भारतीय नौदलाच्या माध्यमातून राष्ट्रसेवेत चार दशके योगदान दिलेली आयएनएस गुलदार ही सेवानिवृत्त युद्धनौका आता सिंधुदुर्गातील निवती येथील समुद्रात नव्या रूपात अवतरणार आहे. या युद्धनौकेच्या माध्यमातून पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकार करण्यात येणार आहे. या निमित्ताने सेवानिवृत्त आयएनएस गुलदार या युद्धनौकेचा गौरवशाली इतिहास, निवती येथे साकारण्यात येत असलेला पाणबुडी पर्यटन प्रकल्प याचा घेतलेला वेध…
आयएनएस गुलदार युद्धनौकेचा इतिहास
भारतीय नौदलातील आयएनएस गुलदारसह चिताह आणि कुंभीर या युद्धनौकांना १२ जानेवारी २०२४ रोजी चार दशकांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर सेवामुक्त करण्यात आले. चिताह, गुलदार आणि कुंभीर या युद्धनौकांची पोलंडमधील ग्डिनिया शिपयार्ड येथे पोल्नोस्की वर्गातील लँडिंग शिप म्हणून बांधणी करण्यात आली होती. त्यांपैकी आयएनएस चिताह युद्धनौका १९८४मध्ये, आयएनएस गुलदार १९८५मध्ये आणि आयएनएस कुंभीर ही युद्धनौका १९८६ मध्ये भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. आयएनएस गुलदार ही युद्धनौका प्रारंभीच्या काळात विशाखापट्टणम् येथे कार्यरत होती. त्यानंतर तिला अंदमान आणि निकोबार येथे तैनात करण्यात आले. सेवामुक्तीपर्यंत आयएनएस गुलदार तिथेच कार्यरत होती. सुमारे ४० वर्षे या युद्धनौकेने नौदलामध्ये सेवा दिली.
आयएनएस गुलदार युद्धनौकेची वैशिष्ट्ये
आयएनएस गुलदार ही ॲम्फिबियस अर्थात उभयचर प्रकारातील युद्धनौका होती. सैन्य, रणगाडे, वाहने, रसद किनाऱ्यावर उतरवणे हे या युद्धनौकेचे प्रमुख काम होते. सुमारे ७३ मीटर लांबी असलेल्या या युद्धनौकेचे वजन अंदाजे १७०० टन, कमाल वेग सुमारे १८ नॉट होता. युद्धनौका थेट किनाऱ्यावर नेऊन सैनिक आणि उपकरणे उतरवणे शक्य होते. या युद्धनौकेने सुमारे १३०० हून अधिक उभयचर मोहिमा, लष्करी सराव, मदतकार्य अशा मोहिमांमध्ये योगदान दिले. या युद्धनौकेने हजारो सागरी मैलांचा प्रवास केला होता. त्यामुळे या युद्धनौकेने भारतीय नौदलात अमीट ठसा उमटवला आहे.
देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरातील समुद्रात सुमारे २२ मीटर खोलीवर भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार स्थापित करण्यात आली आहे. या माध्यमातून पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकार करण्यात येणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स यांच्या समन्वयाने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ४६.९१ कोटी रुपये, तर राज्य सरकारने ११२.४६ कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी निवती या स्थळाची निवड महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था यांच्या सविस्तर वैज्ञानिक अभ्यासानंतर करण्यात आली. फ्लोरिडा (अमेरिका) येथील यूएसएस ऑरिस्कनी आणि ऑस्ट्रेलियातील एचएमएएस स्वॅन अशा जागतिक दर्जाच्या व्रेक डायव्हिंग स्थळांपासून प्रेरणा घेऊन हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. हा प्रकल्प भारतातील पहिला जागतिक दर्जाचा अंडरवॉटर म्युझियम आणि कृत्रिम प्रवाळभित्ती पर्यटन उपक्रम ठरणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये काय?
सेवानिवृत्त आयएनएस गुलदारची मजबूत पोलादी रचना आता कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून कार्य करणार आहे. त्यामुळे सागरी जैवविविधता, प्रवाळ वाढ, मासेमारी संसाधने आणि पर्यावरणीय संतुलनास चालना मिळणार आहे. या प्रकल्पामध्ये जेट्टीवरून स्पीडबोटने निवती रॉक येथे पोहोचणे, पाणबुडी किंवा स्कुबाद्वारे युद्धनौकेतील प्रवाळ, मासे पाहता येणार आहेत. या प्रकल्पांतर्गत मार्गदर्शित व्रेक डायव्हिंग, पाणबुडी अनुभव, डिस्कव्हर स्कुबा डायव्हिंग (१२ मीटरपर्यंत), प्रमाणित डायव्हर मोहिमा (१८ मीटरपर्यंत), ॲडव्हान्स डायव्हिंग अनुभव (३० मीटरपर्यंत), अंडरवॉटर फोटोग्राफी पर्यटन, सागरी शिक्षण आणि संशोधन करता येणार आहे. समुद्रात स्थापित करण्यात आलेली युद्धनौका कालांतराने कृत्रिम प्रवाळभित्ती म्हणून विकसित होणार असल्याने सागरी जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होऊन विविध प्रकारचे मासे, सागरी वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसाठी संरक्षित अधिवास तयार होणार आहे.
प्रकल्पामुळे फायदा कसा होणार?
सेवानिवृत्त आयएनएस गुलदार प्रकल्पामुळे महाराष्ट्रात प्रथमच जागतिक दर्जाचा पाणबुडी पर्यटन अनुभव विकसित होणार आहे. साहसी पर्यटन, स्कुबा डायव्हिंग, अंडरवॉटर एक्सप्लोरेशन आणि सागरी पर्यटन क्षेत्राला नवा आयाम मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची ओळख देशातील अग्रगण्य साहसी पर्यटनस्थळ म्हणून निर्माण होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीतील पर्यटन अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. देश-परदेशातील पर्यटकांमुळे स्थानिक व्यवसाय, निवास व्यवस्था, वाहतूक, खाद्य व्यवसाय आणि पर्यटन सेवांमध्ये आर्थिक उलाढाल वाढू शकते. दीर्घकालीन दृष्टिकोनातून हा प्रकल्प स्थानिक आर्थिक विकास, स्थानिक रोजगारासाठी, पूरक व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण केंद्र ठरू शकतो. भारतीय नौदलाच्या सेवेत कार्यरत राहिलेल्या युद्धनौकेचा पर्यावरणपूरक आणि पर्यटनाभिमुख पद्धतीने पुनर्वापर करण्याचा हा प्रकल्प राष्ट्रसेवेतील ऐतिहासिक वारशाला अभिवादन करणारा आहे. या माध्यमातून नौदलाचा गौरवशाली इतिहास आणि सागरी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, तसेच भारताच्या सागरी पर्यटन क्षमतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे.
सेवानिवृत्त युद्धनौका ते पर्यटनस्थळ
यापूर्वी काही सेवानिवृत्त युद्धनौकांचे संग्रहालयांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. उदाहरणार्थ, विशाखापट्टणम् येथील किनाऱ्यावर आयएनएस कुर्सुरा या युद्धनौकेवर पाणबुडी संग्रहालय उभारण्यात आले आहे. हे देशातील प्रसिद्ध नौदल संग्रहालयांपैकी एक मानले जाते. कारवार येथे आयएनएस चपल या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. पर्यटकांना युद्धनौकेच्या आतील रचना पाहता येतात. तसेच दीव येथे आयएनएस खुकरी ही युद्धनौका युद्धस्मारक आणि नौदल वारसास्थळ म्हणून जतन करण्यात आली आहे.
chinmay.patankar@expressindia.com
