भारताच्या नौदलात ‘आयएनएस अरिदमन’ ही अणुशक्तीवर चालणारी तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (शिप सबमरिन बॅलिस्टिक न्युक्लिअर – एसएसबीएन) दाखल झाली आहे. नौदलाच्या मारक क्षमतेत त्यामुळे मोठी वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या मारक क्षमतेत झालेली ही वाढ निश्चितच महत्त्वाची आहे.
सागरी शक्तीचे अनन्यसाधारण महत्त्व
पश्चिम आशियात होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून सागरी शक्तीचे महत्त्व अधोरेखित झाले असताना भारताने आपल्या सागरी शक्तीला आणखी धार आणली आहे. समुद्रातून अण्वस्त्रे डागू शकणारी ‘आयएनएस अरिदमन’ ही अणुशक्तीवर चालणारी तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) भारताने नौदलात दाखल करून घेतली. अरिहंत वर्गातील ही पाणबुडी असून, चौथ्या पाणबुडीवर काम सुरू आहे. ही पाणबुडी दाखल करताना भारताने ‘आयएनएस तारागिरी’ ही फ्रिगिटही नौदलात दाखल केली.
आण्विक त्रिकुटाला बळ
जमीन, हवा आणि समुद्रातून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता भारताने यापूर्वीच प्राप्त केली आहे. आयएनएस अरिदमन या पाणबुडीमुळे आण्विक त्रिकुटाची क्षमता, प्रतिरोध करण्याची क्षमता आणि एकूणच सागरी लढाऊ क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. ही पाणबुडी नौदलात दाखल करून घेण्याच्या वृत्ताबाबत कुठलेही अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. ‘अरिदमन हे केवळ शब्द नाहीत, तर ती शक्ती आहे,’ या शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ‘एक्स’वर टिप्पणी केली आहे.
‘एसएसबीएन’ प्रकारातील तिसरी पाणबुडी
‘आयएनएस अरिदमन’ नौदलात दाखल झाल्यामुळे ‘एसएसबीएन’ प्रकारातील भारतीय नौदलातील पाणबुड्यांची संख्या आता तीन झाली आहे. देशी बनावटीची ही पाणबुडी आधीच्या दोन पाणबुड्यांच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आहे. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या दोन पाणबुड्यांच्या तुलनेत दीर्घ पल्ल्याची अण्वस्त्रे या पाणबुडीतून डागता येऊ शकतात. पहिल्या दोन पाणबुड्या २०१६ आणि २०२४मध्ये नौदलात दाखल झाल्या.
अरिदमन पाणबुडीची वैशिष्ट्ये
ही पाणबुडी अणुशक्तीवर चालणारी असून, सात हजार टन वजनाची आहे. ‘आयएनएस अरिदमन’ ही पाणबुडी ७५० किलोमीटर लघुपल्ल्याची ‘के-१५’ क्षेपणास्त्रे (एसएलबीएम) आणि साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत अण्वस्त्रांचा मारा करणारी ‘के-४’ ‘एसएलबीएम’ डागू शकेल. आधीच्या दोन पाणबुड्यांच्या तुलनेत दुप्पट क्षेपणास्त्रे डागण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. काही वृत्तांनुसार ही पाणबुडी आठ ‘के-४’ किंवा २४ ‘के-१५’ क्षेपणास्त्रांचा मारा करू शकेल.
देशी बनावटीच्या ‘एसएसएन’साठीही प्रयत्न
अणुशक्तीवर चालणाऱ्या लढाऊ पाणबुड्यांच्या (एसएसएन) निर्मितीसाठीही भारताचे प्रयत्न सुरू आहेत. देशी बनावटीच्या एसएसएन प्रकारातील दोन पाणबुड्यांची निर्मिती करताना, एक पाणबुडी रशियाकडून घेण्याचे नौदलाचे नियोजन आहे. २०२७-२८ पर्यंत ही पाणबुडी भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. भारताच्या स्वतःच्या नौका तयार होईपर्यंत रशियाची पाणबुडी पोकळी भरून काढेल. एसएसबीएन आणि एसएसएन या बाबतीत चीन आपल्यापुढे आहे. चीनकडे ६ ‘एसएसबीएन’ आणि ६ ‘एसएसएन’ आहेत. अमेरिकेकडे सर्वाधिक १४ ‘एसएसबीएन’ आणि ५३ ‘एसएसएन’ आहेत.
‘आयएनएस तारागिरी’ दाखल
‘प्रकल्प १७ ए’ अंतर्गत निलगिरी वर्गातील ‘आयएनएस तारागिरी’ ही स्टेल्थ प्रकारामधील क्षेपणास्त्र फ्रिगिटही नौदलात दाखल झाली. मोठे सागरी युद्ध, चाचेविरोधी मोहिमेसह टेहळणी, नैसर्गिक संकटकाळामध्येही ही युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावू शकते. ६६७० टन वजनाची ही युद्धनौका असून, ‘वॉरशिप डिझाइन ब्यूरो’ने युद्धनौकेची रचना केली असून, ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ने बांधणी केली आहे. ७५ टक्के देशी साहित्याचा वापर नौकेत केला आहे.
भारताचे आण्विक त्रिकूट
भारताकडे जमिनीवरून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता असलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत. पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत ही क्षेपणास्त्रे अण्वस्त्रे नेऊ शकतात. यात प्रामुख्याने अग्नी क्षेपणास्त्रांचा समावेश होतो. हवेतून जमिनीवर, अर्थात लढाऊ विमानांतूनही ते डागता येते. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा यात समावेश होतो. हवेतून क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमताही आपण अधिक आधुनिक करीत आहोत. समुद्रातूनही के-मालिकेतील क्षेपणास्त्रांनी अण्वस्त्रे डागता येतात. के-१५ क्षेपणास्त्रे अरिहंत पाणबुडीतून डागण्यासाठी सज्ज आहेत. परंतु, त्यांची क्षमता ७५० किलोमीटरपर्यंतच होती. के-४ क्षेपणास्त्रे ३५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात. के-५ आणि के-६ क्षेपणास्त्रांवरही काम सुरू असून, त्यांची मारा करण्याची क्षमता यापेक्षाही जास्त असेल. भारतातील आण्विक त्रिकूट नवी दिल्लीस्थित ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’द्वारे (एसएफसी) नियंत्रित आहे.
वेग वाढविण्याची गरज
युद्धनौकांच्या आणि सागरी बळाच्या बाबतीत भारत प्रगती करीत असला, तरी यामध्ये वेग वाढविण्याची गरज आहे. आयएनएस अरिदमन ही पाणबुडीही यापूर्वीच नौदलात दाखल होणे अपेक्षित होते. याबरोबरच देशी बनावटीच्या युद्धनौकानिर्मितीमध्ये जास्तीत जास्त सामग्री स्वदेशी बनावटीच्या असण्यावरही भर हवा. आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचा वेग वाढविण्याची नितांत गरज आहे. prasad.kulkarni@expressindia.com
