इंडोनेशियामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी, सरकारी भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून आंदोलन पेटले आहे, मात्र या आंदोलनामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. इंडोनेशियामधील वर्षावनांना लागणाऱ्या आगी आणि त्यामुळे पसरणाऱ्या विषारी धुरामुळे हवेची गुणवत्ता बिघडली आहे. त्यामुळे काही ठिकाणी शाळाही बंद कराव्या लागत आहेत. या आगींवर नियंत्रण आणावे आणि ही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
इंडोनेशियामध्ये जंगलातील आगींबाबत आंदोलन का सुरू आहे?
इंडोनेशियात वर्षावनांमधील आगी रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत हजारो आंदोलक गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले. या आगींमुळे निर्माण झालेल्या धुराच्या चादरीने संपूर्ण देशाला वेढले असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला. वाढती महागाई व बेरोजगारीविरोधात ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या आंदोलनाची ही एक नवीन मालिका आहे. विनाशकारी शेती पद्धतीमुळेही आगीचे प्रमाण वाढले असून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियान्तो यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करावी आणि विनाशकारी शेती पद्धतींवर बंदी घालावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
आंदोलनाची तीव्रता किती?
प्रबोवो सुबियान्तो यांच्या सत्तेची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी देशातील अनेक शहरांमध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात आंदोलनाला सुरुवात केली. बोर्नियो बेटासह जकार्ता, बांडुंग, योग्याकार्टा, मकासर, पेकनबारू या शहरांमध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात पसरले. विशेषतः बोर्नियो बेटावरच आगींचे प्रमाण सर्वाधिक आहे. ‘मला श्वास घेण्याचा अधिकार आहे’, ‘आगी त्वरित विझवा’ , ‘विनाशकारी शेतीवर बंदी आणा’ असे फलक हाती घेऊन आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बांडुंग आणि जकार्तामध्ये काही ठिकाणी आंदोलने हिंसक झाली. संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली, काही ठिकाणी पेट्रोल बॉम्ब फोडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी नऊ हजारांहून अधिक दंगाविरोधी सुरक्षारक्षक तैनात केले.
‘जंगलातील आगी’ ही समस्या काय आहे?
एप्रिल महिन्यात सुरू होणाऱ्या कोरड्या हंगामात दरवर्षी वणवे किंवा जंगलात आगी लागण्याचे प्रकार घडतात, परंतु या वर्षीची परिस्थिती आतापर्यंतच्या सर्वात भीषण परिस्थितींपैकी एक आहे. एप्रिलच्या आधीच्या, सामान्यतः पावसाळी असणाऱ्या महिन्यांत यंदा पाऊस कमी झाला होता. तज्ज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढ आणि ‘एल निनो’ हवामान बदलामुळे ही स्थिती उद्भवली आहे. इंडोनेशियामध्ये, जळणाऱ्या वर्षावनांच्या धुरामुळे एक वाढते आरोग्य संकट निर्माण झाले आहे, ज्यामुळे शाळा बंद झाल्या आहेत, श्वसनाचे विकार मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत आणि अनेकांना घरातच थांबण्यास भाग पाडले आहे.
जंगलातील आगींना विनाशकारी शेती कशी कारणीभूत आहे?
इंडोनेशियामध्ये शेतीसाठी जंगलांना आगी लावण्याचा प्रकार ज्याला ‘स्लॅश अँड बर्न’ (Slash and Burn) किंवा स्थानिक भाषेत ‘लादांग’ म्हटले जाते. ही एक अत्यंत गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. पाम तेल, लाकूड आणि इतर पिकांच्या लागवडीसाठी जमीन साफ करण्याचा हा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणावर आगी लावल्या जातात. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक देश आहे. नवीन पाम वृक्षांची लागवड करण्यासाठी किंवा जुनी वृक्षवाटिका साफ करण्यासाठी कंपन्या आणि लहान शेतकरी जंगलांना आगी लावतात. आधुनिक यंत्रसामग्री वापरून जमीन साफ करण्यापेक्षा आगी लावून जमीन मोकळी करणे अत्यंत कमी खर्चाचे असल्याने हा पर्याय ते अवलंबतात. इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात ‘पीटलँड’ आहे. पीटलँड म्हणजे कुजलेल्या वनस्पतींपासून बनलेली एक प्रकारची पाणथळ जमीन, जी जंगलाच्या जमिनीखाली खोलवर पसरलेली असते, परंतु आता ती पूर्णपणे कोरडी पडली आहे. ही पाणथळ जमीन काेरडी पडण्याचे कारण म्हणजे शेतीसाठी येथील पाणी मोठ्या प्रमाणावर उपसण्यात आले. त्यामुळे ही जमीन अत्यंत ज्वलनशील बनली असून एकदा आग लागली की ती जमिनीखाली अनेक आठवडे वा महिने धुमसत राहते.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी प्रयत्न काय?
या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याला यश येत नाही. सरकारी सचिव प्रासेत्यो हादी म्हणाले, आम्ही सर्व जण शक्य तेवढे प्रयत्न करत आहोत. आगी विझवण्यासाठी आम्ही जमिनीवरील पथके, विमाने आणि स्वयंसेवकांना तैनात केले आहे. हा धूर शेजारील मलेशिया आणि सिंगापूरमध्येही पसरला असून, त्यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आगीला आटोक्यात आणण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल इंडोनेशियाला जबाबदार धरले आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांनी देशभरात अग्निशमन मोहिमा अधिक बळकट करण्यासाठी अतिरिक्त संसाधने तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्याच वेळी त्यांनी या आगींना ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित करण्यास नकार दिला; जर त्यांनी तसे केले असते, तर त्यांच्या सरकारला अधिक कठोर पावले उचलणे बंधनकारक ठरले असते. त्यांच्या सरकारने ऊर्जा स्वावलंबनासारखी इतर धोरणेही राबवली आहेत, ज्यांचा वर्षावनांवर विपरीत परिणाम होत असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.
या जंगलआगींमुळे आरोग्यावर परिणाम काय?
इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील धुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या सात प्रांतांमध्ये गेल्या दोन महिन्यांत ३,०६,३०९ हून अधिक रहिवासी तीव्र श्वसनविकारांनी ग्रस्त झाले आहेत. यापैकी जवळपास निम्म्या म्हणजेच १,४६,०३७ व्यक्ती १० वर्षांखालील मुले आहेत. काही वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ही आकडेवारी प्रत्यक्षात आजारी पडलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा कमी आहे.बोर्नियो बेटावरील रेडिओलॉजिस्ट सिगिट रियातनो यांच्या नोंदीनुसार, अलीकडच्या काळात, विशेषतः मुले आणि वृद्धांमध्ये, न्यूमोनियाची लक्षणे दर्शवणारे स्कॅन अहवाल अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.
या आगींचा पर्यावरणावरील परिणाम?
इंडोनेशियातील जळणारी वर्षावने हे अस्वस्थ पृथ्वीचे एक लक्षण मानली जातात; हे पर्यावरणाचे असे नुकसान आहे, ज्याची तुलना ॲमेझॉनमधील जंगलतोडीशी केली जाऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात. आगीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राच्या व्याप्तीबाबत अजूनही मतभेद आहेत. जुलै महिन्यात इंडोनेशिया सरकारने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या वर्षी सुमारे ७८० चौरस मैल क्षेत्र जळून खाक झाले आहे, जे न्यूयॉर्क शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. परंतु जगभरातील जंगलतोडीचा मागोवा घेणारे एक खुले व्यासपीठ असलेल्या नुसंतारा ॲटलसच्या अंदाजानुसार, नष्ट झालेल्या जंगलाचे क्षेत्रफळ सुमारे ७,४०० चौरस मैल आहे.
sandeep.nalawade@expressindia.com
