत्न करील.

हेही वाचा : पोर्ट ब्लेअर शहराच्या नावामागचा इतिहास काय? केंद्र सरकारने का केले शहराचे नामकरण?

उल्लेखनीय म्हणजे जयशंकर यांनी संसदेत त्यांचे विधान मांडल्यानंतर नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने जाहीर केले की, रशियाच्या सशस्त्र दलात भारतीय नागरिकांची सर्व भरती एप्रिलमध्ये थांबली आहे आणि जे सध्या सेवा देत आहेत, त्यांची लवकरात लवकर सुटका केली जाईल. भारतात अधिकाऱ्यांनी छापे टाकून तस्करी करणाऱ्या टोळीचाही पर्दाफाश केला आहे. काही कंपन्यांनी किमान ३५ भारतीयांना रशियाला पाठविल्याचे तपासात समोर आले आहे. परंतु, एका अधिकाऱ्याने सांगितले की, या सर्वांना युद्धात लढण्यास भाग पाडले गेले की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians inducted into russian army have been discharged rac
Show comments