आपल्या सभोवतालचे वातावरण तणावपूर्ण होत असताना भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस महेंद्रगिरी’ (एफ ३८) ही स्वदेशी बनावटीची आधुनिक युद्धनौका (फ्रिगट) सामील होत आहे. चिनी नौदलाच्या हिंद महासागर क्षेत्रात हालचाली वाढत असून पाकिस्तानने आपल्या नौदलाचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे. अशा वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज, गुप्तपणे (स्टेल्थ तंत्रज्ञान) कार्यान्वित राहणाऱ्या युद्धनौका महत्त्वाचा ठरतील. आयएनएस महेंद्रगिरी भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे एक प्रतीक आहे.
रचना, बांधणी कशी?
भारतीय नौदल ११ जुलै रोजी विशाखापट्टणम येथे आयएनएस महेंद्रगिरी (एफ ३८) युद्धनौका नौदलात दाखल करणार आहे. ‘प्रकल्प १७ अ’ अंतर्गत नीलगिरी श्रेणीतील ही सहावी नौका आहे. या युद्धनौकेची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशीप डिझाईन ब्युरोने केली. तर मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने तिची बांधणी केली आहे. ६६७० टन वजनाच्या युद्धनौकेची लांबी १४९ मीटर आहे. ती २८ नॉट्सपेक्षा जास्त वेगाने मार्गक्रमण करू शकते. अवजड युद्धनौकेसाठी हा वेग जास्त मानला जातो. डिझेल आणि गॅस या संयुक्त प्रणोदन प्रणालीद्वारे ती चालते. त्यामुळे सर्व प्रकारच्या सागरी मोहिमांमध्ये ती उच्च गतीने कार्यरत राहू शकते.
नामकरण कशावरून?
पूर्व घाटातील भव्य महेंद्रगिरी पर्वतरांगेच्या नावावरून या युद्धनौकेचे नामकरण झाले. ओडिशाच्या गजपती जिल्ह्यात ही पर्वत रांग आहे. महेंद्रगिरी हे नाव धारण करणारी ही पहिली भारतीय युद्धनौका असून ती खरोखरच अद्वितीय असल्याचे नौदलाने म्हटले आहे. ‘प्रकल्प १७ अ’ अंतर्गत नीलगिरी श्रेणीतील आतापर्यत आयएनएस नीलगिरी, आयएनएस उदयगिरी, आयएनएस हिमगिरी, आयएनएस तारागिरी या युद्धनौका सेवेत दाखल झाल्या आहेत. आयएनएस महेंद्रगिरी आता भारताच्या सागरी इतिहासात आणखी एक अभिमानास्पद अध्याय जोडण्यासाठी आणि गौरवशाली वारसा निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
सर्वात अत्याधुनिक कशी?
दीड फुटबॉल मैदानांएवढ्या लांब आकाराच्या युद्धनौकेची रचना खोल समुद्रातून मार्गक्रमण करताना रडारला थांगपत्ता लागणार नाही, अशी आहे. रडारला चकवण्यासाठी तिच्या बाह्य भागावर गुळगुळीत, कोनदार पृष्ठभाग असून बाहेर डोकावणारे भाग कमी आहेत. त्यावरील विशेष आवरण रडारच्या लहरींना शोषून घेतात. जहाजाचा ‘डेक’ जवळपास सपाट ठेवला गेला आहे. रडार लहरींना परावर्तित करणाऱ्या तीक्ष्ण कडा आणि कोपरे काढून टाकल्याचे तज्ज्ञ सांगतात. तिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘एकात्मिक मास्ट’. जुन्या युद्धनौकांमध्ये विविध अँटेना व खांब असतात, जे रडारच्या नजरेत पडतात. या नौकेवर सर्व सेन्सर्स एकाच बंद मनोऱ्यात (टॉवर) बसवलेले आहेत. त्यामध्ये शक्तिशाली एफएफ-स्टार रडार असून जी एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर नजर ठेवू शकणारी प्रगत प्रणाली मानली जाते. यामुळे आयएनएस महेंद्रगिरीला पाहणे आणि तिचा मागोवा घेणे कठीण मानले जाते. वाढीव टिकाऊपणा, कमी रडार सिग्नेचर आणि उच्च दर्जाची ऑटोमेशन प्रणाली आदींमुळे ती भारतात बांधलेल्या सर्वात अत्याधुनिक आघाडीच्या युद्धनौकांपैकी एक ठरते, असे नौदलाने म्हटले आहे.
परदेशी अवलंबित्व संपुष्टात?
या निमित्ताने स्वदेशी युद्धनौका निर्मिती कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचा ठप्पा गाठला गेला आहे. युद्धनौकांसाठी परदेशातील अवलंबित्व संपुष्टात येत आहे. मागील वर्षी रशियात बांधलेली ‘आयएनएस तमाल’ समाविष्ट करताना ती परदेशात निर्मिलेली शेवटची युद्धनौका राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आयएनएस महेंद्रगिरी ही स्वदेशी युद्धनौका रचना आणि बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतीक ठरली. तिच्यात ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री आहे. तिच्या बांधणीमुळे अनेक सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसह भारतीय उद्योगांचे एक मोठे जाळे एकत्र आले. या प्रकल्पामुळे आधुनिक बांधणी पद्धती विकसित झाल्या, ज्यात जहाजाचे विविध भाग स्वतंत्रपणे तयार करून नंतर जोडले जातात. यामुळे वेळेत बचत होते. युद्धनौका बांधणीतून रोजगार निर्मिती झाली असून देशाचा संरक्षण उद्योग पायाही मजबूत झाला आहे.
ताकदीमध्ये भर
आयएनएस महेंद्रगिरी अत्याधुनिक शस्त्रे आणि संवेदक (सेन्सर्स) संचाने सुसज्ज आहे, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, हवाई हल्ल्यांपासून संरक्षणासाठी ३२ बराक क्षेपणास्त्रे आणि शेवटच्या क्षणी बचावासाठी तिच्यावर एक ‘सुपर रॅपिड गन’ आणि ‘क्लोज इन वेपन’ प्रणालीही आहे. पाण्याखाली लपलेल्या पाणबुड्यांशी लढण्यासाठी ती पाणतीर (टॉर्पेडो), आरबीयू-६००० रॉकेट लाँचर आणि आधुनिक सोनार प्रणाली वापरते. दोन हेलिकॉप्टरसुद्धा ती वाहून नेऊ शकते, ज्यामुळे तिची क्षमता आणखी विस्तारते. बहुद्देशीय रचना असणारी ही युद्धनौका हवाई विरोधी, जमीनविरोधी आणि पाणबुडीविरोधी युद्ध मोहिमा हाती घेऊ शकते. सागरी सुरक्षा मोहिमा, शक्ती प्रदर्शन, आपत्ती निवारण, शोध व बचाव मोहिमा, मानवतावादी मदत आदीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अदृश्यता, तीक्ष्ण सेन्सर्स आणि विध्वंसक शस्त्रे यांचे एकत्रीकरण हेच तिचे खरे सामर्थ्य आहे. या श्रेणीतील एकामागून एक युद्धनौका ताफ्यात दाखल होत असल्याने भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता बळकट होत आहे. महेंद्रगिरी एक प्रभावी क्षमतावर्धक (फोर्स मल्टिप्लायर) म्हणून काम करेल, देशाच्या सागरी हितांचे रक्षण करेल आणि सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी योगदान देईल, असा विश्वास भारतीय नौदलाने व्यक्त केला आहे.
