Deep Ocean Mission India भारत सरकारच्या राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेद्वारे समुद्रयान नावाचे ‘डीप ओशन मिशन’ राबवले जात आहे. या मोहिमे अंतर्गत ‘मत्स्य-६०००’ नावाचे वैज्ञानिक पाणबुडी वाहन तयार केले जात आहे. हे वाहन १२ तासांच्या मोहिमेवर महासागरात ६,००० मीटर खोलीपर्यंत तीन खलाशांना घेऊन जाऊ शकते.

या मोहिमेत खाली उतरण्यासाठी चार तास, प्रत्यक्ष जागेवर खोल समुद्रात संशोधन करण्यासाठी चार तास आणि वर येण्यासाठी चार तास समाविष्ट असतील. या वर्षाच्या सुरुवातीलाच हार्बर वेट टेस्टमध्ये ‘मत्स्य-६०००’च्या क्रिटिकल सिस्टीमची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. याबरोबर आता भारत समुद्राच्या खोलवर प्रयोगशाळा तयार करण्याचीदेखील योजना आखत आहे. भारताची ही मोहीम काय आहे? या मोहिमेचे उद्दिष्ट काय आहे? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

काय आहे भारताची ही मोहीम?

या वर्षाच्या सुरुवातीला ‘मत्स्य’च्या मोहिमे अंतर्गत हार्बर वेट टेस्टमध्ये ‘मत्स्य-६०००’च्या क्रिटिकल सिस्टीमची यशस्वी चाचणी करण्यात आली. २०२६ च्या मध्यापर्यंत ‘मत्स्य ६०००’ ही पाणबुडी माणसांसह समुद्रात उतरणार असा अंदाज आहे. डीप ओशन मिशनचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत ‘स्वयंचलित पाण्याखालील वाहने’आणि रोबोटिक प्रणालींचा विकासदेखील केला जात आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था महासागरात ६,००० मीटर खोलीवर प्रयोगशाळा स्थापित करण्याच्या भविष्यातील संकल्पनेवरदेखील विचार करीत आहे. पाण्याखालील या प्रयोगशाळेची संकल्पना वैज्ञानिक आणि शोधक दृष्टिकोनाचा एक भाग आहे.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या डीप ओशन टेक्नॉलॉजीज ग्रुपचे संचालक डॉक्टर एन. वेदाचलम यांनी ‘WION’ या वृत्तसंस्थेला सांगितले, “गॅस हायड्रेट्स, पॉलिमॅटेलिक नॉड्यूल्स व कोबाल्ट-समृद्ध फेरोमँगनीज क्रस्ट्स यांसारखी संभाव्य संसाधने समजून घेणे, हवामान बदल व महासागर आम्लीकरण यांचे निरीक्षण करणे यांसाठी समुद्रातील संशोधन आवश्यक आहे. तसेच भूगर्भीय हालचाली समजून घेणे, पृथ्वीवरील जीवनाच्या उत्क्रांतीबद्दल अधिक जाणून घेणे, मोठ्या प्रमाणात अस्पष्ट जैविक विविधतेचा शोध घेणे व त्यांचे संरक्षण करणे आणि पृथ्वीवर हवामान स्थिर करणाऱ्या महासागर अभिसरण प्रक्रिया समजून घेणे यांसाठी खोल महासागरात संशोधन करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खोल महासागराच्या संशोधनातून परिणाम मिळण्यास खूप वेळ लागतो. त्यामुळे खोल महासागरातील प्रयोगशाळेत माणसांची उपस्थिती असल्यास संशोधन क्षेत्रांमध्ये अधिक प्रगती होऊ शकेल. पाण्याखालील या वेधशाळांमध्ये माणसांची उपस्थिती महत्त्वाची आहे. कारण- मानवी उपस्थितीमुळे प्रत्यक्ष वेळी निर्णय घेणे, जागेवरच प्रयोग करणे शक्य होते. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात अंतराळवीर ज्या पद्धतीने प्रयोग करतात अगदी तसेच हे संशोधन आहे. तेथे पृथ्वीपासून ४०० किलोमीटरवर प्रदक्षिणा करणारी एक प्रयोगशाळा आहे. ‘समुद्रयान’ मोहिमेतून भारताला जे शिकायला मिळेल आणि जे तांत्रिक विकास होतील, त्याचा विस्तार करणे ही या पाण्याखालील प्रयोगशाळेमागील संकल्पना आहे.

पाण्याखालील प्रयोगशाळेबद्दल तज्ज्ञांचे मत काय?

पाण्याखालील प्रयोगशाळेसारखी सुविधा उभारण्यासाठी भारताला ‘समुद्रयान’ मोहिमेचा भाग असलेल्या तंत्रज्ञानाची क्षमता अधिक वाढवावी लागेल. तज्ज्ञांनी निदर्शनास आणून दिले आहे की, पाण्याखालील प्रयोगशाळेसाठी ऊर्जेचा व ऑक्सिजनचा पुरवठा, कार्बन डाय-ऑक्साइड काढण्याची यंत्रणा, मजबूत रचना व त्यातून पाहता येईल असे पारदर्शक भाग, खलाशांना प्रयोगशाळेत नेण्यासाठी व परत आणण्यासाठी खोल समुद्रातील पाणबुड्यांसाठी सुरक्षित डॉकिंग व अन-डॉकिंग सुविधा, तसेच पाण्याखालील रोबोटिक वाहने प्रयोगशाळेतून कार्यान्वित करण्याची क्षमता इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत.

या प्रयोगशाळेत दीर्घकाळ राहणाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित मानवी घटकांचाही योग्य विचार करणे आवश्यक आहे. डॉ. वेदाचलम यांनी पुढे सांगितले की, राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेच्या डीप ओशन टेक्नॉलॉजी आणि डॉकिंग’ क्षमता, रोबोटिक प्रणालीसह स्वयंचलित पाण्याखालील वाहने विकसित करीत आहेत. त्यामुळे पाण्याखालील प्रयोगशाळेत ही वाहने म्हणून कार्य करू शकतील. त्यामुळे शास्त्रज्ञांना पाण्याखालील प्रयोगशाळेच्या आजूबाजूला अनेक किलोमीटरपर्यंत प्रयोग करणे शक्य होईल.

मोहिमेसमोरील आव्हाने कोणती?

६,००० मीटरच्या खोलीवरील वातावरणात अत्यंत दबाव, कमी तापमान, संदेशवहनाचा अभाव व भौगोलिक स्थान निश्चित करणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभाव यांमुळे अनेक आव्हाने आहेत. भारताला अशी पाण्याखालील प्रयोगशाळा तयार करावी लागेल, जी शास्त्रज्ञ आणि त्यांची उपकरणे आत असतानाही अशा अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देऊ शकेल. विकास प्रक्रियेचा भाग म्हणून अशा प्रयोगशाळेची आधी सुरक्षित खोलीवर हळूहळू चाचणी केली जाईल.

डॉ. वेदाचलम म्हणाले की, अशा पाण्याखालील प्रयोगशाळेच्या संभाव्य ठिकाणांचा उपयोग अभ्यासाच्या अद्वितीय क्षेत्रांमध्ये केला जाऊ शकतो. नैसर्गिक वायूचा स्रोत असलेल्या गॅस हायड्रेट्सचा अभ्यास करण्यासाठी ३,००० मीटर खोलीवर आणि मध्य भारतीय महासागरात ५,५०० मीटर पाण्याच्या खोलीवर पॉलिमॅटेलिक नॉड्यूल्सचा अभ्यास करण्यासाठी, ही प्रयोगशाळा महत्त्वाची ठरेल.