Harappan civilization decline: भारतीय इतिहासात हडप्पा संस्कृतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे; जगातील प्राचीन संस्कृतीपैकी ती आहे. भारतीय इतिहासात या संस्कृतीकडे पहिल्या नागरीकरणाचा मान जातो. त्यामुळेच इतक्या समृद्ध संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला हा अभ्यासकांमध्ये नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. अलीकडेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या संशोधकांनी एक नवे संशोधन सादर केले आहे. आज आपण वातावरणात प्रचंड चढ- उतार पाहतो. वातावरणाच्या या बदलाचा मान्सूनवर होणारा परिणामही अनुभवत आहोत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीच्या (IITM) संशोधकांनी अशाच प्रकारचा बदल आणि त्याचा मान्सूनवर झालेला परिणाम हा हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला होता, असा निष्कर्ष मांडला आहे. तब्बल चार हजार वर्षांपूर्वी भरभराटीस आलेली संस्कृती नष्ट होण्यामागे मान्सूनवर परिणाम करणाऱ्या हवामान घटकांचा मोठाच वाटा असल्याचे त्यांनी नोंदवले आहे. तसेच या संशोधनात दक्षिण भारतातील गुप्तेश्वर आणि कडप्पा येथील गुहांचाही अभ्यास करण्यात आला आहे. पुरातन संस्कृतीच्या अधोगतीमध्ये प्रदीर्घ दुष्काळाने किती महत्त्वाची भूमिका बजावली असावी, यावर संशोधनात प्रकाश टाकण्यात आला आहे.
हवामान घटकांचा परिणाम
क्वार्टरनरी इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात दक्षिण भारतातील गुप्तेश्वर आणि कडप्पा येथील नैसर्गिक गुहांच्या निर्मितीचा अभ्यास किंवा स्पेलिओथेम्सचे विश्लेषण करण्यात आले आहे. संशोधकांनी मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटकांचा शोध घेतला. यामध्ये कमी झालेले सौर विकिरण, एल निनो, इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोनचे (ITCZ) दक्षिणेकडील स्थलांतर आणि हिंद महासागर द्विध्रुवाच्या (IOD) नकारात्मक टप्प्याचा समावेश आहे. एकत्रितपणे, या घटकांनी या प्रदेशावर परिणाम करणाऱ्या गंभीर दुष्काळी परिस्थितीत तीव्र वाढ केल्याचे मानले जाते.
अधिक वाचा: सिंधू लिपी नवीन संशोधनावरून पुन्हा खळबळ का? खरंच आहे का ही लिपी भारतीयांच्या लेखनकलेचा आद्यपुरावा?
प्राचीन अवशेष काय सांगतात?
हडप्पा आणि मोहेंजोदारो ही मुख्य शहरे या संस्कृतीतील आहेत. याशिवाय धोलावीरा, राखीगडी यांसारखी इतर शहरेही भरभराटीस आली होती. भूतकाळातील हवामानावर झालेला फरक समजून घेण्यासाठी संशोधन पथकाने ७,००० वर्ष जुन्या गुहेतील अवशेषांचे निरीक्षण केले. हवामानबदलाचा एखाद्या संस्कृतीच्या तग धरून ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो हे त्यांना या निरीक्षणाअंती आढळून आले. आयआयटीएममधील प्रमुख संशोधक नवीन गांधी यांनी हवामानबदलाचे परिमाण अधोरेखित केले आहे. शिवाय आजच्या मान्सूनवर परिणाम करणारे घटक हजारो वर्षांपूर्वीही संस्कृतीचे भवितव्य घडवत होते असे गांधी यांनी नमूद केले.
ITCZ ची दक्षिणेकडील शिफ्ट
अभ्यासातून असे दिसून आले की, अंदाजे ४,२०० वर्षांपूर्वी ITCZ एक महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली होती. या प्रणालीला “रेन बेल्ट” म्हणून संबोधले जाते. हा बेल्ट दक्षिणेकडे सरकला, परिणामी सिंधू प्रदेशातील पावसात लक्षणीय घट झाली. पूर्व हिंद महासागर थंड करणाऱ्या IOD च्या नकारात्मक टप्प्यासह दक्षिणेकडील या प्रणालीच्या शिफ्टमुळे उपखंडात आर्द्रतेचा येणारा प्रवाह कमी झाला. संशोधकांनी म्हटले आहे की, कमी झालेला सौर किरणोत्सर्गाचा कालावधी आणि एल निनोचा वाढीव प्रभाव या हवामान घटकांच्या एकत्रित परिणामांमुळे सिंधू खोऱ्यात दीर्घकाळ दुष्काळ पडला.
मानवी कृती आणि हवामान बदल
संशोधनात असे उघड झाले आहे की, मानवी कृती आणि हवामान बदल यांच्यातील संबंध महत्त्वाचा आहे. हवामान बदलानुसार त्याकाळी माणसाने आपल्या कृती बदलल्या नाहीत. त्याचा परिणाम वातावरण अधिकच अनियमित होण्यात झाला. हेच त्याकाळच्या कृषी पद्धतींमधून दिसून येते. शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतींचा वापर केल्यामुळे जमीन आणखी कोरडी झाल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. गांधी यांनी सांगितले की, २,८०० वर्षांपूर्वी वाऱ्यावर उडणाऱ्या धूलिकणांचे प्रमाण वाढले, हा पुरावा जमीन दीर्घकाळ कोरडी झाली होती हे दर्शवतो. त्यावेळीच्या कृषी पद्धतींमुळे जमिनीचा पोत बिघडला.
अधिक वाचा: प्राचीन भारताची सिंधू संस्कृती निरक्षर होती का?
हवामान नोंदी म्हणून गुहा निर्मिती
क्वार्टरनरी इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात गुप्तेश्वर आणि कडप्पा गुहांमधील स्पीलोथेम्स- स्टॅलेग्माइट्स आणि इतर गुहेच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले गेले. या नैसर्गिक रचनांनी भूतकाळातील हवामान परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती साठवून ठेवली होती, ती संशोधनात उघड करण्यात संशोधकांना यश आले. त्यामुळे मोठ्या सामाजिक बदलांशी जुळणारे बदल दिसून आले. गांधी म्हणाले की, संशोधनातून सुमारे ४,२०० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीचा ज्यावेळी ऱ्हास होऊ लागला त्यावेळी पर्जन्यमान कमी होऊ लागले होते, हे दर्शवते. सुमारे २,८०० वर्षांपूर्वी वैदिक काळातील असेच हवामानाचे नमुने पाहण्यात आले होते.
कार्यपद्धती
संशोधकांनी ट्रेस एलिमेंटचे परीक्षण , युरेनियम-थोरियम डेटिंग आणि स्थिर समस्थानिक डेटाचा वापर गेल्या ७,००० वर्षांतील हवामानातील परिवर्तनशीलतेचे चित्र उभं करण्यासाठी केला. अभ्यासामध्ये बेरियम/ स्ट्रॉन्टियम गुणोत्तरामध्ये सतत घट होत असल्याचे आढळून आले. यातून प्रादेशिक पाऊस आणि आर्द्रता कमी होती हे समजते. गांधींनी सांगितले की, सौर किरणोत्सर्गातील बदलांचा थेट परिणाम ITCZ (The Intertropical Convergence Zone) च्या हालचालीवर होतो. “जेव्हा ITCZ उत्तरेकडे सरकतो, तेव्हा पाऊस वाढतो. जेव्हा तो दक्षिणेकडे सरकतो तेव्हा त्याचा परिणाम म्हणजे पाऊस कमी होतो. ही हालचाल मुख्यत्वे सौर किरणोत्सर्गातील फरकांवर अवलंबून असते”.
हे संशोधन हवामान बदलाने प्राचीन संस्कृतींवर कसा प्रभाव टाकला आणि वर्तमान काळातील जोखमींचे मूल्यांकन करण्यासाठी भूतकाळातील हवामान पद्धती समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते.