Indian Digital Behaviour in Public Space : दिवसभरातील कामाच्या व्यापानंतर लोकल किंवा मेट्रोच्या प्रवासात प्रत्येकजण शांततेचे चार क्षण शोधत असतो. पण, आजकाल हा प्रवास शांततेचा नाही तर ‘डिजिटल कोलाहलाचा’ झाला आहे. तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती मोठ्या आवाजात रील्स पाहत असते, थोड्या अंतरावर कोणीतरी स्पीकर फोनवर बोलत असतं, तर दुसरीकडे अचानक क्रिकेट मॅचच्या कॉमेंट्रीचा आवाज येऊ लागतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कानात इयरफोन्स घालण्याची तसदी कोणीच घेत नाही आणि आजूबाजूचे लोकही हा गोंगाट नेहमीचाच आहे असं मानून गप्प बसतात. भारतीय शहरांमधील सार्वजनिक ठिकाणांवर हे नेहमीचेच दृश्य दिसत आहे.

पूर्वी सार्वजनिक ठिकाणी फोनवर मोठ्याने बोलणं किंवा व्हिडीओ पाहणं हे सार्वजनिक शिस्तीच्या विरुद्ध मानलं जातं होतं. पण, आता स्मार्टफोन आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाला आहे. प्रवासात फोनवर व्हिडीओ पाहणं, लाइव्ह मॅच पाहणं, कॉल करणं किंवा सोशल मीडिया स्क्रोल करणं सर्वच अगदी सहजपणे करता येतं.

यामुळे एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे आपण सार्वजनिक ठिकाणी फोन वापरताना आपली सोय आणि इतरांची गैरसोय यामध्ये सीमा आखण्यास मागे पडतोय. या बदलत्या सवयींमुळे आता प्रशासनालाही हस्तक्षेप करावा लागत आहे. जुलैमध्ये चेन्नई मेट्रोने प्रवाशांना फोनवर मोठ्या आवाजात बोलणे, स्पीकरवर कॉल करणे किंवा हेडफोनशिवाय गाणी-व्हिडीओ वाजवणे टाळण्याचा इशारा दिला. नियम मोडल्यास २,५०० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याआधी हा दंड ५०० रुपये होता. मेट्रो रेल्वे कायद्यातील बदलांनंतर दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.

सगळेच मोठ्या आवाजात व्हिडीओ का पाहतात?

मार्च २०२६ पर्यंत भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०९ कोटींपेक्षा जास्त झाली होती. यामध्ये १०४ कोटींपेक्षा अधिक वायरलेस इंटरनेट वापरकर्ते आहेत, त्यामुळे स्मार्टफोन आता केवळ कॉल करण्याचं साधन राहिलेलं नाही, तर प्रवासात आणि वाट पाहताना वेळ घालवण्याचा प्रमुख पर्याय बनला आहे.

बस, मेट्रो, रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा विमानतळावर वाट पाहताना पूर्वी लोक वर्तमानपत्र वाचायचे, सोबतच्या प्रवाशांशी बोलायचे किंवा निवांत बसायचे. आता मात्र सर्वच रील्स, यूट्यूब व्हिडीओ, क्रिकेट क्लिप्स, पॉडकास्ट आणि फोन कॉल्सवर वेळ घालवतात.

यात व्हिडीओचा वाटा मोठा आहे. २०२६ च्या सेबीच्या गुंतवणूकदार सर्वेक्षणानुसार, भारतातील ८० टक्क्यांहून अधिक इंटरनेट वापरकर्ते नियमितपणे ऑनलाइन व्हिडीओ पाहतात. स्मार्टफोन आणि वेगवान इंटरनेटचा वापर वाढल्याने व्हिडीओ पाहण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तंत्रज्ञानामुळे मनोरंजन अगदी लोकांच्या हातात आलं आहे.

एकेकाळी सिनेमा, लायब्ररी किंवा ऑफिसमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलणं हे सार्वजनिक शिस्तीच्या विरुद्ध मानलं जायचं, त्यामुळे फोन आला की बाहेर जाऊन बोलणं, फोन सायलेंटवर ठेवणं किंवा गाणी ऐकताना हेडफोन वापरणं अशा सवयी लोकांना लागल्या. मात्र, स्मार्टफोन आता केवळ फोन राहिलेला नाही. टीव्ही, म्युझिक प्लेअर, गेमिंग, कॅमेरा, काम आणि सोशल मीडिया अशा अनेक गोष्टी एकाच डिव्हाइसमध्ये आल्या आहेत, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फोन वापरण्याची पद्धतही बदलली आहे.

एखादी व्यक्ती फोनवर व्हिडीओ पाहत आहे, तर ती तिच्यासाठी वैयक्तिक स्पेस असते. पण, त्या व्हिडीओचा आवाज आजूबाजूच्या प्रत्येकाला ऐकू येतो. इथेच गोंधळ होतो. स्क्रीनमध्ये लक्ष गुंतल्यामुळे आपला आवाज इतरांना त्रासदायक ठरतोय याची जाणीवही अनेकदा होत नाही. मात्र, आजूबाजूच्या लोकांना नको असतानाही त्या व्यक्तीच्या डिजिटल स्पेसचा भाग व्हावं लागतं. तसेच स्पीकरवर ठेऊन कॉलवर बोलणंदेखील असंच दुसऱ्यांना त्रास देणारं असू शकतं; दोघांचा संवाद संपूर्ण ट्रेनच्या डब्ब्याच्या कानावर पडतो.

बंगळुरू येथील साक्रा वर्ल्ड हॉस्पिटलमधील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. शिल्पी सरस्वत यांच्या मते, स्मार्टफोनने केवळ संवादाची पद्धतच बदललेली नाही, तर सार्वजनिक ठिकाणी वागण्याची पद्धतही बदलली आहे. मोठ्या आवाजात रील्स पाहणे, स्पीकर ऑन ठेवून फोनवर बोलणे किंवा आजूबाजूच्या लोकांचा विचार न करता व्हिडीओ कॉल करणं हे डिजिटल सोयी आणि सामाजिक भान यांच्यातील अंतर दाखवतं. आपण स्वत:च्या डिजिटल स्पेसमध्ये एवढे बुडून जातो की दुसऱ्याची शांतता भंग होतेय हे विसरून जातो.

त्या म्हणतात, तंत्रज्ञान वापरणं म्हणजे फक्त ते कसं वापरायचं हे माहीत असणं नाही, तर ते कुठे आणि कधी वापरायचं याचं भान असणंही महत्त्वाचं आहे. सार्वजनिक जागा, आवाजाची पातळी, गोपनीयता आणि इतरांच्या वैयक्तिक मर्यादांचा आदर करणारी डिजिटल शिस्तीची संस्कृती विकसित होण्याची गरज आहे.

शिस्त राखण्याचे नियम काय?

फोन समोर ठेवणंही संकेत देतं : टेबलवर फोन उलटा न ठेवता स्क्रीन वर ठेवली तर कॉल किंवा नोटिफिकेशनमुळे बोलण्यात व्यत्यय येऊ शकतो, असा संकेत समोरच्याला मिळतो.
फोन बाजूला ठेवणं अधिक चांगलं : फोन सायलेंट करून उलटा ठेवला तरी तो लक्ष विचलित करू शकतो. शक्य असल्यास फोन बॅगमध्ये किंवा खिशात ठेवणं अधिक योग्य असतं
समोरच्या व्यक्तीवर पूर्ण लक्ष द्या : संवाद सुरू असताना फोनपासून थोडं दूर राहिलं की समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व देता येतं
डिजिटल शिस्तही महत्त्वाची : फोन वापरताना इतरांचा आदर करा, त्यांच्या गोपनीयतेची काळजी घ्या आणि आपण ज्या सार्वजनिक किंवा सामाजिक जागेत आहोत त्याचं भान ठेवा.
काही वेळ फोनपासून दूर राहणंही गरजेचं : सतत फोनमध्ये गुंतून न राहता थोडा वेळ बाजूला ठेवणं ही देखील आजच्या डिजिटल जगात आदराची आणि संवेदनशीलतेची खूण आहे

लंडनमध्येही याच मुद्द्यावर चर्चा

ही समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नाही. ऑगस्ट २०२५ मध्ये लंडनच्या ट्रान्सपोर्ट फॉर लंडनने (TfL) ‘Travel Kind’ ही मोहीम सुरू केली. हेडफोन न वापरता गाणी-व्हिडीओ मोठ्या आवाजात ऐकणाऱ्या किंवा फोनवर बोलणाऱ्या प्रवाशांना इतरांचा विचार करण्याचं आवाहन करण्यात आलं.

टीएफएलच्या सर्वेक्षणात ७० टक्क्यांहून अधिक प्रवाशांनी मोठ्या आवाजातील संगीत आणि गोंगाट त्रासदायक असल्याचं सांगितलं, त्यामुळे प्रवासात हेडफोन वापरणं आणि आजूबाजूच्या प्रवाशांचा विचार करणं हा या मोहिमेचा मुख्य संदेश होता. टीएफएलने नंतर मोठ्या आवाजात संगीत न वाजवण्याच्या या आवाहनाला २०२५ मधील एक यशस्वी मोहीम असल्याचे म्हटले.

नव्या डिजिटल शिष्टाचाराची गरज?

गेल्या दोन दशकांत आपण फोन वापरण्याचे अनेक मूलभूत नियम शिकलो. आता सार्वजनिक ठिकाणी डिजिटल वर्तन सुधारण्याची गरज आहे. काही साधी शिस्त पाळण्याची गरज आहे. प्रवासात फोनवर व्हिडीओ पाहणं, कॉल करणं किंवा सोशल मीडिया वापरणं चुकीचं नाही. मात्र, आपल्या फोनच्या वापराने आजूबाजूच्या लोकांना त्रास होत नाहीये, याचं भान ठेवणं गरजेचं आहे.

यासाठी कठोर नियमांची गरज नसून सोप्या सवयी पुरेशा ठरू शकतात. मनोरंजनासाठी व्हिडीओ पाहताना हेडफोन वापरणं, सार्वजनिक ठिकाणी आवाज कमी ठेवणं, गरज असेल तेव्हाच स्पीकरवर बोलणं आणि आपल्या फोनचा आवाज इतरांनाही ऐकू येतोय याची जाणीव ठेवणं. शेवटी डिजिटल शिष्टाचार म्हणजे फोन वापरणं सोडून द्या असे कोणी सांगत नाही, तर तो वापरताना आजूबाजूच्या माणसांचाही विचार करणं गरजेचं आहे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.