Death Anniversary of Indira Gandhi राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’…  (सुधारित आवृत्ती- २०२३) या आत्मचरित्राच्या पृष्ठक्रमांक ४७-वर ‘व्यापून राहिली अस्वस्थता’ या प्रकरणात  “खुद्द विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयींनीसुद्धा इंदिराजींना ‘दुर्गा’ म्हणून गौरवलं होतं”, असा उल्लेख केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी, इंदिरा गांधींची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली. आज या घटनेला ३९ वर्षे झाली. इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्या असल्या तरी त्यांच्या कर्तृत्त्वाचा सन्मान हा तत्कालीन विरोधी पक्षाने देखील केला होता. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून गाजलेल्या इंदिरा गांधी या त्यांच्या चातुर्यासाठी, मुत्सद्देगिरीसाठी तसेच पराक्रमासाठी प्रसिद्ध होत्या. असे असले तरी सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर विरोधकांकडून ‘गुंगी गुडिया’ म्हणून टीका करण्यात आली होती. १९७१ साली भारत- पाकिस्तान युद्धात इंदिरा गांधींनी दाखविलेल्या धडाडीच्या नेतृत्त्वामुळे विरोधकांकडून त्यांच्या कार्याचा गौरव ‘शत्रू संहारक दुर्गा’ अशी उपमा देवून करण्यात आला होता. तत्कालीन वृत्तपत्रांत याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. विशेष म्हणजे इंदिरा गांधींना तत्कालीन ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी गुंगी गुडिया म्हटले होते तर ..प्रचलित संदर्भानुसार अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र ‘दुर्गेचा अवतार’ म्हणून प्रशंसा केली होती. परंतु अटलबिहारी वाजपेयी यांनी खरंच इंदिराजींना ‘दुर्गेचा अवतार म्हटले होते का? आणि त्यावरून नेमका वाद काय आहे? हे जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे. 

गुंगी गुडिया ते आयर्न वुमन

जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे लाल बहादूर शास्त्रीजींच्या अनपेक्षित निधनानंतर, २४ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला, परंतु तोपर्यंत इंदिरा गांधी यांचे विशेष असे योगदान कधीही समोर आलेले नव्हते, वास्तविक त्या काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या आणि लाल बहादूर शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळातील एक होत्या. किंबहुना राजकीय वर्तुळात लाजाळू अशीच त्यांची प्रतिमा होती, याचाच उपयोग त्यांना मोरारजी देसाई यांच्या विरोधात पक्षातील वरिष्ठांचा पाठिंबा मिळण्यास झाला, असे राजकीय विश्लेषक मानतात. राम मनोहर लोहिया हे समाजवादी नेते होते, त्यांनी इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदी बढतीची बातमी ऐकून त्यांना ‘गुंगी गुडिया’ (मुकी बाहुली) म्हणून तुच्छतेने संबोधले होते. दुर्दैवाने लोहिया यांचे १९६७ मध्ये वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले, त्यामुळे इंदिराजींचा पुढील कार्यकाळ ते पाहू शकले नाहीत. 

अधिक वाचा: इस्रायल- हमास युद्ध: इस्रायलच्या राष्ट्रध्वजावर ‘हे’ चिन्ह आले कुठून?

इंदिरा गांधी या भारताने पाहिलेल्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधानांपैकी एक ठरल्या आणि आधुनिक काळात त्यांना “आयर्न वुमन” (लोहासारखी कठीण स्त्री) म्हणून गौरवले गेले. याच टीकेचे वर्णन पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींच्या आत्मचरित्रात केले आहे…. , ‘एवढी वर्षं इंदिरा मागं मागं राहिली होती. आता सारं जग आणि भारतही तिचा कस पाहत होता. फारसं प्रशासकीय कौशल्य नसलेली एक महिला पंतप्रधान प्रचंड प्रश्न कसे हाताळणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं ” .. सुरुवातीच्या कालखंडात “आपल्या मंत्रिमंडळात फारसा बदल करण्यास इंदिरेला वाव नव्हता.” .. “तिनं पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेताच लालबहादूर शास्त्रीचें प्रमुख सचिव एल. के. झा यांनी आपला राजीनामा देवू केला. पुढील निवडणुकीपर्यंत तुम्हीच काम पहा, असं इंदिरेनं त्यांना सांगितलं”… काही वर्षांनंतर त्या काळाबद्दल बोलताना एल. के. झा म्हणाले, “सुरुवातीला इंदिरा गांधींना मुळीच आत्मविश्वास नव्हता. संसद सदस्य म्हणून त्या अकार्यक्षम होत्या. त्या आपलं भाषण लिहून काढीत, ते काळजीपूर्वक वाचून ठेवीत. प्रत्येक शब्दाचा अभ्यास करीत; परंतु भाषण करताना मध्येच कोणीतरी मुद्दाम व्यत्यय आणून त्यांना प्रश्न विचारी.. या व्यत्ययानंतर त्या पुन्हा भाषण पुढे चालू करू शकतात की नाही, याचीही चाचणी घेण्याचा त्यामागे हेतू असे. त्यामुळे त्यांची पंचाईत होई. तत्काळ उत्तर देण्याचा गुण, हजरजबाबीपणा त्यांच्यात नसल्यानं डॉ. राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींचं वर्णन ‘गुंगी गुडिया’ असं केलं होतं.” (इंदिरा गांधी: लेखिका पुपुल जयकर, अनुवाद: अशोक जैन, पृष्ठ क्रमांक: १५५-१५९, आवृत्ती आठवी, फेब्रुवारी २०२०)

नेमका वाद काय? 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल (२०१८) शोक व्यक्त करताना, त्यावेळेस राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी विरोधी पक्षाचे कौतुक करण्याच्या वाजपेयींच्या क्षमतेबद्दल कौतुक केले. त्यांच्याबद्दल माझ्या खूप आनंदी आठवणी आहेत आणि त्यांचे निधन हे माझे वैयक्तिक नुकसान आहे, असे सांगून आझाद यांनी असे नमूद केले की, १९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर वाजपेयींनी इंदिरा गांधींना ‘दुर्गा’ म्हणून संबोधले होते. यानंतर समाजातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी अटलजींच्या या वैशिष्ट्याचे वर्णन करताना अटलजींनी इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’ म्हटल्याचे नमूद केले. यानंतर वेगवेगळ्या माध्यमांवर खरं काय? खोटं काय? यावर चर्चा घडून आली. परंतु हा वाद नवीन नाही. अनेक दशकांपासून सुरु आहे. त्यानंतरही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, शत्रुघ्न सिन्हा यांनी याचीच पुनरावृत्ती केल्याने वाद सुरु झाला होता. यामागे मुख्य कारण हे वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या होत्या,  असे सांगण्यात येते. 

अधिक वाचा: ‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’!

यावर वाजपेयी काय म्हणाले?

बांगलादेश युद्ध संपले तेव्हा वृत्तपत्रांमध्ये छापून आले होते, ‘वाजपेयींनी संसदेत इंदिरा गांधींची “दुर्गा’ म्हणून स्तुती केली. परंतु इंडिया टीव्हीवरील ‘आप की अदालत’मध्ये वाजपेयींनी या गोष्टीचे खंडण केले होते. रजत शर्मा यांनी इंदिरा गांधींना ‘दुर्गा’ म्हणून संबोधले होते का?, असे विचारले असता वाजपेयी म्हणाले, मी कधीच असे म्हटले नव्हते, प्रेसला फक्त तसे छापायचे होते. वाजपेयी पुढे म्हणाले, “मी कधीच इंदिरा गांधींचा उल्लेख दुर्गा असा केला नाही. पण असे काहीतरी छापण्याचे प्रेसने ठरविले होते. मी त्यांना कधीच दुर्गा म्हटले नाही, असे आजवर अनेकदा वारंवार सांगितले आहे. पण मी असच म्हटलं हा प्रेसचा आग्रह आहे, त्यानंतर यावर बरेच संशोधन झाले. पुपुल जयकर या इंदिरा गांधींच्या जीवनावर एक पुस्तक लिहीत होत्या त्यांनी मला विचारले, मी हे बोललो का?, मी म्हणालो नाही, मी कधीच हे केले नाही. त्यानंतर पुपुल जयकर यांनी सर्व वाचनालयातील सर्व पुस्तके पालथी घातली, मी त्यांना दुर्गा म्हटले आहे असे सांगणारा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही. परंतु दुर्गा संदर्भ कधीच माझी पाठ सोडू शकला नाही. आज तुम्ही मला विचारात आहात. …असे वाजपेयी म्हणाले होते. 

पुपुल जयकर यांनी काय लिहिले? मखमल नव्हे, पोलाद !

७० च्या दशकात पूर्व पाकिस्तानातील लोकांमध्ये पाकिस्तानच्या सत्ताधारकांविरुद्ध खदखद होती. त्याच वेळी पूर्व पाकिस्तानात शेख मुजिबूर रहमान यांच्या नेतृत्त्वाखाली अवामी लीगनं ९९ टक्के जागा जिंकल्या आणि नॅशनल असेम्ब्लीत बहुमत मिळवलं. शेख मुजिबूर रहमान यांनी पंतप्रधान पदावर आपला दावा सांगितला. परंतु  तत्कालीन सत्ताधाऱ्यांना हे मान्य नव्हते. याह्याखान, लष्कर, नोकरशाही यांनी पूर्व पाकिस्तानमधील लोकांचा हक्क मानण्यास नकार दिला. पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तानचे नेते झुल्फिकार अली भुत्तो यांनीही पूर्व बंगालला सत्ता देण्यास नकार दिला. याचीच परिणती पूर्व आणि पाकिस्तान हा संघर्ष अटळ होता. २५ मार्च रोजी कसलीही पूर्व सूचना न देता, पश्चिम पाकिस्तानचे ४० हजार सैनिक पूर्व पाकिस्तानात दाखल झाले. पूर्व पाकिस्तानमधील बंड चिरडून टाकण्यासाठी पूर्व पाकिस्तानमधील हिंदू आणि मुस्लिम लेखक, कलावंत, तत्त्वज्ञ, विचारवंत, विद्यार्थी-नेते, प्राध्यापक यांची निर्घृण कत्तल करण्यात आली. जवळपास ३० लाख लोकांना ठार करण्यात आले, असा अंदाज अमेरिकेकडून व्यक्त करण्यात आला होता. छळ, बलात्कार, खून यांच्या कथांनी वृत्तपत्रांची पानेच्या पाने भरत होती. निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतात येत होते, यावर इंदिरा गांधी यांनी लोंढे थोपवलेच पाहिजे असे सांगितले, त्यासाठी पूर्व पाकिस्तानात घुसून त्यांना थांबवा, युद्ध करावं लागलं तरी माझी हरकत नाही,  असे सांगितले होते. 

अधिक वाचा: Killers of the Flower Moon: रूपेरी पडद्यावर आलेले ‘अमेरिकन- इंडियन्स’च्या हत्याकांडामागचे गूढ आहे तरी काय?

“ ६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्य ढाक्क्याच्या दिशेनं सरकू लागलं, तेंव्हा इंदिरेनं संसदेत निवेदन केलं. भारत बांगला देशाला मान्यता देत असल्याचं तिनं जाहीर केलं. सर्व पक्षांनी तिला जोरदार पाठिंबा दिला. तिच्या नेतृत्वाखाली पूर्ण ऐक्य राखण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. “याह्याखान स्वतःला जर जनरल समजत असतील, तर इंदिरादेखील देशातील केवळ मुलायम मखमल नसून, त्यातील पोलाद व ग्रॅनाईट आहे,” असं हे नेते म्हणाले. त्यांनी दुष्टांचा संहार करणाऱ्या ‘दुर्गा’ देवीशी तिची तुलना केली….  जनरल ए.ए. के. नियाझी यांच्या नेतृत्ताखाली, पूर्व बंगालमधील पाकिस्तानी फौजांनी भारताचे लेफ्टनंन जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यापुढे ढाक्का इथं १६ डिसेंबर १९७१ रोजी दुपारी ४.३० वाजता शरणागती पत्करली. इंदिरा गांधी यांना कमांडर इन चीफ एस.एच. एफ. जे. माणेकशॉ यांनी फोनवरून पाकिस्तानच्या शरणागतीचे वृत्त दिले. त्या वेळी मी (पुपुल जयकर) लोकसभेच्या गॅलरीत बसले होते. सायंकाळी ५.३० च्या सुमारास इंदिरा सभागृहात आली. “पाकिस्तानी फौजा शरण आल्या असून डाक्का ही स्वतंत्र राजधानी झाली आहे,” अशी घोषणा तिनं केली. तिच्या घोषणेचं सदस्यांनी उभं राहून अत्यानंदानं स्वागत केलं. तिचा ‘दुर्गा’ म्हणून गौरव केला. काँग्रेस पक्षाच्या, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी तिच्या विजयाबद्दल प्रशंसा करणारी भाषणं केली (इंदिरा गांधी: लेखिका पुपुल जयकर, पृष्ठ क्रं. १८८-१९०, १९९-२००, २०३-२०४). एकूणच पुपुल जयकर यांच्या पुस्तकात त्यांनी संसदीय सदस्यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हटल्याचा उल्लेख केला आहे, परंतु ते अटल बिहारी वाजपेयी होते, असा संदर्भ त्या कुठेही देत नाही. किंबहुना कॅथरीन फ्रँक यांच्या इंदिरा: द लाईफ ऑफ इंदिरा नेहरू (२००१) या पुस्तकात या प्रसंगाचे वर्णन करताना त्या नमूद करतात, ‘युद्ध संपले, इंदिरा त्या युद्धाची नायिका ठरली होती. नेहरू किंवा शास्त्री या दोघांनाही जे साध्य करता आले नाही ते तिने साध्य केले: ते म्हणजे ‘लष्करी विजय’. इंदिराजी आता देवासारख्या उंचीवर पोहचल्या होत्या. त्यांची संसदेत एक नवीन दुर्गा, युद्धाची हिंदू देवी म्हणून प्रशंसा केली गेली आणि शक्तीशी तुलना केली गेली, जी स्त्री ऊर्जा आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करते. परदेशी वृत्तपत्रांनीही तिला भारताची नवीन सम्राज्ञी म्हणून भव्य दृष्टीकोनातून पाहिले’.  १९७१ सालच्या अमेरिकन गॅलप पोलमध्ये इंदिराजींना जगातील सर्वात प्रशंसनीय व्यक्ती म्हणून दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे इंदिरा गांधी यांचा गौरव उल्लेख दुर्गा म्हणून कुणी केला याचे उत्तर आजही अनुत्तरित आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indira gandhi gungi gudiya to durga did bjp atal bihari vajapeyi really say durga with reference to ncp leader sharad pawar what exactly is the controversy svs
Show comments