भारतीयांनी सरासरी आयुर्मानाच्या बाबतीत पाकिस्तानी लोकांना मागे टाकले असल्याची बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे. त्याचवेळी बांगलादेशी लोकांचे आयुर्मान भारतीयांच्या तुलनेत जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, भारत आणि पाकिस्तानातील आजारांचे स्वरुप एकसमान असल्याचा दावाही अहवालातून करण्यात आला आहे. एका बाजूला तीव्र संसर्गजन्य आजार आणि दुसऱ्या बाजूला वेगाने वाढणाऱ्या जुनाट आजारांनी दोन्ही देशांतील नागरिकांना ग्रासले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे, त्याविषयी…
जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच जगभरातील अनेक देशांतील नागरिकांच्या सरासरी आयुर्मानावर एक संशोधन केले. त्यात दक्षिण आशियातील देश आणि उत्तर अमेरिकेतील उच्च उत्पन्न असलेल्या देशांमधील सरासरी आयुर्मानात मोठी तफावत असल्याचे दिसून आले. दक्षिण आशियात सरासरी आयुर्मानाच्या बाबतीत बांगलादेश अव्वल स्थानी आहे. या मुस्लीमबहुल देशाने भारत आणि पाकिस्तानला पिछाडीवर टाकले आहे. त्याचवेळी भारत-पाकिस्तान-बांगलादेशी नागरिकांचे सरासरी आयुर्मान अमेरिका आणि कॅनडाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. सध्या जगभरातील लोकांचे सरासरी आयुर्मान ७३.३ वर्षे असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. त्यात कॅनडा अव्वलस्थानी असून तेथील लोकांचे सरासरी आयुर्मान तब्बल ८१.४ वर्षे इतके आहे. दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून तेथील लोक सरासरी आयुर्मान ७८.५ वर्षे आहे. बांगलादेश या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून तेथील लोक सरासरी ७२.७ वर्षे जगतात. दुसरीकडे- भारतीयांचे सरासरी आयुर्मान ७१.० वर्षे आणि पाकिस्तानी लोकांचे ६८.२ वर्षे असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
सरासरी आयुर्मानाच्या बाबतीत भारतीय नागरिक पाकिस्तानी लोकांपेक्षा तीन वर्षे जास्त जगत असली तरी दोन्ही देशांमधील गंभीर आजारांचे प्रमाण जवळपास एकसमान आहे. बहुतांश भारतीयांना आपल्या आयुष्यातील शेवटच्या दशकांत गंभीर आजारपण, शारीरिक अपंगत्व आणि इतर दुर्धर व्याधींचा सामना करावा लागतो. पाकिस्तानमध्येही हीच स्थिती असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनात नमूद आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश निम्म मध्यम उत्पन्न गटात मोडतात. गेल्या दोन दशकांत या दोन्ही देशांत हृदयविकाराचा झटका, पक्षघात आणि मधुमेह यांसारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ झाली आहे. भारतात पहिल्या १० प्रमुख कारणांपैकी तब्बल ७५ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य आजारांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. हृदयविकाराची समस्या ही दोन्ही देशांतील नागरिकांच्या मृत्यूचे पहिल्या क्रमांकाचे कारण ठरले आहे. दक्षिण-पूर्व आशियामध्ये हृदयविकाराचा धोका जगात सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानमध्ये मृत्यूच्या कारणांमध्ये पक्षघाताचा दुसरा, तर भारतात तिसरा क्रमांक आहे. दोन्ही देशांमध्ये मधुमेह हा मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. २००० सालापासून दक्षिण आशियामध्ये मधुमेहामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तिपटीहून अधिक वाढला आहे. भारतात फुप्फुसांचे आजार हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. वायू प्रदूषणामुळे हा धोका अधिकच वाढला असून पाकिस्तानमध्ये तो पाचव्या क्रमांकावर आहे. प्रसुतीदरम्यान होणारे महिलांचे मृत्यू पाकिस्तानमध्ये सर्वाधिक चिंताजनक ठरत आहे. भारताने मात्र या धोक्यांवर तुलनेने अधिक मात केली आहे. भारतामध्ये क्षयरोग (टीबी) अजूनही मृत्यूच्या प्रमुख पाच कारणांमध्ये आहे; तर पाकिस्तानमध्ये अस्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे होणारा अतिसार (डायरिया) हे मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या ताज्या अहवालावरून हे स्पष्ट होते की, करोना महामारीनंतरच्या काळात जग सावरत असताना निरोगी आयुष्याची वाढ मंदावली असून जुनाट आणि दुर्धर आजारांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, २०२३ मध्ये जगातील सरासरी आयुर्मान ७३.३ वर्षांवर पोहोचले आहे. करोना महामारीच्या उद्रेकादरम्यान हे प्रमाण घसरून ७१.५ वर्षांवर आले होते. विशेष म्हणजे, २०२० नंतर प्रथमच ‘कोविड-१९’ हा जगातील मृत्यूच्या प्रमुख १० कारणांच्या यादीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. यादरम्यान लोकांचे एकूण आयुर्मान वाढत असले तरी निरोगी आयुष्य पूर्वपदावर येण्याचा वेग तुलनेने कमी आहे. २०२३ मध्ये जगातील सरासरी निरोगी आयुर्मान ६२.८ वर्षे इतके होते. यादरम्यान जगभरातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढत असले तरी त्यांचे पूर्णपणे निरोगी जगण्याचे प्रमाण अत्यंत संथ आहे. २०२३ मध्ये जगातील सरासरी निरोगी आयुर्मान ६२.८ वर्षे इतके होते. भारताचा विचार केल्यास, नवजात बालकाचे सरासरी आयुर्मान ७१ वर्षे अपेक्षित असले तरी ते केवळ ६०.६ वर्षांपर्यंत पूर्णपणे निरोगी राहू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
२०२३ मध्ये जगातील एकूण मृत्यूंपैकी तब्बल ७४ टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे झाले आहे. त्यातील १० पैकी आठ कारणे असंसर्गजन्य आजारांशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. हृदयविकार हा जगातील पहिल्या क्रमांकाचा जीवघेणा आजार ठरला असून २०२३ मध्ये या आजाराने तब्बल ९५ लाख लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहे. याशिवाय, २००० सालापासून तिपटीने वाढ झालेला स्मृतिभ्रंश आता जागतिक पातळीवर मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण ठरत आहे. करोना महामारीनंतर जगभरात मानसिक आरोग्याची परिस्थिती अधिकच खालावली आहे. अहवालानुसार, २०१९ ते २०२३ या कालावधीत नैराश्यामुळे निरोगी आयुष्यात सुमारे २० टक्के, तर चिंताग्रस्ततेमुळे तब्बल ४५ टक्क्यांची चिंताजनक वाढ नोंदवली गेली आहे. एकंदरीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले असले तरी त्यांचे आयुष्य निरोगी आणि आजारमुक्त ठेवणे हे जगभरातील आरोग्यव्यवस्थांसमोरील पुढील मोठे आव्हान असणार आहे.
