Indus Sarasvati Civilization Nick Collins claim has sparked a global debate among historians regarding ancient Harappan urban planning: भारतीय उपखंडातील सिंधू-सरस्वती (Indus-Sarasvati) संस्कृती ही मेसोपोटेमिया आणि इजिप्तपेक्षाही अधिक विकसित होती, असा खळबळजनक दावा प्रसिद्ध लेखक निक कॉलिन्स यांनी केल्याने जगभरात नवा वाद सुरू झाला आहे. भारतीय उपखंडातील सिंधू-सरस्वती (Indus-Sarasvati/Harappan) संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एक मानली जाते. साधारणपणे इसवी सनपूर्व २६०० ते १९०० हा हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा प्रगत टप्पा मानला जातो. मात्र त्याची सुरुवात इ.स.पूर्व ५००० च्या आसपास झालेली असावी, असे इतिहासकार मानतात.
पहिले प्रगत नागरिकरण?
अलीकडे नवीन संशोधानामध्ये हा कालखंड इसवी सनपूर्व ६००० ते ७००० पर्यंत मागे नेण्याचाही प्रयत्न काही इतिहासकारांनी केला. सध्या प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक Nick Collins यांनी केलेल्या काही दाव्यांमुळे या संस्कृतीबाबत आता नव्याने चर्चा सुरू झाली. त्यांच्या मते, सिंधू- सरस्वती संस्कृती ही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वर्णन केल्यापेक्षा कितीतरी अधिक प्रगत होती आणि तिचे स्थान जगातील पहिले नागरिकरण मानल्या गेलेल्या मेसोपोटेमियापेक्षाही अधिक वरच्या दर्जाचे असल्याचे त्यांनी म्हटल्याने जगभरात नवा वाद सुरू झाला आहे. त्यावर मुख्य प्रवाहातील पुरातत्त्वज्ञ आणि इतिहासकार यांचे मत काय, याचा आढावा…
निक कॉलिन्स यांचा मुख्य दावा काय?
कॉलिन्स यांच्या मते, सिंधू-सरस्वती संस्कृती केवळ विटांची शहरे किंवा व्यापारासाठी प्रसिद्ध नव्हती, तर ती अत्यंत संघटित, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि व्यापक सांस्कृतिक प्रभाव असणारी जगातील सर्वात प्रगत नागरी व्यवस्था होती. त्यांच्या मते त्यांचे शहर नियोजन आधुनिक शहरांनाही लाजवेल इतके विकसित होते. जलव्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन हे त्याकाळातही अतिप्रगत होते. प्रमाणित वजन-माप प्रणाली अत्यंत अचूक होती. लांब पल्ल्याचा व्यापार मेसोपोटेमिया, ओमान, इराण आणि आखाती प्रदेशांपर्यंत पोहोचला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संस्कृतीचा प्रभाव आजही अनेक भारतीय सांस्कृतिक परंपरांमध्येही दिसून येतो.

सिंधू संस्कृतीकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष्य
निक कॉलिन्स यांनी म्हटले आहे की, इतिहासलेखनात मेसोपोटेमिया आणि इजिप्तला अधिक महत्त्व देताना सिंधू संस्कृतीच्या योगदानाकडे मात्र दुर्लक्ष्य करण्यात आले. मात्र मुख्य प्रवाहातील काही पुरातत्त्वज्ञ सिंधू संस्कृतीला जगातील सर्वात प्रगत कांस्ययुगीन नागरी संस्कृतींपैकी एक मानतात, तिची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
१. नियोजित शहरे
मोहेंजोदडो, हडप्पा, धोलावीरा, राखीगढी, लोथल यांसारख्या शहरांमध्ये रस्ते सरळ असून ग्रीड पद्धतीचा वापर करत शहराचे नियोजन करण्यात आले होते. बांधकामासाठी प्रमाणित विटांचा वापर करण्यात आला. स्वतंत्र व स्वयंपूर्ण घरे, विहिरी, सांडपाणी वाहून नेणाऱ्या भूमिगत वाहिन्या यांचे मुबलक पुरावेही आढळतात. संशोधकांच्या मते जगातील सर्वात विकसित नागरी स्वच्छता व्यवस्था सिंधू- सरस्वती संस्कृतीमध्येच अस्तित्त्वात होती.
२. जलव्यवस्थापन
ढोलावीरा येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी विशाल जलाशय, कालवे आणि जलव्यवस्थापनाची गुंतागुंतीची रचना संशोधकांना लक्षात आली. यामुळे कोरड्या प्रदेशातही मोठी नागरी वसाहत टिकवून ठेवणे या संस्कृतीस शक्य झाले.
३. व्यापाराचे जागतिक जाळे
मेसोपोटेमियन नोंदींमध्ये ‘Meluhha’ नावाने उल्लेख आढळतो. अनेक संशोधक Meluhha म्हणजे सिंधू संस्कृतीचा प्रदेश असल्याचे मानतात. इथून निर्यात होत असलेल्या वस्तूंमध्ये कार्नेलियन मणी, हस्तिदंत, तांबे, कापूस आणि मौल्यवान दगड यांचा समावेश होता. तर आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये टिन आणि इतर धातूंचा समावेश होता. या संदर्भातील माहिती असलेला एक शिलालेख थेट मेसोपोटेमियामध्येच सापडला. त्यावरून त्या काळात सागरी व्यापार खूप मोठा आणि प्रगत होता, हे सिद्ध झाले.
४. प्रमाणित अर्थव्यवस्था
सिंधू- सरस्वती संस्कृतीमध्ये जवळपास एकसारखीच वजन प्रणाली, एकाच आकाराच्या स्टँडर्डाइज्ड विटा
आणि शिक्के अस्तित्त्वात होते. प्रगत व्यापारासाठी प्रमाणित व्यवस्था अस्तित्वात असवी लागते. हे सर्व निकष सिंधू संस्कृतीला लागू होतात.
मग वाद नेमका कशावर आहे?
वाद प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे सरस्वती नदी. काही संशोधकांच्या मते ऋग्वेदातील सरस्वती नदी म्हणजेच घग्गर-हाकरा नदी प्रणाली असावी. त्यामुळे ‘Indus Valley Civilization’ ऐवजी ‘Indus-Sarasvati Civilization’ हे नाव वापरण्याचा आग्रह काही विद्वान धरतात.
संस्कृतीचा प्रभाव
कॉलिन्स यांच्यासह काही लेखकांचा दावा आहे की, या संस्कृतीचा नंतरच्या भारतीय संस्कृतीवर सातत्यपूर्ण प्रभाव राहिला. मात्र मुख्य प्रवाहातील संशोधक या प्रश्नावर अजूनही सावध भूमिका घेताना दिसतात. सिंधू संस्कृतीबाबत अजूनही न उलगडलेली कोडी
अ) लिपी- सिंधू संस्कृतीची लिपी आजतागायत वाचता आलेली नाही. सुमारे ४,००० हून अधिक शिक्के मिळाले असले तरी त्यातील चिन्हांचा अर्थ अद्याप उलगडलेला नाही. त्यामुळे तत्कालीन प्रशासन कसे होते आणि राजकीय व्यवस्था कशी होती वा तत्कालीन धर्म काय होता, याच्या माहितीचा उलगडा झालेला नाही.
ब) इजिप्तमध्ये पिरॅमिड आहेत, मेसोपोटेमियामध्ये राजांचे अभिलेख आहेत. परंतु, सिंधू संस्कृतीमध्ये विशाल राजवाडे, भव्य मंदिरे किंवा राजांचे पुतळेही सापडलेले नाहीत. यामुळेच काही संशोधकांच्या मते ही तुलनेने अधिक समतावादी नागरी व्यवस्था असू शकते.
डीएनए संशोधन काय सांगते?
राखीगढी येथील प्राचीन डीएनए अभ्यासातून असे सूचित झाले की, सिंधू संस्कृतीतील रहिवासी हे स्थानिक दक्षिण आशियाई घटकांशी संबंधितच होते आणि तेथील समाज रचना काहीशी गुंतागुंतीची होती. मात्र एका नमुन्यावरून संपूर्ण संस्कृतीबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही, असेही संशोधक स्पष्ट करतात.
मग निक कॉलिन्स यांच्या दाव्यांकडे कसे पाहावे?
कॉलिन्स यांच्या मांडणीमुळे सिंधू संस्कृतीबद्दलची उत्सुकता जगभर वाढली आहे. त्यांनी या संस्कृतीच्या शहरी नियोजन, जलव्यवस्था आणि सागरी व्यापाराच्या नेटवर्कचे महत्त्व अधोरेखित केले आहे. परंतु त्यांनी मांडलेल्या काही व्यापक ऐतिहासिक निष्कर्षांना अद्याप मुख्य प्रवाहातील पुरातत्त्वशास्त्रांनी सार्वत्रिक मान्यता दिलेली नाही. इतिहासातील नवे सिद्धांत स्वीकारताना पुरातत्त्वीय पुरावे, कार्बन डेटिंग, आनुवंशिक संशोधन आणि समकालीन लेखी पुरावे यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक असते. त्यामुळे कॉलिन्स यांच्या मतांकडे अंतिम सत्य म्हणून नव्हे, तर पुढील संशोधनाला चालना देणारी गोष्ट या दृष्टिकोनातून पाहणे अधिक योग्य ठरेल.
काळाच्या पुढे असलेली संस्कृती
सिंधू-सरस्वती संस्कृती ही जगातील सर्वात उल्लेखनीय नागरी संस्कृतींपैकी एक असल्याबद्दल संशोधकांमध्ये व्यापक सहमती आहे. नियोजित शहरे, उत्कृष्ट जलव्यवस्थापन, प्रमाणित मापनपद्धती आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या बाबतीत ती काळाच्याही खूप पुढे होती. मात्र तिचे जागतिक इतिहासातील नेमके स्थान, वैदिक परंपरेशी संबंध, तसेच तिचा पुढील भारतीय संस्कृतीवर झालेला प्रभाव याविषयीचे संशोधन अद्याप सुरू आहे. त्यामुळे नव्या दाव्यांचे स्वागत उत्सुकतेने करण्याबरोबरच शास्त्रीय पडताळणीच्या माध्यमातून गोष्टी सिद्ध करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
संदर्भसूची
- The Ancient Indus: Urbanism, Economy, and Society, Cambridge University Press (2010).
- The Indus Civilization: A Contemporary Perspective, AltaMira Press (2002).
- The Indus Civilization, Cambridge University Press.
- Archaeological Survey of India – Excavation Reports (Dholavira, Lothal, Harappa-related publications).
- UNESCO – Dholavira World Heritage documentation.
- Shinde, V. et al. (2019). An Ancient Harappan Genome Lacks Ancestry from Steppe Pastoralists or Iranian Farmers. Cell, 179(3), 729–735.
- Kenoyer, J. M. (1998). Ancient Cities of the Indus Valley Civilization. Oxford University Press.
- Possehl, G. L. (2008). The Indus Civilization. In Encyclopaedia of Archaeology.
- Wright, R. P. (2010). The Ancient Indus: Urbanism, Economy, and Society. Cambridge University Press.
- Mesopotamian references to Meluhha compiled in studies by Asko Parpola and Gregory Possehl.
