जूनमध्ये दडी मारून बसलेल्या पावसाने संपूर्ण जुलै महिन्यात दोन टोकाची रूपं दाखवली. एका बाजूला देशातील अनेक भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली; तर दुसरीकडे काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मान्सूनच्या मोसमाचा पहिला टप्पा (अर्धा प्रवास) आता जवळपास पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या पहिल्या सहामाहीत देशात एकूण किती पाऊस झाला? जुलैमध्ये अचानक ओले आणि कोरडे कालखंड का निर्माण झाले? तसेच कोणकोणत्या राज्यांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली? त्याविषयीचा हा आढावा…
जुलैमध्ये हवामानात कसा बदल झाला?
यंदा मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात देशातील हवामानात अनेक मोठे बदल दिसून आले. मौसमी वाऱ्यांच्या संथ गतीमुळे संपूर्ण जूनमध्ये पावसाची मोठी तूट निर्माण झाली होती. त्यामुळे जुलै महिन्याची सुरुवात दमदार पावसाने होईल, अशी अनेकांना आशा होती. त्यातच पेरण्या रडखडून पडल्याने शेतकऱ्यांचे लक्षही फक्त मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे होते. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही तब्बल ३५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. परिणामी काही भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यानंतर मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. अखेर ९ जुलैपर्यंत देशातील बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आणि अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जेव्हा गरम हवा तापून प्रसरण पावते आणि वातावरणात वरच्या दिशेने जाते, तेव्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या स्थितीमुळे हवामानात बदल होऊन जोरदार वारे वाहतात आणि ढगांची निर्मिती होऊन मुसळधार पावसाला सुरुवात होते. ढगांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त झाल्याने मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट होऊ शकतो. कमी दाब क्षेत्र जर समुद्रावर असेल तर पावसाचे प्रमाण जास्त असते. मान्सूनच्या काळात मुख्यत्वे याच प्रणालीमुळे देशभरात पाऊस पडतो.
जुलैमध्ये पावसाची स्थिती कशी होती?
जुलै महिन्यात पावसाचे भौगोलिक आणि वेळेनुसार पडण्याचे प्रमाण खूपच असामान्य राहिले. एकीकडे- गुजरात, सौराष्ट्र, आसाम, ओडिशा आणि जम्मू या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले, तर दुसरीकडे बिहारमध्ये ४२ टक्के, आंध्र प्रदेशात ३५ टक्के, केरळमध्ये ३४ टक्के, कर्नाटकात २४ टक्के, तसेच हरियाणा आणि उत्तर प्रदेशात २७ टक्के पावसाची तूट निर्माण झाली. मात्र, महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसाने सुरुवातीची मोठी तूट बऱ्याच अंशी भरून काढली. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, १ ते २९ जुलै दरम्यान देशात सर्वसाधारण पाऊस नोंदवला गेला, तर १ ते ३० जुलै या कालावधीत पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा १३.९ टक्क्यांनी कमी होते. एखाद्या क्षेत्रातील ३० ते ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणाला दीर्घकालीन सरासरी असे म्हटले जाते. हवामानातील बदलांचे मूल्यांकन करण्यासाठी हा महत्त्वाचा निकष मानला जातो. मान्सूनचा निम्मा हंगाम संपत आला असतानाच या मोसमात पहिल्यांदाच देशातील एकूण पाऊस सरासरीच्या जवळ पोहोचला आहे. १ जूनपासून देशात एकूण ३८९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून तो दीर्घकालीन सरासरीपेक्षा १२.६% कमी आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत देशातील दैनंदिन पर्जन्यमानही सरासरीपेक्षा कमीच राहिल्याचे दिसून येत आहे.
ओले-कोरडे कालखंड का निर्माण झाले?
उत्तर, वायव्य आणि पश्चिम भारतात यंदा ९ जुलैपर्यंत मान्सूनचे पूर्ण आगमन झाले. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्या दमदार पावसामागे ओडिशा किनारपट्टीलगत बंगालच्या उपसागरात तयार झालेले हंगामातील पहिले कमी दाबाचे क्षेत्र कारणीभूत होते. ही प्रणाली काही काळ सक्रिय राहिली आणि तिच्या संथ हालचालींसह अरबी समुद्रातून येणाऱ्या जोरदार मान्सून वाऱ्यांमुळे १ ते ९ जुलैदरम्यान पश्चिम किनारपट्टी, मध्य भारत आणि वायव्य भारतात मुसळधार पाऊस झाला. जुलै महिन्यातील जवळपास सर्वच पावसाच्या घटना विविध सक्रिय हवामान प्रणालींच्या एकत्रित परिणामाशी संबंधित होत्या. या महिन्यात चार कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्यापैकी दोन प्रणाली अधिकच तीव्र झाल्यामुळे ओडिशा ते गुजरातदरम्यानचा मध्य भारतातील विस्तीर्ण पट्ट्यात अतिमुसळधार पाऊस झाला. या दोन कमी दाबाच्या प्रणालींची संथ गतीही सलग पावसाचे एक प्रमुख कारण ठरली. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, जुलै महिन्यात तब्बल २४ दिवस देशावर कमी दाबाच्या प्रणालींचा प्रभाव होता. साधारणपणे जुलैमध्ये हा कालावधी १३.५ दिवसांचा असतो. २०१७ नंतर जुलै महिन्यात कमी दाबाचा प्रभाव सर्वाधिक दिवस राहण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
कोणकोणत्या भागांत पावसाने पाठ फिरवली?
पाकिस्तानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच ‘मान्सून ट्रफ’ जुलैच्या सुरुवातीला अनुकूल स्थितीत होता. या परिस्थितीमुळे पावसाची तीव्रता वाढली आणि जुलैच्या सुरुवातीस तसेच महिन्याच्या उत्तरार्धातही मान्सून सक्रिय राहण्यास मदत झाली. मात्र, महिन्यातील बहुतांश दिवस दक्षिण द्वीपकल्पीय भारत आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. या काळात तापमानातही लक्षणीय वाढ झाली. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट अनुभवायला मिळाली, जी जुलै महिन्यासाठी तुलनेने दुर्मीळ मानली जाते. एकूणच, यंदाचा जुलै महिना हवामानातील टोकाच्या परिस्थितीचा साक्षीदार ठरला. गुजरात, आसाम, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या, तर दुसरीकडे काही भागांत कमी पावसामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली. विशेष म्हणजे, सरासरीपेक्षा कमी पावसाचा थेट परिणाम तापमानावर दिसून आला. त्यामुळे दक्षिण द्वीपकल्पीय भारतासाठी जुलै २०२६ हा किमान तापमानाच्या दृष्टीने आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण, तर कमाल तापमानाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उष्ण जुलै महिना ठरल्याचे नोंदविण्यात आले.
जुलैमधील अतिवृष्टीमागील प्रमुख कारण काय?
यंदाच्या जुलै महिन्यात देशातील अनेक भागांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उमरगाम येथे अवघ्या २४ तासांत १,०६७ मिमी पावसाची नोंद झाली. हा देशाच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक एकदिवसीय पर्जन्यमानाचा विक्रम ठरला. यापूर्वी मेघालयातील सोहरा (चेरापुंजी) येथे १६ जून १९९५ रोजी १,५६३.३ मिमी, तर लक्षद्वीपमधील अमिनीदिवी येथे ६ मे २००४ रोजी १,१६८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. भारतीय हवामान विभागाने उमरगाममधील या पावसाला अत्यंत अपवादात्मक मुसळधार पाऊस असे संबोधले आहे. एखाद्या ठिकाणी २४ तासांत २१० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास किंवा विक्रमी पर्जन्यमानाच्या जवळपास नोंद झाली तर अशा पावसाला ही श्रेणी दिली जाते. याबाबत भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना ‘मेसो-स्केल’ हवामान प्रणालींशी संबंधित असतात. साधारणपणे स्थानिक हवामान प्रणाली, जमिनीची रचना, पाण्याचे साठे आणि ढगांचा आपसातील संपर्क या सर्वांच्या एकत्रित प्रभावामुळे असा पाऊस पडतो. अभ्यास दर्शवतो की, दरवर्षी अतिवृष्टीच्या घटना घडतातच; परंतु कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यावर अशा पावसामध्ये १० टक्क्यांनी वाढ होते.
कोणकोणत्या भागांत विक्रमी पाऊस झाला?
जुलै महिन्यात गुजरात, ओडिशा आणि महाराष्ट्र या राज्यांत सर्वाधिक ‘अपवादात्मक’ अतिवृष्टीच्या घटना नोंदवल्या गेल्या. त्यापाठोपाठ छत्तीसगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम आणि मेघालय या राज्यांचा क्रमांक लागतो. संपूर्ण जुलै महिन्यातील किमान २४ दिवस देशातील एक किंवा अधिक ठिकाणी अशा प्रकारच्या अतिवृष्टीची नोंद झाली. या विक्रमी पावसाची तीव्रता लक्षात यावी म्हणून काही तुलनात्मक आकडेवारीही समोर आली आहे. चंदीगडमध्ये वर्षभरात सरासरी १,०७० मिमी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी या भागातील उमरगाममध्ये अवघ्या २४ तासांत १,०६७ मिमी पावसाची नोंद झाली. अमृतसरचा वार्षिक पाऊस ७२४ मिमी आहे; तर अहमदाबादमध्ये २७ जुलै रोजी एकाच दिवसात ७२० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय, महाबळेश्वरमध्ये ६ जुलै रोजी एका दिवसातच त्याच्या वार्षिक सरासरी पावसाच्या सुमारे दहाव्या भागाइतका पाऊस झाला, तर गुजरातमधील कपराडा येथे एका दिवसात ४२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली, जो राजस्थानातील जोधपूरच्या वार्षिक सरासरी ४११ मिमी पावसापेक्षाही अधिक आहे. ही आकडेवारी जुलै महिन्यात देशाच्या विविध भागांमध्ये मान्सूनने किती तीव्र आणि विक्रमी स्वरूप धारण केले होते, याचे चित्र समोर आणते.
