-ज्ञानेश भुरे

फुटबॉलच्या सामन्यांदरम्यान किंवा नंतर स्टेडियममध्ये दुर्घटना घडल्याचे प्रकार दुर्मीळ असले, तरी ठळकपणे नोंदवावे असे आहेत. इंडोनेशियात स्थानिक स्पर्धेदरम्यान घडलेली घटना हे आणखी एक दुर्दैवी उदाहरण. अशा घटनांची उत्पत्ती अनेकदा चाहत्यांच्या हिंसाचाराने आणि क्रोधाने होते आणि पोलिसांच्या कारवाईमुळे त्याची तीव्रता कमी होण्यापेक्षा वाढते. भेदरलेले चाहते घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा काही वेळा चेंगराचेंगरीत मनुष्यहानी होते. अशाच काही घटनांचा आढावा…

इंडोनेशियातील घटना कशी घडली?

इंडेनेशियातील अरेमा एफसी संघ स्थानिक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. त्या संघाचा पराभव झाल्याने संतप्त चाहते मोठ्या संख्येने मैदानावर उतरले. मुळात स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षकांना सोडले गेले होते. प्रेक्षकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यावर जमाव बिथरला आणि वाट मिळेल तसा धावू लागला. या सगळ्यात चेंगराचेंगरी झाली. शिवाय मैदानाबाबेर जाणारे बहुतेक दरवाजे बंद होते. ते उघडण्याची संधीच संयोजकांना मिळाली नाही. अनेकजण अश्रुधुरातील रसायनामुळे तात्पुरते, अंशतः अंध झाल्यामुळे अडखळून पडत होते. त्यामुळेही गोंधळ उडाला.

फुटबॉल विश्वातील दुसरी सर्वांत भीषण दुर्घटना…

फुटबॉल सामन्यांसाठी मैदानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या मालिकेतील ही दुसरी सर्वांत मोठी भीषण दुर्घटना ठरली. आजवरची सर्वांत भीषण घटना १९६४ मध्ये पेरू येथे घडली. ऑलिम्पिक पात्रता फेरीअंतर्गत लिमा येथे झालेल्या अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात पंचांनी पेरूचा एक गोल अपात्र ठरवला. याचा निषेध करण्यासाठी प्रथम दोन चाहते मैदानावर धावले. त्यांना अडवताना पोलिसांकडून या चाहत्यांना मारहाण झाली. त्यामुळे पॅव्हेलियनमधील चाहते भडकले. बघता-बघता छोट्याशा प्रसंगाने दंगलीचे स्वरूप धारण केले आणि ३००हून अधिक चाहत्यांनी प्राण गमवाले. सामन्यासाठी ५३ हजार प्रेक्षक उपस्थित होते.

१९८२मध्ये रशियात असाच प्रसंग, पण अहवाल अद्याप गुप्तच…

रशियात २० ऑक्टोबर १९८२ रोजी पाहुण्या नेदरलॅंडसचा हार्लेम संघ आणि मॉस्कोचा स्पार्टेक संघ यांच्यात झालेल्या युएफा स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व सामन्यात असाच गोंधळ उडाला. या सामन्यासाठी १५ हजार चाहते उपस्थित होते. स्टेडियमचा तीन चतुर्थांश भाग बर्फाने आच्छादलेला होता. त्यामुळे चाहते एकाच विभागात दाटीवाटीने बसले होते. स्पार्टेकने उशिरा गोल केल्याने चाहते संतापले आणि त्यांनी मैदानाकडे धाव घेतली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यातून वाचण्यासाठी पळापळ झाली आणि चेंगराचेंगरीत ६४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, चौकशीचा अहवाल अद्यापपर्यंत गुप्तच राहिला. त्यामुळे मृतांचा खरा आकडा कधीच समोर आला नाही. या घटनेत किमान ३४० जणांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती.

एफए चषक अंतिम सामन्यातही अशीच चेंगराचेंगरी..

एफए चषक या इंग्लंडमध्ये स्पर्धेअंतर्गत १९८९मध्ये लिव्हरपूल आणि नॉटिंगहॅम फॉरेस्ट यांच्यातील सामन्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ९७ चाहत्यांनी जीव गमावला. सुरुवातीला यात लिव्हरपूलच्या चाहत्यांना दोषी धरण्यात आले. सामन्यासाठी लिव्हरपूलच्या चाहत्यांना स्वतंत्र जागा देण्यात आली होती. ती जागादेखील पूर्ण भरली होती. त्यात सामना सुरू झाल्यानंतर अधिक प्रेक्षक मैदानावरील कंपुण तोडून त्या स्वतंत्र जागेकडे धावू लागले.  कुंपणावरून उड्या मारताना अनेक प्रेक्षक एकमेकांच्या अंगावर पडले. त्यानंतर झालेल्या प्रदीर्घ चौकशीत पोलिसांच्या चुकीमुळे परिस्थिती चिघळल्याचे समोर आले. पोलिसांनी क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षकांना जाऊ दिल्याचे स्पष्ट झाले. तब्बल दहा वर्षांच्या चौकशीनंतर १९९१मध्ये हे समोर आले. त्यानंतर स्टेडियममध्ये सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये प्रेक्षकांची उभी जागा आणि कुंपण काढून टाकण्यात आले.

घानातही अशाच प्रकारे अश्रुधुराचा वापरामुळे दुर्घटना?

घानामध्ये हार्ट्स ऑफ ओक आणि असांते कोटोको यांच्यात अक्रा स्पोर्ट्स मैदानावर सामना सुरू असताना गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. असांते कोटोकोच्या चाहत्यांनी स्टेडियमध्ये वस्तू फेकायला सुरुवात झाली. त्याचे अनुकरण इतर प्रेक्षकांनी केले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सामन्यासाठी उपस्थित ४० हजार प्रेक्षक त्यामुळे बाहेर पडण्यासाठी धावू लागले. मात्र, स्टेडियमचे दरवाजे कुलुपबंद होते. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १२६ जणांचा जीव गेला.

आणखी असे किती प्रसंग?

मार्च १९८८मध्ये नेपाळमध्ये काठमांडू स्टेडियममध्ये ९० चाहत्यांचा मृत्यू, १९८५मध्ये इंग्लंडमध्ये ब्रॅडफोर्ड आणि लिंकल सिटी सामन्यादरम्यान उभारलेली लाकडी प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने ५० जणांचा मृत्यू, ग्वाटेमाला येथील १९९६च्या घटनेत ८० चाहत्यांचा मृत्यू, २०१२मध्ये इजिप्तमध्ये अल मझरी आ्णि अल अहली या संघांच्या चाहत्यांमध्ये झालेल्या हाणामारीत ७४ जणांनी जीव गमावला. १९८५ मध्ये ब्रुसेल्स येथील हेसेल मैदानावर युव्हेंटसच्या चाहत्यांनी लिव्हरपूलच्या चाहत्यांवर केलेल्या धक्काबुकीनंतरच्या घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला होता.

एकाच स्टेडियमवर दोन प्रसंग…

स्कॉटलंडमध्ये रेंजर्स आणि सेल्टिक संघांदरम्यान झालेल्या सामन्यात आयब्रॉक्स मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीच ६६ जणांचा मृत्यु झाला. एकाच मैदानावर झालेली ही दुसरी घटना. यापूर्वी १९०२मध्ये स्टेडियममधील प्रेक्षक गॅलरी कोसळून २६ जण दगावले होते.

भारतात केव्हा घडला होता असा प्रसंग?

फुटबॉल चाहत्यांच्या चेंगराचेंगरीचा प्रसंग भारतातही होऊन गेला. मोहन बागान आणि ईस्ट बंगाल यांच्यात कलकत्ता साखळी फुटबॉल स्पर्धेत १६ ऑगस्ट १९८० रोजी ईडन गार्डन मैदानाबाहेर चाहत्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले आणि १६ जणांनी जीव गमावला.